छोट्या शेतकऱ्य़ांविरुद्ध कारस्थान

प्रातिनिधिक फोटो

>> प्रा. डॉ. अश्वनी महाजन

बिल गेट्स म्हणतात त्याप्रमाणे छोटे शेतकरी पर्यावरण संकटासाठी दोषी नाहीत. श्रीमंत देशांकडून खर्च केली जाणारी अत्याधिक ऊर्जा आणि वस्तूंचा वापर तसेच यामुळे होणारे उत्सर्जन यामुळेच जगात पर्यावरण संकट निर्माण झाले आहे. श्रीमंत देशांकडून होत असलेले उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणूनच पर्यावरण संकटावर तोडगा काढता येऊ शकतो. जीएम बियाणे आणि तणनाशके वापरण्याची गेट्स यांची सूचना अत्यंत चुकीची आणि घातक आहे.

बिल गेट्स छोट्या शेतकऱ्य़ांकडून केले जाणारे पशुपालन आणि गोपालन हासुद्धा पर्यावरणाचा मोठा शत्रू मानतात. वस्तुतः पर्यावरणाचा तर्क चुकीच्या ठिकाणी वापरला जात आहे. छोट्या शेतकऱ्य़ांकडून निसर्गाशी ताळमेळ राखत शेती केली जाते. त्यांच्याकडून पशुपालन केले जात असल्यामुळे नैसर्गिकरीत्या लोकांची पौष्टिकतेची गरज पूर्ण केली जाते. या व्यवस्थेत कोणताही अन्य हस्तक्षेप आपली खाद्य साखळी बाधित करू शकतो आणि जगात तोच खाद्य संकटाचे कारण ठरू शकतो. जीएम बियाणे आणि राऊंडअपसारखी तणनाशके यामुळेच वस्तुतः निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधता संकटात सापडली आहे. एकीकडे श्रीमंत देश जैविक खाद्यपदार्थांच्या दिशेने वळत असताना दुसरीकडे गरीब देशांमध्ये धोकादायक पिकांना पर्यावरणाच्या नावाखाली प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे? धर्मात्मा आणि दानशूर असल्याचा चेहरा घेऊन बिल गेट्स जगात, विशेषतः गरीब देशांचे आरोग्य धोरण, लसीकरण धोरण, कृषी धोरण यांसह अनेक प्रकारच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करू पाहत आहेत. पर्यावरण संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी दिलेली जी सूचना आहे, बियाणे, कीटकनाशके आणि तणनाशकांचे जे प्रकार वापरण्याचा सल्ला ते देत आहेत, तो कोणत्याही परिस्थितीत कल्याणकारी ठरू शकणार नाही.

जेव्हापासून मानव समूहात राहू लागला तेव्हापासूनच त्याने कृषी आणि पशुपालन सुरू केले. हिंदुस्थानी वाङ्मयात शेती आणि पशुपालनाचे वर्णन महत्त्वपूर्ण आर्थिक घडामोडी म्हणून येते. वेदांमध्येही विविध प्रकारच्या वनस्पती आणि शेतीचे वर्णन केले आहे. शेतीशी संबंधित प्रत्येक घटना उत्सव म्हणून साजरी करण्याची परंपरा हिंदुस्थानात आहे. ऋतूंनुसार शेतीची शास्त्र्ााrय परंपराही आपल्याकडे आहे. अन्नधान्यामधून कार्बोहायड्रेट्स, डाळींमधून प्रथिने, फळे आणि भाज्यांमधून जीवनसत्त्वे अशा सर्व गोष्टी हिंदुस्थानी भोजनाच्या ताटातून आपल्याला मिळतात. या सर्व गोष्टी मेहनती शेतकऱ्य़ांकडून देशवासीयांना उपलब्ध करून दिले जाते. ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ अशी म्हण देशात प्रचलित आहे. शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करून उत्पन्न वाढवत राहिला आहे. त्याचबरोबर पशुपालन, डेअरी, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, फळबागा यांसह अनेक व्यवसाय ग्रामीण भागात चालतात. गावातील कारागीर आपल्या कलात्मकतेने गावे आणि शहरांसाठी कपडे, भांडी, लोखंड आणि अन्य धातूंपासून तयार होणारे साहित्य तयार करून देत असत. इंग्रजांच्या काळात उद्योगांचे पतन, शेतकऱ्य़ांचे शोषण आणि आर्थिक अधोगती झाल्यामुळे शेतीचा ऱहास झाल्याचे इतिहासाच्या पानांत नोंदविले गेले आहे.

शेतकऱ्य़ाची अवस्था कोणत्याही काळात कशीही राहिली असली तरी शेतीकडे आजही एक पवित्र व्यवसाय म्हणून पाहिले जाते, परंतु आजकाल आधुनिक शेतीचे समर्थक त्याच जीवनदायिनी खाद्य आणि पौष्टिकतापूरक परंपरागत कृषीविषयी प्रश्न उपस्थित करतात. जागतिक कॉर्पोरेट बिल गेट्स हे पारंपरिक शेती पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगत आहेत. शेती करण्याच्या पद्धतींमध्ये बदल केला जावा असे त्यांना वाटते, जेणेकरून पर्यावरणावरील त्याचे दुष्परिणाम कमीत कमी करता येतील. ‘लान्सेट’ या वैज्ञानिक नियतकालिकात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, गेल्या 25 वर्षांत जगातील एक टक्का श्रीमंत लोकांनी सुमारे 310 कोटी लोकांच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक प्रदूषण पसरविले आहे. जगातील केवळ 11 ते 15 टक्के हरितगृह वायूंचे उत्सर्जन शेतीतून होते ही बाब बिल गेट्स सांगत नाहीत. जंगलतोड केल्यामुळे 15 ते 18 टक्के आणि शेतीमालावरील प्रक्रिया उद्योग, वाहतूक, पॅकिंग आणि रिटेल यामुळे 15 ते 20 टक्के हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते.

उर्वरित 45 ते 56 टक्के उत्सर्जन खाद्यपदार्थांच्या व्यवसायाशी संबंधित नसलेल्या घडामोडींमधून होते. बिल गेट्स यांची सूचना अशी आहे की, छोटे शेतकरी अधिकाधिक उत्पादन करू शकतील आणि त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील अशा प्रकारचे बियाणे, कीटकनाशक, तणनाशक आणि खते यांचा वापर करावा. जादा उत्पादनासाठी जनुकीयदृष्टय़ा विकसित (जीएम) बियाणे, राऊंडअपसारखी धोकादायक तणनाशके आणि कीटकनाशके यांचे समर्थन बिल गेट्स करताना दिसतात. जगातील खाद्यपदार्थांचे 80 टक्के उत्पादन छोट्या शेतकऱ्य़ांकडून येते. अमेरिकेत मोठय़ा भूभागावर मोठमोठय़ा आकाराच्या शेतांमध्ये शेती केली जाते. शेतांमध्ये प्रचंड कृषीमालाचे उत्पादन होते, परंतु हे उत्पादन लोकांना खाद्य म्हणून उपयोग व्हावा म्हणून नव्हे, तर इथेनॉल किंवा जैव इंधन तयार करण्यासाठी होते. ही औद्योगिक शेती जगातील 75 टक्के भूभागावर केली जाते, परंतु जगाच्या खाद्याची गरज केवळ 20 टक्केच पूर्ण होईल एवढेच अन्नधान्य उत्पादन या शेतीतून होते. अशा पार्श्वभूमीवर, छोट्या शेतकऱ्य़ांकडून जगातील 80 टक्के खाद्य पदार्थांची निर्मिती होते आणि मुख्य म्हणजे जगातील हरितगृह वायू उत्सर्जनापैकी 4 टक्के उत्सर्जनसुद्धा छोटे शेतकरी करत नाहीत.

गेट्स यांचा सल्ला खाद्य पदार्थांच्या गरजेपैकी 80 टक्के गरज पूर्ण करणाऱ्य़ा शेतीवर आघात करणारा आहे. हा सल्ला अमलात आणल्यास बियाणे आणि रसायने यासाठी शेतकऱ्य़ांचे कंपन्यांवरील अवलंबित्व वाढेल. अशा कंपन्यांची उत्पादने जास्तीत जास्त विकली जावीत म्हणूनच बिल गेट्स जीएम बियाणे आणि तणनाशकांच्या वापराचे सल्ले देत आहेत, असे मानले जात आहे. विविध देशांच्या धोरण निर्मितीत बिल गेट्स यांचा हस्तक्षेप असतो, परंतु आपण हे समजून घेतले पाहिजे की, श्रीमंत देशांकडून खर्च केली जाणारी अत्याधिक ऊर्जा आणि वस्तूंचा वापर तसेच यामुळे होणारे उत्सर्जन यामुळेच जगात पर्यावरण संकट निर्माण झाले आहे. श्रीमंत देशांकडून होत असलेले उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणूनच पर्यावरण संकटावर तोडगा काढता येऊ शकतो. छोट्या शेतकऱ्य़ांना दोषी मानून शेती वेगळ्याच दिशेला वळविणे हे जगासाठी मोठय़ा संकटाचे कारण ठरू शकते.

(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या