
>> दिवाकर शेजवळ
‘एसआरए’ म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील गैरप्रकार आणि रहिवाशांच्या फसवणुकीच्या, ससेहोलपटीच्या कहाण्या नवीन राहिलेल्या नाहीत. झोपडीवासीयांना 262 चौरस फुटांचे घर देण्याची ही योजना 1995 सालात अमलात आली. त्यात आजवर फक्त दीड हजार प्रोजेक्ट मंजूर झाले आहेत. मात्र त्यातील अनेक प्रोजेक्टस् दहा-दहा वर्षे रखडले असून दोन वर्षांपूर्वी तर तब्बल 114 बिल्डरांना राज्य सरकारने नोटिसा बजावल्या होत्या.
झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे अशा प्रकारे तीनतेरा वाजत असताना 25 लाख रुपयांपर्यंत किमतीचे घर गाठीशी फक्त 25 हजार रुपये असताना कोणाला मिळू शकेल काय? पण अशक्य कोटीतील ही गोष्ट ‘इंडियन सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ (इसरा) या फारशा प्रसिद्ध नसलेल्या संघटनेने शक्य करून दाखवली आहे. त्या संघटनेच्या ‘राहुल निवास’ योजनेखाली अंगणवाडी सेविकांसारख्या घटकांचेही फ्लॅटमध्ये राहण्याचे स्वप्न साकार झाले आहे. घरासाठी कर्ज मिळवून देतानाच गरजू गरीबांना कर्जाच्या परतफेडीसाठी सक्षम करणारा पाच लाखांपर्यंतच्या भांडवलाचा उद्योगधंदाही ‘इसरा’ सुरू करून देत आहे.
राहुल निवास योजनेखालील घर मिळविण्यासाठी सभासद शुल्क तीन हजार रुपये आणि 25 हजारांची प्राथमिक रक्कम भरण्याची ऐपत असावी. बस्स मग स्टॅम्प डय़ुटी, रजिस्ट्रेशन, बँकिंग चार्जेससहित कर्जाची जबाबदारी ती संघटना स्वीकारते.
घर गरजूंसाठी खारघर सेक्टर – 35 (25 फ्लॅटस्), कल्याण नेवाळेफाटा (70 फ्लॅटस्), बोईसर (60 फ्लॅटस्), पुणे सिरवली (140 फ्लॅटस्), संभाजीनगर, सेनरा (250 फ्लॅटस् गॅस लाइनसहित) अशी घरे ‘इसरा’कडे उपलब्ध आहेत. घरगरजूंना या उपलब्ध घरांऐवजी स्वतःच्या पसंतीने अन्य ठिकाणी घर घ्यायचे असेल तरीही ती संघटना आर्थिक सहाय्य मिळवून देते.
राज्यात शहर, जिल्हा, तालुका पातळीपर्यंत दीड हजाराच्या जवळपास पदाधिकारी आणि इतर राज्यांसहित एकूण दीड लाखापर्यंत सदस्य आहेत. ही संघटना प्रसिद्धीविन्मुखपणे 2013 सालापासून कार्य करीत आहे. गजानन शिरसाट हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ते स्वतः ‘आदित्य आयुरलॅब प्रा.लि.’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष असलेले विनोद कांबळे यांचीही ‘ऍड-व्हिजन ग्राफिक्स ऍण्ड मीडिया’ ही स्वतःची कंपनी आहे तर सरचिटणीस मनीष रणशूर हेसुद्धा उद्योजक आहेत. मराठा समाजातील ऍड. अनंत अगवणे हे ‘इसरा’चे राष्ट्रीय सल्लागार आहेत. त्यांनी तर पदरचे 10 लाख रुपये टाकून ‘मॅगोल्ड टेक्नॉलॉजिस्ट प्रा.लि.,’ ही कंपनी उभारून सहकारी पदाधिकाऱयांना उत्पन्नाचा स्त्राsत दिला आहे. त्याच कंपनीने आरओ प्लस अल्कालाइन वॉटर प्युरिफायर सध्या बाजारात आणला आहे. त्याची डिस्ट्रिब्युटरशिप ‘इसरा’ आपल्या काय् डिस्ट्रिब्युटरने 9 लाख रुपयांची वॉटर प्युरिफायर्स विकली आहेत.
स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण समाज निर्माण करण्याचे ध्येय आम्ही बाळगले आहे. ते साध्य करण्यासाठी संघटनेच्या एकूण 16 विंग निरनिराळय़ा क्षेत्रांत कार्यरत आहेत, असे ‘इसरा’चे अध्यक्ष गजानन शिरसाट सांगतात. बुद्धाच्या ‘पंचशील’प्रमाणे नीतिमान जीवन जगण्याचे मान्य करणारा माणूस, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, त्याचा अभ्युदय घडविण्याचा वसा आम्ही घेतलाय, अशी ग्वाही ते देतात. ‘इसरा’ने महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हय़ात उमरखेड येथे इंग्रजी माध्यमाचे पहिली ते चौथीसाठी ‘आयडियल इंग्लिश स्कूल’ सुरू केले आहे तर बिहारच्या कटिघर येथे पहिली ते दहावीसाठी इंग्रजी माध्यमातील ‘आयडियल हायस्कूल’ सुरू केले आहे.
‘इसरा’ संघटना रोजगार, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिरे, कर्ज मेळावे एवढय़ावरच थांबत नाही. ‘इसरा फायनान्स’द्वारे होम लोन, पर्सनल लोन, बिझनेस लोन, प्रोजेक्ट लोन, सरकारी महामंडळाची कर्जेही गरजूंना मिळवून देत आहे. त्यासाठी डोंबिवली, बदलापूर, कल्याण, नालासोपारा, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोपरगाव, उमरगा (धाराशीव), नेर (यवतमाळ) येथे संघटनेची कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. ‘इसरा फायनान्स’द्वारे कर्ज मिळवून दिलेल्या लोकांकडून दोन टक्के कमिशन घेतले जाते. त्यातील एक टक्का रक्कम त्या कामात सहयोग देणाऱया आपल्या कार्यकर्त्यांना मानधन म्हणून दिली जाते तर एक टक्का रक्कम ‘इसरा’च्या संघटनात्मक कामकाजासाठी आणि कार्याच्या विस्तारासाठी वापरली जाते.
आंबेडकरी चळवळ ‘जिवंत’ राखण्यासाठी अनेक कार्यकर्ते तन मन धन अर्पण करत खपत आहेत. त्यातील काही चरितार्थाची साधनेही गमावून कंगाल बनतात आणि निवडणुका, सत्तेच्या राजकारणासाठी बाद ठरतात. आम्हाला चळवळीचे हे जुने, पारंपरिक स्वरूप आणि व्याख्याच बदलायची आहे. चळवळ कार्यकर्त्यांच्या जिवावर विसंबून राहण्याऐवजी चळवळीतून कार्यकर्ता जगला पाहिजे हे नवे परिवर्तन चळवळीत आणण्याचा विडा आम्ही उचलला असून ‘इसरा’ त्यासाठीच झटत आहे, असे त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन शिरसाट निरनिराळय़ा कार्यक्रमातून आवर्जून सांगत असतात.
आंबेडकरी चळवळ म्हणजे दलितांवरील अन्याय, अत्याचार, अस्मितेच्या प्रश्नांवरील आंदोलने आणि रिपब्लिकन गटा-तटांचे निवडणुकांतील शरणागत युतीचे राजकारण असे समीकरणच बनून गेले आहे. अशा परिस्थितीतही समाजाची सुरक्षितता आणि सर्वांगिण विकासासाठी झटणारे मोहरे अनेक सापडतील. पण प्रसिद्धी विन्मुखपणे कार्यरत राहिल्यामुळे ते अज्ञात आणि अपरिचित ठरतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशाच एका चेहऱयाचा हा परिचय.
शिक्षणाचे बाजारीकरण झाल्यामुळे तिथे गर्भश्रीमंतांचीच मक्तेदारी प्रबळ होऊ लागली आहे. सर्वच जाती-धर्मातील गरीब आणि मध्यमवर्गीयांची मुले उच्च शिक्षणाला मुकत आहेत. त्यामुळे पहिलीपासून पदव्युत्तर (केजी टू पीजी) शिक्षण मोफत केले गेले पाहिजे. सरकार शिक्षण, आरोग्य सेवा मोफत देणार नसेल आणि रस्तेसुद्धा खासगी कंपन्यांना आंदण देणार असेल तर करदात्यांकडून येणाऱया पैशांचे नेमके काय करणार आहे?
-गजानन शिरसाट, अध्यक्ष ‘इसरा’


























































