
>> दिलीप जोशी
नव्या वर्षात विविध अवकाशी कार्यक्रमांचा आढावा घेण्यामागचं औचित्य म्हणजे या वर्षी ‘स्पुटनिक’ हा रशियाचा आणि एकूणच मानवसमाजाचा पहिला वहिला कृत्रिम उपग्रह 1957 मध्ये अंतराळात झेपावला त्याला 65 वर्षे पूर्ण होणार आहेत. 4 ऑक्टोबर 1957 रोजी ‘स्पुटनिक’ पृथ्वीभोवती दूर अंतरावरून गरगरायला लागला आणि ‘कृत्रिम उपग्रह’ संज्ञेचाही जन्म झाला. तोपर्यंत ग्रहांभोवती चंद्रासारखे नैसर्गिक उपग्रहच परिक्रमा करत होते. ‘स्पुटनिक’ने विलक्षण इतिहास घडवला. त्याचा इतका परिणाम झाला की नंतर काही काळ इतर देशांच्या उपग्रहांनासुद्धा लोक त्यांचा ‘स्पुटनिक’ म्हणू लागले. मात्र लवकरच त्यांचीही नामावली जनमानसात रुजली. स्पुटनिक हा अत्यंत कमी वजनाचा आणि फारच कमी काळ अवकाशात भ्रमण करणारा कृत्रिम उपग्रह होता. बाल्यावस्थेत असलेल्या त्या उपग्रहाने पुढे खगोलविज्ञानाच्या या शाखेला उर्जितावस्था येणार असल्याचं मात्र पदार्पणातच सिद्ध केलं होतं. स्पुटनिक 4 ऑक्टोबर 1957 ते 4 जानेवारी 1958 या काळात अवकाशात राहिला. नैसर्गिक उपग्रहासाठी स्पुटनिक हा शब्द 18 व्या शतकात आला. त्याची निर्मिती ‘एस’ म्हणजे एकत्र आणि पुटनिक’ म्हणजे प्रवासी अशा अर्थाने सहयात्री किंवा ‘केलो ट्रव्हलर’ अशा अर्थांचा होता. त्याचंच इंग्लिश रूप सॅटेलाइट’ किंवा आपण म्हणतो तसं उपग्रह.
मात्र स्पुटनिक-1 हा मानवनिर्मित असल्याने आपण त्याला ‘कृत्रिम उपग्रह’ असं योग्य नाव दिलं. पुढे वेगवेगळय़ा देशांचे वेगवेगळय़ा नावाचे कृत्रिम उपग्रह अवकाशात उडाले, पण ‘स्पुटनिक’चं महत्त्व ऐतिहासिक आहे.
17 डिसेंबर 1954 पासून तत्कालीन सोवियत युनियनने कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवण्याच्या विचारांना मूर्त स्वरूप देण्यात पुढाकार घेतला. त्यात, अमेरिकेशी चाललेल्या अवकाश स्पर्धेत आपला पहिला क्रमांक असावा ही ईर्ष्या होतीच. 1954 मध्ये सर्जी कौरिव या रॉकेट संशोधकाने लष्करी उद्दिष्टांसाठी अवकाशात कृत्रिम उपग्रह पाठवण्याची सूचना सोविएत सरकारला केली. त्यातच 29 जुलै 1955 रोजी अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर यांनीही अमेरिका लवकरच अवकाशात कृत्रिम उपग्रह पाठवणार असल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ प्रमुख सोविएत भौतिकतज्ञ लिओनीड सेदौव यांनीही ‘यूएसएसआर’ या स्पर्धेत असल्याचं जाहीर केलं. 6 ऑगस्ट 1955 रोजी रशियाच्या सत्तारूढ पक्षाने त्याला मान्यता दिली. 30 ऑगस्टला सोविएतने आर-7 या उपग्रह वाहून नेणाऱया रॉकेटची चाचणी घेण्याचं ठरवलं.
30 जानेवारी 1955 सोविएतच्या उच्चपदस्थांनी ‘कृत्रिम उपग्रह’ निर्माण करायला अनुमती दिली आणि त्यांचं सांकेतिक नाव ‘ऑब्जेक्ट-डी’ असं ठरलं. लवकरात लवकर म्हणजे 1957 किंवा 58 मध्ये असा उपग्रह अवकाशात सोडावा यादृष्टीने सोविएत शास्त्र्ाज्ञ अहोरात्र परिश्रम करू लागले. सुमारे 1000 ते 1400 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह बनवून त्यावर 200 ते 300 किलो वजनाची उपकरणं असावीत अशी बांधणी सुरू झाली. बरोबर वर्षभराने म्हणजे 30 जानेवारी 1956 रोजी सोविएत मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला गती दिल्यापासून काम अथकपणे सुरू होतं. हे रॉकेट खरं तर आंतरखंडीय क्षेपणास्त्र्ा वाहण्यासाठी बनवलं होतं!
स्पुटनिक-1 च्या नियोजित कार्यात पृथ्वीभोवतीच्या वातावरणाची घनता तपासणे, सौर वारे, चुंबकीय क्षेत्र (मॅग्नॅटिक फिल्ड) तसंच वैश्विक प्रारणांची (कॉस्मिक रेंज) नोंद या गोष्टींचा समावेश होता. भविष्यातल्या अनेक कृत्रिम उपग्रहांना अंतराळात कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल याची ती चाचपणी होती.
अमेरिका आपल्याआधी पहिला कृत्रिम उपग्रह सोडेल या धास्तीने सोविएत उच्चपदस्थ घाई करत होते. एप्रिल किंवा मे (1957) महिन्यातच सोविएत उपग्रह अवकाशात उडावा अशी त्यांची इच्छा होती. 15 मे 1957 रोजी रॉकेट-7 ची यशस्वी चाचणी पार पडली. पुढे त्याला वजन कमी करत अंतिम रूप देऊन ट्रजेक्टरीचा (भ्रमणमार्ग) अंदाज घेण्यात आला.
स्पुटनिक-1 फक्त 23 इंच व्यासाचा छोटासा कृत्रिम उपग्रह होता. 83 किलो वजनाच्या या उपग्रहाची जुळणी 36 बोल्ट (खिळे) बसवून केली गेली. त्याचे दोन्ही गोलार्ध अवघ्या 2 मिलिमीटर जाडीचे होते, त्यावर साडेतीन किलो वजनाचा एक वॉट क्षमतेचा रेडिओ ट्रान्समीटर आणि त्यांचा स्पंदन काळ 0.3 सेकंद होता. स्पुटनिकमध्ये नायट्रोजन (नत्रवायू) भरला होता. पृथ्वीपासून स्फुटनिक सुमारे 1450 किलोमीटरवरून भ्रमण करेल अशी रचना होती.
… आणि 4 ऑक्टो 1957 रोजी अवकाशात सोडलेला ‘स्पुटनिक’ रॉकेटपासून विलग होऊन पृथ्वीभोवती फिरू लागला. अवघ्या 19 सेकंदात त्यावरच्या रेडिओ सिग्नलचा बीप बीप आवाज येताच सोविएत संशोधकांना अत्यानंद झाला. त्यांनी अवकाश स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता. ‘तास’ या अधिकृत सोविएत वृत्तसंस्थेने घोषणा केली की, सोविएतने जगातला पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात यशस्वीरीत्या सोडला आहे!’ जग चकित झालं. अमेरिकेला धक्का बसला. सर्वच वृत्तसंस्थांनी ‘स्पुटनिक-1’ची ठळकपणे दखल घेतली. आर. के. लक्ष्मण यांनी गमतीचं व्यंगचित्रही काढलं. एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. आज आपण क्षणोक्षणी त्याचाच अनुभव घेत आहोत.






























































