अलौकिक श्रीसंतदर्शन : हजरत बाबाजान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

पुणे येथील प्रख्यात सिद्धसत्पुरुष ‘श्रीहजरत बाबाजान’ यांच्या अवतारकार्याशी अवगत करून देणारा लेख.

इराणच्या ‘बसरा’ शहरामध्ये सौंदर्यसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेली रूपगर्विता रुबिया तेथील अनेकांसाठी ‘स्वप्नसुंदरी’ होती. तिच्या लावण्याची सर्वदूर पसरलेली कीर्ती ऐकून तिथे व्यापारानिमित्त आलेल्या ‘शिराझ’ नावाच्या एका व्यापाऱयाने ‘रुबिया’ला भेटण्याचा ध्यास घेतला. त्यासाठी तिच्या दासदासींवर मुक्तहस्ताने द्रव्य लुटवून शिराझने रुबियाच्या अंतःपुरात प्रवेश केला तेव्हा तिथे सर्वत्र धुपाचा मंद सुगंध दरवळत होता. दिवाणखान्याच्या मध्यभागी गालिच्यावर रुबिया गुडघे टेकवून बसली होती. तिच्या ध्यानमग्न कमनीय देहाकडे शिराझ पहिल्याप्रथम आकर्षित झाला असला तरीही त्याच्या मनातील तिच्याविषयीची अभिलाषा मात्र पूर्णपणे गळून पडली होती.

आपण नीरव आणि पवित्र वातावरणात आल्याची जाणीव त्याला एकाएकी सुखावून गेली. यातच बराच काळ सरला अन् तो एकाएकी भानावर आला तेव्हा रुबिया त्याच्याकडे एकटक पाहात असल्याचे त्याला जाणवले. तिचे आरस्पानी दर्शन ‘साक्षात’ घडले तेव्हा तो मंत्रमुग्ध झाला असला तरीही त्याचे सौंदर्यासक्त प्रणयोत्सुक मन, आसक्ती आणि विकार सारेकाही जिथल्या तिथे थिजून गेले. त्याची ती अवस्था पाहून रुबियाला हसू आले आणि त्याला मंचकावर आपल्या शेजारी बसवून ती बोलती झाली. ‘ही सभ्य मंडळींनी येण्याची जागा नव्हे. आम्ही ‘गणिका’ देहाचा व्यापार करतो, मात्र तुला हवे असलेले सौंदर्य माझ्यापाशी नाही. माझे शरीर मी परमात्म्याचरणी अर्पण केले आहे. या बाह्य सौंदर्याला तू भुलू नकोस कारण हा पुष्ट देह आतून अमंगल अशा रक्त-मांस-पू आणि शेंबडाने बरबटलेला आहे. तुला बाह्यतः दिसणारे या देहाचे कमनीय गोलाकार अवयव अंतर्यामी मलमूत्राची साठवणूक करतात हे लक्षात ठेव. स्त्राrचे सौंदर्य, तारुण्य आणि शरीर जोवर ती वयात आहे तोवरच, मात्र एकदा का वृद्धत्व आले की, या तीनही गोष्टी लोप पावतात. या नश्वर गोष्टींसाठी उतावीळ होणे योग्य नाही. लावण्यवती स्त्राrचा देह काळाच्या अग्नीत भस्मसात होण्यास केवळ एक क्षण पुरेसा ठरतो. असा देह म्हणजे भविष्यकाळातील सजीव प्रेत आणि त्या देहाचा उपभोग घेणे म्हणजे सजीव प्रेताशी ‘शृंगार’ करणे. खरे सौंदर्य अल्लाचे ‘चिंतन’ करण्यात आहे. देहावर प्रेम करण्यापेक्षा आत्म्यावर प्रेम कर. सौंदर्याच्या सापळ्यात अडकून जगण्यापेक्षा पवित्र आत्म्याचा शोध घे. चिरंतन मोक्षप्राप्तीचा ध्यास घे. तुझे शरीर आजवर तू स्त्राrदेह भोगण्यासाठी वापरलेस, मात्र यापुढे शुद्ध ज्ञान प्राप्त कर आणि मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न कर.’’

रुबियाच्या प्रत्येक शब्दागणिक शिराझची वृत्ती निरासक्त होत गेली. ‘कामवासना’ लयास गेली, विकार शमले. रती पाहावयास गेलेल्या शिराझला उपरती प्राप्त झाली तेव्हा तो निर्विकार भावनेने तिथून निघून गेला. गणिकेचा व्यवसाय करणारी दुर्दैवी रुबिया तिच्याकडे येणाऱया प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भागधेयानुसार ‘अल्ला का बंदा’ होण्याचा मार्ग दाखवीत असे. तिच्या आश्रयाखाली असलेल्या दास-दासींचा चरितार्थ चालावा म्हणून भ्रष्ट व्यवसायात राहणे गरजेचे असले तरी रुबियाने तिच्या देहाचा बाजार कधीही मांडला नाही.

नियतीचे प्रारब्ध भोग भोगल्यानंतर मुक्तीच्या दिशेने होणाऱया प्रवासासाठी रुबिया अफगाणिस्तान येथे कंदहारच्या राजघराण्यात जन्म घेती झाली. लालसर गुलाबी कांती आणि आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या या नवजात शहजादीचे गाव ‘गुलरख’ ठेवण्यात आले. बालवयातच काहीशी अलिप्त व समाजाशी फटकून वागणारी, पोरवयात अरबी-फार्सी-पुश्तू अन् उर्दू भाषेत पारंगत झालेली, तरुणवयात इस्लामी ग्रंथ-कुराणावर व्यासंगपूर्ण अभ्यासाने बोलणारी ‘गुलरख’ म्हणजेच हिंदुस्थानमध्ये ‘हजरत बाबाजान’ नावाने प्रख्यात झालेली अधिकारी स्त्राrसंत. बाबाजान यांचे पूर्वायुष्य त्यांचे शिष्य, श्रीअवतार मेहरबाबा यांनी कथन केलेले आहे आणि त्यामुळेच ते ‘सत्य’ आहे हे निःसंशय.

दरम्यान, अफगाणिस्तानातील काही अमीरजादे आणि ‘गुलरख’च्या वडिलांचे पूर्वापार चालत आलेले वैमनस्य अशा थराला पोहोचले की त्याची परिणती ही मंडळी कुटुंबकबिल्यासह ‘कंदहार’चा त्याग करून लाहोर येथे पोहोचण्यात झाली. दारिद्रय़ आणि उपासमारी यांमुळे कुटुंबातील एकेकजण मृत्यूपंथाला लागल्याचे प्रसंग उघडय़ा डोळ्याने पाहणाऱया ‘गुलरख’वर अखेर एकाकी आणि निराश्रित अवस्थेत लाहोर सोडण्याची पाळी आली. दरम्यान, तिच्यामधील जन्मजात वैराग्यवृत्तीला पोषक वातावरण निर्माण होत गेले. ‘गुलरख’ला अध्यात्माची ओढ लागली. परमात्म्यापाशी नेणारा प्रवास तिने आपलासा केला. बेबंदपणे दिशाहीन फिरणारी गुलरख तहानभूकेची पर्वा न करता ‘स्व’त्वाचा शोध घेत राहिली. वारंवार ध्यानावस्था आपलीशी करणे, समाधीवस्थेचा अपरिमित आनंद भोगणे तिच्यासाठी नित्याचे झाले. या कालावधीत पुन्हा अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्थान, रावळपिंडी, मुलतान असा बेलगाम प्रवास करीत मुंबईपर्यंत पोहोचलेली ‘गुलरख’ या प्रवासादरम्यान भेटलेल्या साधु-सत्पुरुषांच्या मार्गदर्शनातून तावून सुलाखून सिद्धी प्राप्त करीत सिद्धहस्त झाली.

कठोर साधनेच्या मुशीतून बाहेर पडलेला ‘गुलरख’चा अलौकिक देह ‘बाबाजान’ हे नाव धारण करता झाला. मोक्षप्राप्तीच्या साधनेत आपल्या स्त्राrदेहाचा अडथळा येत असल्याचे जाणवताच ‘गुलरख’ स्वतःची ओळख ‘बाबाजान’ या ‘पुरुषी’ नावाने सांगू लागली. ‘हजरत बाबाजान अल्ला का बंदा है’ असे सांगत पायघोळ लुंगी, अंगरखा घालणारा तिचा देह पुरुषी थाटात उन्मनी अवस्थेत संचार करु लागला. बाबाजान यांचे हे बंडखोर वर्तन बलुचिस्तान येथील तत्कालीन धर्मरक्षकांना आवडले नाही. त्या मुल्ला-मौलवींनी बलुची सैन्याच्या मदतीने जमिनीत खोल खड्डा करून त्यात बाबाजान यांना जिवंत दफन केले. पुढे काही वर्षांनी बाबाजान पुणे येथे कायमस्वरुपी आल्या असता यातील काही बलुची सैनिक लष्कर भागात आले आणि बाबाजान जिवंत असल्याचे पाहून अवाक झाले.

सर्वत्र संचार केल्यानंतर हजरत बाबाजान अखेर कॅन्टोनमेंट परिसर, पुणे येथे लष्कर छावणीजवळील चार बावडीनजीक कडुनिंबाच्या झाडाखाली स्थिरावल्या. प्राप्त झालेल्या सिद्धींच्या साहाय्याने त्यांनी हजारो गोरगरीब भक्तांच्या प्रापंचिक अडचणी दूर केल्या. तत्कालीन सत्पुरुष श्रीसाईबाबा, श्रीबिडकर महाराज, श्रीरावसाहेब सहस्रबुद्धे, श्रीनारायण महाराज, श्रीताजुद्दिनबाबा, श्रीउपासनी महाराज, श्रीशंकर महाराज आणि श्रीमेहेरबाबा त्यांच्यापाशी येणाऱया अनेक समस्याग्रस्तांना बाबाजान यांच्याकडे पाठवत असत. एकशेचाळीस वर्षांहून अधिक आयुष्य लाभलेल्या हजरत बाबाजान यांनी त्यांचे अवतारकार्य 21 सप्टेंबर 1932 रोजी संपविले. त्यांची समाधी पुण्याच्या कँप परिसरात असून एस. बी. काझी आणि गोपाळ करमरकर यांनी लिहिलेले बाबाजान यांचे विस्तृत चरित्र प्रत्येक भाविकाने वाचले पाहिजे.

[email protected]