श्री रामजानकी स्थापित ‘श्री रामेश्वर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> निळकंठ कुलकर्णी

श्रीताम्रपर्णीजलराशियोगे निबंध्य सेतूं विशिखैसङख्ये: ।
श्रीरामचन्द्रेण समर्पित तं रामेश्वराख्य नियतं नमामि ।।

रामेश्वरम हे हिंदुस्थानाच्या तामिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे. रामेश्वरम हे शहर तामिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये स्थित असलेल्या रामेश्वरम द्विपावर वसले आहे. रामेश्वरम श्रीलंकेच्या मन्नार द्विपासून 50 किमी अंतरावर आहे. रामेश्वरममध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर स्थित आहे. त्यामुळे रामेश्वरम हिंदुधर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. प्रभू रामचंद्रांनी याची स्थापना केल्यामुळे याला असे नाव पडले.

श्री रामेश्वरम मंदिराची कथा –

दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या रावणाच्या वधानंतर अगस्ती ऋषींनी प्रभू श्रीरामाला ब्रह्महत्या निरसनार्थ सागरतीरावर ज्येष्ठ शुक्ल पक्ष दशमीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्याचा आदेश दिला. या कार्यार्थ शिवाचे दिव्यलिंग आणण्यासाठी मारुती कैलासावर गेला; परंतु शिवाचे दर्शन न झाल्याने त्याने तप आरंभले. कालांतराने शिवाने प्रगट होऊन हनुमंताला स्वतःचे दिव्य लिंग दिले. या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे मारुतीला मुहूर्ताची वेळ साधता आली नाही. त्या वेळी सीतेने एक वालुकामय लिंग बनवून दिले. ऋषींच्या आदेशानुसार रामाने मग त्याचीच स्थापना केली. हेच हे रामेश्वरमलिंग होय. स्थानिक लोक त्याला ‘रामनाथ स्वामी’ असे म्हणतात.

मारुती परतल्यानंतर जेव्हा त्याला श्रीरामाने शिवलिंग स्थापन केलेले दिसले, तेव्हा त्याला फार दुःख झाले. मग रामाने त्याला स्थापित शिवलिंगाच्या जवळच त्याने आणलेल्या शिवलिंगाची स्थापना करण्यास सांगितले. तसेच त्याने स्थापलेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतल्यावाचून यांत्रिकाना रामेश्वर दर्शनाचे फल मिळणार नाही, असेही सांगितले. या शिवलिंगाला ‘काशीविश्वनाथ’ किंवा ‘हुनमंदिश्वर’ असे नाव आहे.

रामेश्वरम हे काशी यात्रेला पूर्णत्व प्रदान करणारे तीर्थस्थान आहे. उत्तर हिंदुस्थानामध्ये जे काशीचे धार्मिक महत्व आहे, तेच महत्व दक्षिण हिंदुस्थानात रामेश्वरमला आहे. धर्मग्रंथानुसार काशीची तीर्थयात्रा बंगालचा उपसागर (महोदधि) आणि हिंदी महासागर (रत्नाकर) यांच्या संगमावर असलेल्या धनुष्कोडी येथे स्नान केल्यानंतर आणि काशीच्या गंगाजलाने रामेश्वराला अभिषेक केल्यानंतरच पूर्ण होते.

ऐतिहासिक माहिती व मंदिराची रचना – 

स्कंदपुराणात व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वर द्विपाचा आकार काहीसा श्री विष्णूंच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने या ठिकाणी मंदिर बांधले होते. रामेश्वर मंदिराची निर्मिती 12 ते 16 व्या शतकात झाली. इ.स 1897 मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनाला येवुन गेले आहेत.

बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांचे संगम स्थान असून द्रविड स्थापत्य शैलीचे हे मंदिर मानले जात असून येथील मंडपाची निर्मिती इ.स 1740 ते 1770 या कालावधीत झाली. या मंदिर परिसरात 22 विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चोथाऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे. विशेष म्हणजे या शिवलिंगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो.

रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय नामप्रियाय नरकार्णवतारणाय ।।
पुण्येषु पुण्यभरिताय सुराचिताय दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय

([email protected])