आभाळमाया : अंतराळ-फराळ!

355

>> वैश्विक  ([email protected])

दिवस चातुर्मासाचे आहेत. उपास आणि फराळी पदार्थांचे आपल्या पृथ्वीवर खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. पूर्वी ठरावीक भागात ठरावीक खाद्यपदार्थ मिळत आणि त्याची चव घेण्यासाठी पर्यटक तिकडे जात असत. त्याची वर्णनेही ‘प्रवासवर्णना’त समाविष्ट होत. गेल्या काही वर्षांत जग इतके जवळ आलेय की, एकेकाळी दक्षिण-उत्तर हिंदुस्थानातले पदार्थ आपल्याला दुर्मिळ वाटायचे. तो काळ कधीच लयाला जाऊन इटालियन, मेक्सिकन, चायनीज पदार्थांनी आपल्याकडचे खवय्ये तृप्त होतायत. एकूणच जगात सर्व काही सर्वत्र मिळते. अमेरिकेतल्या हिंदुस्थानी वाण्याकडे (ग्रोसर) सगळे आपले पदार्थ मिळतात. थालीपिठाच्या भाजणीपासून सगळे. तर आता खाद्य संस्कृतीचेही ग्लोबलायझेशन झाल्याने जगात कोणी कुठे ‘उपाशी’ राहायची शक्यता नाही. ‘आपल्याकडचे’ पदार्थ नाहीत म्हणून एकोणिसाव्या शतकात डॉ. आनंदीबाई जोशी यांना अमेरिकेत केवळ उकडलेल्या बटाटय़ांवर अनेकदा भूक भागवावी लागली. गणिती रामानुजमचीही इंग्लंडमध्ये तीच अवस्था झाली, पण आता तसे नाही. जागतिक ‘खाणावळी’ पृथ्वीवर पसरलेल्या दिसतील.

…आता माणसाला चिंता लागली आहे ती अंतराळात गेल्यावर काय नि कसे खायचे याची! आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन किंवा अंतराळ स्थानकावर वर्षभर वाढणाऱ्या अंतराळयात्रींना इथून वारंवार पॅकबंद जेवण आणि फळे वगैरे पुरवली जात होती. पृथ्वीपासून पाच-सातशे किलोमीटरवर असलेल्या अंतराळ स्थानकाकडे असा जेवणाचा ‘डबा’ पाठवणे शक्य होते, पण माणसाला डोहाळे लागलेत ते चंद्र आणि मंगळावर जायचे. तिथे वस्ती करण्याचे. वेगवान यानातून आणि आवश्यक त्या प्रशिक्षणातून ते साध्य होईलही, परंतु जिथे जाण्या-येण्याचा काळ काही वर्षांचा असेल, अशा वेळी खाण्यापिण्याचे काय? आपल्याकडे पावसाळय़ासाठी पापड, लोणची, सुकट वगैरे पदार्थ ‘भरून’ ठेवतात. असा कितीसा साठा वर्ष-दोन वर्षांच्या प्रवासासाठी नेणार?

पन्नास वर्षांपूर्वी पहिल्या यशस्वी चांद्रवारीसाठी गेलेल्या नील आर्मस्ट्राँग, बझ ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांनी टय़ुबमधे हॅम सलाड, ऑप्रिकॉट (जर्दाळू) क्युब, चीज वगैरे गोष्टी आठवडाभराच्या प्रवासासाठी इथूनच नेल्या होत्या. यावेळी तो प्रवास फारच दूरचा आणि आव्हानात्मक होता. आता तो फिका पडावा इतका अंतराळवाऱ्या झाल्या आहेत. चंद्रावरही एकूण बारा जण जाऊन आलेत. मानवी अवकाशयाने सूर्यमालेची कक्षा ओलांडून पल्याड गेली आहेत. सूर्यमालेतल्या बहुतेक ग्रहांवर आपली याने पोहोचलीयत.

पुढची भरारी मंगळाकडे आहे. चंद्र तसा परसातला. मंगळ मात्र कोटय़वधी किलोमीटर दूरचा. तिथे जायला लागणारा कालावधीही तितकाच मोठा. त्यामुळे ‘नासा’चे अंतराळवीर काय किंवा एलॉन मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’तर्फे मंगळावर जाणारे संभाव्य पर्यटक काय, त्यांच्या जेवणाखाणाची संपूर्ण व्यवस्था तर करावीच लागणार. ती चोख असेल तर हा अंतराळ पर्यटनाचा ‘धंदा’ बरकतीत येईल.

त्यासाठी अंतराळातच काही भाज्या, फळे वगैरेंची लागवड करून तिथल्या तिथे खाद्यान्न मिळवण्याची सोय करण्याचे प्रयोग सुरू झालेत. ते आवश्यकच आहेत. अनेक जणांचे भरपूर खाद्यान्न इथूनच न्यायचे म्हणजे ‘पे-लोड’व्यतिरिक्त इतर ओझे वाढवण्याचा प्रकार. जेवढे वजन जास्त तेवढे रॉकेट बलशाली हवे आणि त्याचे इंधनही भरपूर असायला हवे. आता आपले ‘चांद्रयान-2’ गेलेय. त्यामध्ये दोन-तृतीयांश वजन नुसत्या इंधनाचेच आहे. ते तसेच असते. कारण ही अंतरेच प्रचंड आहेत. मंगळ तर किमान पाच कोटी किलोमीटरवर आहे. तेव्हा तिथे जाण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्णत्वाला न्यायचा तर रॉकेटच्या इंधनाबरोबरच मानवी शरीराचे ‘यंत्र’ चालवणारे ‘रुचकर’ इंधनही पुरेशा प्रमाणात लागणारच.

म्हणून ‘नासा’ने आता ‘स्पेस गार्डनिंग’वर लक्ष केंद्रित केले असून स्पेस स्टेशनसारख्या ठिकाणी भाज्या-फळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथून पुरवठा होत असलेले सुमारे 200 पदार्थ सध्या अंतराळ स्थानकावर उपलब्ध आहेत. मंगळवारीच्या वेळी मात्र असा खाद्यान्न साठा पुरेसा ठरणार नाही. त्यासाठी ‘स्पेस गार्डन’मध्ये विकसित केलेले पदार्थ उपयोगी पडतील. त्यात आता पदार्थाला चव आणणाऱ्या काळय़ा मिरीचाही समावेश झाला आहे. एकेकाळी  याच ‘मसाल्या’च्या पदार्थांच्या शोधात सारे युरोपीय हिंदुस्थानकडे येत होते. आता अंतराळात तसे पदार्थ बनवून अंतराळवीरांना आपली भूक आणि चव भागवावी लागणार आहे. गेल्या शतकभरात जग किती बदललेय आणि विस्तारलेय त्याचे हे द्योतक. आता ‘सातासमुद्रापार’ ही सीमारेषा फारच तोकडी वाटतेय. मंगळ-गुरूच्या कक्षा माणसाला खुणावतायत!

आपली प्रतिक्रिया द्या