
राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी ‘स्वतंत्र जे. जे. राज्यस्तरीय दृश्यकला विद्यापीठाची घोषणा अलीकडेच केली. तब्बल 28 वर्षांनंतर पुन:श्च कला विद्यापीठ हा विषय चर्चेत आला. 28 वर्षांपूर्वी राज्याच्या कलासंचालनालयाचे त्यावेळचे अभ्यासू आणि ज्येष्ठ कलासंचालक प्रा. बाबुराव सडवेलकर यांनी त्यावेळी या स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठाचा तपशीलवार प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. आज नव्याने स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठाची निर्मिती करताना हा प्रस्ताव निश्चितपणे उपयुक्त ठरू शकेल. हे विद्यापीठ अस्तित्वात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने जे जे दृश्यकला विद्यापीठ ही कलाकार, कलाशिक्षक आणि कलाविद्यार्थी यांची कला‘पंढरी’ ठरेल.
या वर्षीच्या प्रारंभीच रत्नागिरीत, राज्यकला प्रदर्शन आयोजिले होते. कला संचालनालयांतर्गत महाराष्ट्रातील शासनमान्य अनुदानित आणि विनाअनुदानित कला महाविद्यालयात कला शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या स्वाध्यायिका पाठवून या प्रदर्शनात सहभागी झाले होते. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी त्यावेळी गुणवत्ता आणि पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करताना एक घोषणा केली आणि साऱया महाराष्ट्राचे कलाक्षेत्र आनंदाने भारावून गेले. मंत्री महोदय म्हणाले, ‘‘महाराष्ट्रासाठी सर जे. जे. राज्यस्तरीय स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना करण्याचा विचार आम्ही करीत आहोत.’’
या त्यांच्या घोषणेमुळे, महाराष्ट्राला स्वतंत्र दृश्यकला विद्यापीठ मिळेल. ही भावना मनाला फार समाधान देऊन गेली. राज्याच्या कला संचालनालयाचे अत्यंत दूरदृष्टीचे, अभ्यासू, संशोधकवृत्तीचे आणि पेंटर्समधील अंतराळ स्थानक म्हणून ज्यांना ओळख होती असे कला संचालक प्रा. बाबुराव सडवेलकर यांची दै. ‘सामना’साठी मी मुलाखत घेतली होती. डिसेंबर 1984 मध्ये साली ‘‘सर जे.जे. दृश्यकला विद्यापीठ’’ नावाने, स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करणारा प्रस्ताव त्यावेळच्या सरकारकडे सादर केला होता. त्याची अस्सल प्रत त्यांनी स्वतः माझ्याकडे दिली होती. ते म्हणाले, ‘‘शेपाळ, मला माहीत नाही, परंतु ही प्रत तुम्हाला फार उपयोगात येईल!’’
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ‘स्वतंत्र जे जे राज्यस्तरीय कला विद्यापीठाची घोषणा अलिकडेच केली. तब्बल 28 वर्षांनंतर पुनश्च ‘विद्यापीठ’ विषय चर्चेत आला. 2000 मध्ये प्रा. बाबुरावांनी दिलेली ‘ती’ अस्सल प्रत, पुनश्च तपासली, वाचली. थक्का व्हायला होतं, ‘कला संचालक प्रा. बाबुरावांनी दिलेल्या प्रस्तावात प्रचंड दूरदृष्टी सामावलेली होती. आताच्या सदर ‘‘सर जे.जे. राज्यस्तरीय विद्यापीठाच्या’’ निर्माणास या प्रस्तावाचा ‘मार्गदर्शक’ म्हणून निश्चित उपयोग होईल असे वाटते.
1984 च्या प्रस्तावातील काही मुद्दे मुद्दाम विषद करावेत असेच आहेत. जेव्हा तत्कालिन कलासंचालक प्रा. बाबुराव सडवेलकर यांनी समक्ष तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना ‘सर जेजे दृश्यकला विद्यापीठाचा’ प्रस्ताव सादर केला. त्यावेळी त्यांनी लगेचच म्हणजे 23 जुलै 1984 ला मुख्यमंत्र्यांच्या दालनात, विधान भवन येथे बैठक बोलावली. या बैठकीला ‘विशेष बैठक’ असे म्हटलेले आहे. त्याच बैठकीत, प्रा. बाबुराव सडवेलकरांनी सादर केलेल्या ‘‘सर जे. जे. दृश्यकला विद्यापीठा’’ला सकृतदर्शनी मान्यता देऊन काही औपचारिक बाबी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
- नियोजित विद्यापीठाचे नाव ‘‘सर जे. जे. दृश्यकला विद्यापीठ’’ असेच राहील. सदर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्राच्या राज्यभरात व्यापलेले असेल. कला शिक्षण देणारे विभाग शासनस्तरावर एकापेक्षा अधिक नसावेत म्हणून, कला संचालनालयाला स्वतंत्र जेजे विद्यापीठात समाविष्ट करण्यात येईल. जेणेकरून महाराष्ट्र राज्याचे ‘‘सर जे. जे. दृश्यकला विद्यापीठ’’ हे मुख्य कलाकेंद्र बनेल.
- महाष्ट्रातील सर्व शासकीय आणि खासगी, परंतु शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित कला संस्थांना या विद्यापीठाची संलग्नता द्यावी. नियोजित विद्यापीठ हे कला शिक्षणावर आधारित यथायोग्य शिक्षणमूल्यांचा विचार करून विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवेल, आयोजित करेल. सदर विद्यापीठाला कला शिक्षण संदर्भातच स्वायत्तता देण्यात येईल. शैक्षणिक नियोजने, कला अभ्यासक्रमांची पूर्तता, परीक्षा घेणे, प्रदर्शनांचे आयोजने करणे, कलामूल्ये आणि कला उद्दिष्टांना प्राधान्य देऊन कार्यक्रम आखणे, पुराणवस्तूंच्या जतनासाठी विकासात्मक योजना आखणे, कार्यशाळांचे आयोजने करणे, दस्तऐवजीकरण करणे, संशोधनांना प्रोत्साहन देणे या व अशा कला विकास करणाऱया उपक्रमांना स्वायत्तता दिली जाईल. सदर विद्यापीठातील आस्थापना, प्रशासन, यासंदर्भात आणि कलाशिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारीवर्ग याशिवाय मंत्रालयीन बाबींसदर्भात राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांचा प्रभाव या विद्यापीठावर राहील. या विद्यापीठातून सर्व प्रकारचे आणि सर्व स्तरांवरील कला शिक्षण दिले जाईल. अगदी ड्रॉइंग ग्रेड परीक्षांपासून ते पीएचडीच्या संशोधनापर शिक्षणापर्यंत सर्व उपलब्ध असेल. सर्व स्तरांवरील, प्रवर्गांतील कला विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम स्वीकारता यावा अशी व्यवस्था करावी. त्यासाठी विद्यापीठाची तज्ञ समिती अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमांची संरचना करेल. अनेक अल्पमुदतींच्या कला अभ्यासक्रमांची योजना, प्रचलित कलाविषयक गरजांचे महत्त्व जाणून करावी. अगदी दृश्य लोककलांच्या प्रचार-प्रसारार्थ पुनरुज्जीवनात्मक ध्येय धोरणांचाही विचार करून अभ्यासक्रम बनवावा. ‘इलेक्टिव्ह’ म्हणजे ‘ऐच्छिक विषय’ ठेवून ते स्वीकारणाऱया विद्यार्थ्यांना त्या विषयातील पदवी-पदविका प्रदान करावी, की जेणे करून ‘विषयतज्ञ’ म्हणून सदर उमेदवारांस स्वतःची ओळख सांगता येईल.
अशा अनेक सर्वसमावेशक मुद्दय़ांना धरून तत्कालिन सरकारने, सर जे. जे. दृश्यकला विद्यापीठाचा प्रस्ताव सकृतदर्शनी मंजूर केला होता. यावेळी कलासंचालक बाबुराव सडवेलकरांनी सादर केलेल्या प्रस्तावात मार्गदर्शक संदर्भ म्हणून हिंदुस्थानातील महान कलाव्यक्ती मूल्यांचा, अनुभवांचा उपयोग केला होता. डॉ. आनंदा कुर्मास्वामी, अरबिंदो, डॉ. रवींद्रनाथ टागोर, कमलादेवी चट्टोपाध्याय, पुपुल जयकर अशा समकालिन कलातज्ञांच्या कार्याचे संदर्भ दिलेले आहेत. शिवाय 1947 मध्ये हंसा मेहता यांनी सादर केलेला कला शिक्षण विषयक अहवाल, 1956 साली ललित कला अकादमी, नवी दिल्लीने कला शिक्षणावर आधारित आयोजित केलेल्या सेमिनारचा अहवाल, 1957 ला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टने ‘हिंदुस्थानातील कला शिक्षणाचे भवितव्य’ या विषयावर आधारलेल्या सेमिनारचा अहवाल, 1981 साली आयआयटी मुंबई यांनी आयोजिलेल्या राष्ट्रीय डिझाइन एज्युकेशन विषयावरील सेमिनारचा अहवाल ज्यात ‘इंडस्ट्रियल डिझाइन’ क्षेत्राची सविस्तर माहिती व महत्त्व सांगितले आहे. अशा अनेक दस्तऐवजावर अनेक बाबींचा विचार या प्रस्तावात केलेला आहे.
हा 1984चा प्रस्ताव कला इतिहासातील दृश्य कलांच्या आधुनिकीकरणाचा दूरदृष्टी लाभलेला ग्रंथच आहे. आता महाराष्ट्र शासनाने ‘स्वतंत्र जे. जे. राज्यस्तरीय विद्यापीठ’ निर्माणाची जी घोषणा केली आहे ती महाराष्ट्रासाठी आणि हिंदुस्थानसाठी स्वागतार्ह आणि मरगळ झटकायला लावणारी आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्यस्तरीय जेजे दृश्यकला विद्यापीठ निर्माणास अधिक गती येईल.
आज जे. जे. आणि कला संचालनालयाच्या ताब्यात अनेक ज्येष्ठ कलाकार आणि शिल्पकारांच्या प्रात्यक्षिकांसह कलाकृती आहेत. स्वतंत्र कला विद्यापीठात जेजे परिसरातच त्यांचं कायम दालन या निमित्ताने सुरू होईल. मधल्या काळात काही अनियमितता झाली तेव्हा काही प्रतिष्ठाrत म्हणवणाऱया मंडळींनी काही कलाकृती नाहिशा केल्या. त्या वृत्तीला सर जेजे राज्यस्तरीय कला विद्यापीठामुळे पायबंद बसेल. तसे पाहिले तर विद्यापीठाला स्वतंत्र काही एकरात जागा हवी असते. मुंबई विद्यापीठाप्रमाणेच सध्या जेजेचा परिसर जेथे आहे तेथे सर जे. जे. राज्यस्तरीय दृश्यकला विद्यापीठाची कार्यालये असतील आणि मुंबईच्या उपनगरात पनवेल किंवा बदलापूर किंवा कसारा मार्गांवर शासन दरबारी जागा उपलब्ध होऊ शकतात. त्या ठिकाणी अभ्यासक्रम चालवावेत आणि हे सहज शक्य होऊ शकते.
जशी ‘जहांगीर’ ही कलाकारांची पंढरी असणारी गॅलरी आहे तद्वतच जे. जे. या नावात जागतिक स्तरावर जादुई आकर्षण आहे. प्रत्येकाला जे. जे. त कलाध्ययन करण्याचे वाटत असते. तसे स्वप्न असते. परंतु जेजेची दोन्ही कला महाविद्यालये मिळून 700-800 विद्यार्थीच शिक्षण घेऊ शकतात. त्यांना मुंबई विद्यापीठाचे सर्टिफिकेट मिळते. मात्र सर जे. जे. राज्यस्तरीय विद्यापीठ आणि मुख्य कार्यालय फोर्टसमोरील जेजे कला शाळा आवारात थाटलेले असेल तेव्हा महाराष्ट्रातील सर्वच कला संस्थांच्या विद्यार्थ्यांना ‘जे. जे.’ विद्यापीठाचे सर्टिफिकेट प्राप्त होईल. मग खऱ्या अर्थाने ‘जे. जे.’ दृश्यकला – विद्यापीठ, ही कलाकार, कलाशिक्षक आणि कलाविद्यार्थी यांची कला ‘पंढरी’ ठरेल. अशी ‘सर जे. जे. कला पंढरी’ महाराष्ट्रातील आणि देशातील एकमेव अधिकृत आणि अद्ययावत असेल. इतकी की तिला कुठला पर्यायच नसेल. याच जेजेने महाराष्ट्राला संवेदनशील कलादृष्टी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहाल केले आहेत. त्यांच्याच कार्याकालात ‘जे. जे.’ केवळ महाविद्यालयच राहणार नाही तर ते एक स्वतंत्र राज्यस्तरीय विद्यापीठ स्वरूपात महाराष्ट्राला प्राप्त होवो. याच शुभेच्छा!
(लेखक सर जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत)
प्रा. डॉ. गजानन सीताराम शेपाळ



























































