आभाळमाया – ग्रहांची मांदियाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक  

आपलं  सौर संकुल सध्या आठ ग्रहांचं. खगोलीय दृष्टीने प्लुटो आता ग्रह नाही. बुधापासून नेपच्यूनपर्यंतच्या ग्रहांपैकी निरभ्र, काळोखी आकाश असताना ठळकपणे दिसणारे ग्रह म्हणजे (पायाखालची पृथ्वी वगळता) शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी. तसा बुधसुद्धा कधी पहाटे, तर कधी संध्याकाळी क्षितिज फारच स्वच्छ असेल तर दिसतो, पण त्याचं दर्शन अगदी दुर्बीण लावूनसुद्धा शहरातून होणं कठीण. तरीही बुधाच्या  सूर्यसान्निध्याची योग्य कल्पना असणारे निरीक्षक आधी नुसत्या नजरेने बुधाचा ‘शोध’ घेतात आणि मग तो दुर्बिणीत ‘पकडतात.’

नंतरचा तेजस्वी शुक्र, लाल मंगळ, मोठा गुरू आणि सुंदर कडी असणारा शनी यांचं दर्शन नुसत्या डोळय़ांनीही होते, पण दुर्बीण असली तर उत्तमच. त्या वेळी या ग्रहांचं रूप स्पष्ट निरखता येतं, असा अनुभव आम्ही खगोल निरीक्षक पावसाळय़ानंतर गेली 40 वर्षे घेत आलोय. त्यातही अमावस्येची रात्र आकाश निरीक्षणासाठी अतिशय योग्य, परंतु ‘थोडाफार’ चंद्र दिसत असेल तर त्यावरची विवरे दुर्बिणीतून प्रेक्षकांना दाखवण्यातही मजा असते. यासाठी अमावास्येनंतरची चतुर्थी-पंचमी सोयीची ठरते. अष्टमीही चालते, पण त्यानंतरचा काळ चंद्रप्रकाश बरेच तारकासमूह आणि राशी-नक्षत्र ‘खाऊन’ टाकतो.

1 जानेवारी 2023 रोजी, दोन-अडीच वर्षांनंतरच्या कोविड कालावधीनंतर प्रथमच ‘खगोल मंडळा’ने मध्य मुंबईत, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात, दर्याकिनारी 5 दुर्बिणी लावल्या त्या पाच ग्रहांच्या दर्शनाची संध्याकाळी पर्वणी टिपण्यासाठी! एवढय़ा ‘हरवलेल्या’ कालावधीनंतर नववर्षाची सुखद थंडीची संध्याकाळ! मौजमजा करायचं सोडून कितीसे लोक येतील अशी शंका आयोजकांच्या मनात होती, पण बघता बघता पन्नास-शंभर नव्हे, तर सुमारे 400 आबालवृद्धांनी बुध, शुक्र, शनी, गुरू, मंगळ या ग्रहांचं दुर्बिणीतून दर्शन घेतलं.

पौष पौर्णिमेपूर्वीची दशमी असल्याने चंद्रप्रकाश होताच. शिवाय मुंबईच्या समुद्रातही ‘दूर दिवे कळलावे’ दिसतातच. त्यामुळे अगदी गडद अंधाराची अपेक्षा नव्हती. क्षितिजावर काहीसा धूसर धुरक्याचा (स्मॉग) साचेबंदपणा लाटांवर रेंगाळत असल्याने, सूर्यास्तानंतर खूपच कमी वेळ दिसणाऱ्या छोटय़ा बुधाचं दर्शन दुरापास्तच होतं. सराईत निरीक्षकांना तो किंचित काळ दिसलाही, पण वर चमचमणाऱ्या तेजस्वी शुक्राने सारी कसर भरून काढली. त्या दिवशी चंद्राची दशमी असली तरी शुक्राची ‘अष्टमी’ असल्याने त्याचं अर्ध बिंब दुर्बिणीतून फारच सुंदर दिसत होतं.

बुध सूर्याच्या सर्वात जवळ म्हणजे 5 कोटी किलोमीटर अंतरावर आणि आपल्यापासून सुमारे 10 कोटी किलोमीटर अंतरावर. त्यातच त्याचा व्यास आपल्या ग्रहाच्या जेमतेम एक तृतीयांश आणि त्याकडे न्याहाळून बघावं असे वैशिष्टय़ही नाही. त्यामुळे तो बिचारा निसटतं दर्शन देऊन मावळला.

नंतर अंधार वाढताच पश्चिम क्षितिजावर दिमाखात ‘राज्य’ करू लागला तो शुक्र. ‘घन तमी शुक्र बघ राज्य करी’ ही भा. रा. तांबे यांची कविकल्पना खरीच आहे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये तेवढा ‘घन तम’ (दाट अंधार) असणं कठीणच, परंतु शुक्राची तेजस्वीताच अशी की, नुसत्या नजरेने पृथ्वीपासून 5 कोटी किलोमीटर अंतरावर असलेला आणि पृथ्वीच्या जवळपास व्यास असलेला हा ग्रह अप्रतिम दिसत होता. चंद्राप्रमाणे प्रत्येक तिथीला वेगळी ‘कोर’ दाखवणाऱ्या शुक्राची त्या रात्री ‘अष्टमी’ होती हे आधीच म्हटलं.

त्यानंतर मकर राशीच्या पार्श्वभूमीवर दिसणाऱ्या शनीचं दर्शन होऊ लागलं. शनीची वैशिष्टय़पूर्ण कडी व्यवस्थित दिसत असल्याने प्रेक्षक खूश होते. सूर्यापासून 1 अब्ज 5 कोटी किलोमीटर अंतरावरचा शनी ग्रह आपल्यापासून साधारण 90 कोटी किलोमीटरवर आहे. त्याच्या मधल्या गोलाच्या व्यासात साडेनऊ पृथ्वी राहू शकतात. त्याच्या कडय़ांकडे पाहताना पहिल्यांदाच अवकाशाकडे दुर्बीण रोखणाऱ्या गॅलिलिओला वाटले होते की, या ग्रहगोलाला ‘कान’ (कडी) आहेत!

क्रमवारीत शनी गुरूनंतरचा ग्रह असला तरी त्या संध्याकाळी निरीक्षणासाठी गुरूची स्वारी नंतर अवतरली. सूर्यापासून 77 कोटी आणि पृथ्वीपासून 62 कोटी किलोमीटरवर असणाऱ्या या ग्रहाचे गॅनिमिड, युरोप, आयो आणि कॅलिस्टो हे चार चंद्र निरीक्षकांनी दुर्बिणीतून पाहिले. या ‘ठिपक्यासारख्या चंद्रांची’ त्यांना गंमत वाटली. गुरूच्या व्यासात 11 पृथ्वी सहज मावतात! सूर्यामध्ये तर 109 पृथ्वी ओळीने मांडून ठेवता येतील! अर्थात सूर्य तारा सर्व ग्रहांच्या एकत्रित वस्तुमानापेक्षाही 98 टक्के अधिक!

याचबरोबर चंद्रावरची विवरं आणि सारथी (ऑरिगा) तारकासमूहामधील ब्रह्महृदय (कॅपेला) यांसारखे तारेही निरीक्षकांनी पाहिले. या विनाशुल्क कार्यक्रमाला आलेल्यांपैकी काही जण पंधरा-वीस वर्षांपूर्वी येऊन गेलेले होते, असे खगोल मंडळाच्या आकाश- निरीक्षण पथकाचे संचालक, अभ्यासक मिलिंद काळे यांनी सांगितलं.  पुन्हा प्रचंड जनसहभाग पाहून आमचा उत्साह वाढला असल्याचं ते म्हणाले. स्मारकाच्या संचालकांनी उत्तम सहकार्य दिल्याने कार्यक्रम रंगला आणि नववर्षाची संध्याकाळ पाच ग्रहांनी तेजाळली. आता पुढचे चार महिने अशा अनेक निरभ्र रात्रींची निरीक्षकांना प्रतीक्षा आहे.

[email protected]