
आपल्या देशात शुभ-अशुभ यांना मानणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. लहानपणापासूनचे संस्कार, रूढी, परंपरा अशा सगळ्यांचा त्यामध्ये मोठा हात असतो. स्मशानात रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या अघोरी पूजांपासून ते निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाडण्यासाठी केलेला काळ्या जादूचा प्रयोग असो, अशा बातम्या आपल्याकडे कायम चर्चेत असतात. जग पुढे निघालेले असताना काही लोक मात्र आजही अंधविश्वासाच्या चक्रात रुतलेले आहेत. सध्या राजस्थानमधील अशाच एका गावाची आणि तिथल्या अनोख्या परंपरेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
जैसलमेरमध्ये असलेल्या बडा बाग या गावात एक अनोखी परंपरा आहे. नवविवाहित दांपत्याने मधुचंद्राच्या आधी इथल्या स्मशानात जाऊन विशेष पूजा करायची इथली रीत आहे. विशेष म्हणजे फक्त बडा बाग हे गाव नाही, तर इथल्या आजूबाजूच्या गावांतील नवविवाहितदेखील इथे पूजेसाठी गर्दी करत असतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा इथे सुरू आहे. डोंगराळ भागात वसलेल्या बडा बागच्या स्मशानभूमीत इथल्या राजपरिवाराच्या 103 राजाराणींच्या समाध्या बांधलेल्या आहेत. या प्रत्येक समाधीवर छत्रीदेखील उभी करण्यात आली आहे. 16 व्या-17 व्या शतकात या छत्र्यांची उभारणी सुरू झाली असे मानले जाते.
अशी मान्यता आहे की, नवविवाहित दांपत्याने इथे येऊन पूजा केली असता त्यांना या सर्व राजाराणींचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांचे पुढील वैवाहिक आयुष्य सुखासमाधानात जाते. मात्र रात्रीच्या वेळी या छत्र्यांच्या आसपास भटकण्यासदेखील पूर्णतः मनाई आहे. सर्व ठिकाणी असते तशीच भुताटकीची अफवा या परिसराबद्दलदेखील पसरलेली आहे. रात्रीच्या वेळी म्हणे इथे सैनिकांचा पायरव, हुक्क्याचे आवाज, घुंगराची छुमछुम स्पष्ट ऐकता येते. नवदांपत्यासाठी सकाळच्या वेळी शुभ असलेली ही जागा रात्रीच्या अंधारात एकदम अशुभ बनून जाते. सकाळच्या वेळेत लोकांना आशीर्वाद देणारे हे राजरजवाडे रात्रीच्या अंधारात मात्र लोकांची वर्दळ पसंत करत नसावेत.
स्पायडरमॅन