
>>महेंद्र पाटील
दरवर्षी उन्हाळा आला की, अजूनही मला उन्हाळय़ातली ती एक अस्वस्थ दुपार आठवते. किती उन्हाळे उलटून गेले तरी पुन्हा तशी दुपार कधीच जाणवली नाही. त्या दिवसाची गंमत जरा वेगळीच होती. कधी नव्हे ते नियती माझ्यावर मेहरबान होती. मला जितकं अपेक्षित होतं, त्याहीपेक्षा बरंच काही माझ्या पदरात नियतीने भरभरून दिलं. नियतीचं असं वागणं हे माझ्याबद्दलचं प्रेम होतं की, यापुढे तुला काही द्यायचंच नाही. जे काही आहे ते आजच देऊन हिशोब चुकता करावा, असा तिच्या मनात विचार असावा बहुधा. मग मीही जास्त विचार न करता नियतीने दिलेले एकेक आनंदाचे क्षण माझ्या मनाच्या ओंजळीत जमा करू लागलो.
गोडगुलाबी थंडी परतीच्या वाटेवर असताना तिचं आणि माझं उमललेलं प्रेम अजून हवं तसं आकार घेत नव्हतं. आता उन्हाळा आला शिशिराची पानगळ संपून वसंताचं आगमन थाटामाटात झालं. तसंच माझ्याही आयुष्यात प्रेमाचा वसंत बहरून यावा आणि तिच्या माझ्या मनात रुजावा, इतकीच मूठभर स्वप्नं घेऊन मी आलो होतो तुझ्यासमोर. ती तप्त दुपार अतिशय उदासीन, माथ्यावर तळपणारा मध्यान्हीचा सूर्य, दूरवर जाणारे सुने सुने रस्ते, कोमेजलेले प्रहर आणि वाऱयाच्या उष्ण लहरी… अशावेळी खरं तर दोन मनं जवळ येऊन प्रेमाचा फुटलेला अंकुर बहरून उमलावा अशी वेडी आशा मनात बाळगणारा कदाचित मी एकटाच, पण हे वेडेपण मला एकच गोष्ट शिकवत होतं. ती म्हणजे ऋतू कोणताही असो, मनात जे आलं तेच आपण करावं.
शरदाच्या चांदण्यात तिची माझी झालेला शेवटची भेट… त्या वेळी बऱयाच गोष्टी शब्दांत व्यक्त करायच्या राहून गेल्या. त्या क्षणापासून मनात जपलेली घुसमट, कंठातला गहिवर, डोळय़ांत जपलेली स्वप्नं… या सगळय़ा गोष्टींना पूर्णविराम द्यायचं असं माझ्या मनात आज होतं… आणि ही दुपार माझ्या मनातली इच्छा पूर्ण करेल असा ठाम विश्वास घेऊन मी तिच्यासमोर गेलो. तिने एक कटाक्ष टाकून माझ्याकडे पाहिलं. तेव्हा तिच्या डोळय़ात तिने माझ्या आठवणीत जागवलेल्या रात्री ठळकपणे दिसत होत्या. माझ्याही डोळय़ांनी तिच्या डोळय़ांना उत्तर दिलं असेल म्हणून मलाही खूप समाधान वाटलं. तिच्या बंद ओठातल्या संवेदना मला जाणवत होत्या आणि कळत होत्या. आता तिच्याही मनाला ओढ लागली होती माझ्या शब्दांची. आमच्या दोन भेटीदरम्यान असलेलं अंतर दोघांच्याही मनाला सलत होतं. म्हणून समोरासमोर आल्यावर पुन्हा एकदा आमचे डोळेच बोलत होते. फक्त मनात गेल्या भेटीच्या आठवणींनी घेराव घातला होता. तिच्याही मनातल्या अव्यक्त भावनांनी आता बंड पुकारला असावा. मनातल्या मनात ती खूप बैचेन होती. वातावरणात उष्ण लहरी असल्या तरी आमच्या मनात मात्र तेव्हा गारवा होता. गारवा प्रेमाचा, गारवा शब्दांचा, गारवा तिच्या नाजूक पापण्यांच्या सावल्यांचा.
बराच वेळ एकमेकांच्या डोळय़ांत हरवून स्वतःलाच शोधण्यात गेला. आम्ही काही बोलत नाही हे पाहून सारे शब्द एकत्र झाले आणि एकेक करून त्यांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली. तसे भाव उलगडत गेले. तिच्या माझ्या मनातले सारे प्रहर, हळवे बोल, अबोल शब्द, मुक्या भावना, तिच्या अंतरीचा श्रावण माझ्या मनात कोसळणाऱया प्रत्येक सरीतून बरसत होता. बरंच काही बोलत गेलो आणि हरवत गेलो दूर कुठेतरी… सुन्या-सुन्या वाटेवर संध्याकाळ येऊ पाहत होती. अलगदपणे येऊन ही दुपार तिला चोरून न्यायची होती. अशाच वेळी तिचं माझं मन जे रोज संध्याकाळची वाट पहायचं, तेच फितूर झालं. कारण त्या दुपारच्या उष्ण लहरींमध्ये तिच्या माझ्या मनात लपलेले काही शब्द, गुदमरलेल्या भावना, व्याकूळलेले प्रहर, जरासे का होईना, पण सैल झाले होते. इथून पुढे दोघांच्याही मनात एकच रस्ता होता आणि एकच क्षितिज होतं. हातात हात घेऊन चालत जायचं, दूरवर क्षितिजापर्यंत असं दोघांनीही ठरवलं. दोन भेटींच्या अंतरात उठलेलं मनातलं वादळं त्या दुपारी शमलं होतं. पुन्हा पुढच्या भेटीपर्यंत आयुष्य जगण्याची आस मनात राहील इतक्या आठवणी आमच्या ओंजळीत देऊन ती दुपार विरून गेली. ऋतू येतील… ऋतू जातील… पण ती वसंत चाहूल पुन्हा कधीच येणार नाही. मनात उरेल फक्त या ओळी,
घन तिमीर सावल्या जमू लागल्या उन्हात,
सुने झाले तप्त उन्हाळे तुझ्या माझ्या गं मनात…