सोज्वळ आणि शालीन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

सुलोचनादीदींचे नाव घेतले की हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीतील एक सोज्वळ, शालीन चेहरा डोळय़ांसमोर येतो. मोठय़ा पडद्यावरील दयाळू, प्रेमळ आणि प्रसंगी करारी अथवा हतबल ‘आई’देखील आपल्यासमोर उभी राहते. ३० जुलै रोजी चित्रपटसृष्टीतील हा पावित्र्याचा आणि मांगल्याचा चेहरा वयाच्या नव्वदीत प्रवेश करीत आहे. त्यातही एक योग असा की, सुलोचनादीदींच्या प्रदीर्घ रुपेरी कारकीर्दीचेही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हा एक ‘सुवर्णकांचन’ योगच म्हणावा लागेल. १९४३ सालच्या मा. विनायक यांच्या ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात एका लाँग शॉटमध्ये, म्हणजे दुरून चित्रित करण्यात आलेल्या दृश्यात सुलोचनादीदींनी सहभाग घेतला व त्यांची रुपेरी कारकीर्द सुरू झाली. सुरुवात अशी छोटय़ा भूमिकेने झाली तरी त्यांचा पुढचा प्रवास अतिशय लक्षवेधी ठरला. मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचनादीदी यांनी स्वतःचे एक स्थान निर्माण केले. दीदींच्या रुपेरी वाटचालीची वैशिष्टय़े अनेक सांगता येतील. सुरुवातीच्या काळात प्रेक्षक त्यांच्यामध्ये आपली सखी पाहू लागले, मग शेजारीण, त्यानंतर बहीण, मग वहिनी. नंतर आई, मावशी. आज त्या ‘आजी’पर्यंत पोहोचल्या आहेत. आपल्या वाटचालीचे श्रेय सुलोचना दीदी भालजी पेंढारकर यांना देतात. एका भेटीत त्यांनी सांगितले की, ‘‘भालजींसारखे गुरू वेळीच भेटले म्हणून माझी आजपर्यंतची वाटचाल शक्य झाली.’’ दीदींच्या या बोलण्यात कृतज्ञता जाणवते. मेहनत, अचूक, प्रभावी मार्गदर्शन आणि नशिबाची साथ याचा योग्य समतोल व संगम म्हणजे सुलोचनादीदी! बालपणी गावात तंबूत चित्रपट पाहताना पडद्याच्या अगदी जवळून बसून त्या सिनेमा पाहत. इतकेच नव्हे तर त्या पडद्याच्या मागच्या बाजूला काय बरे असेल याची बालवयात जशी इतरांना उत्सुकता असते तशी दीदींनाही असे. त्यांच्या या चित्रपट वेडाला त्यांच्या मावशीने भरपूर साथ दिली. त्यांचे हे चित्रपटवेड प्रत्यक्षात साकारण्याची वेळ आली ती १९४६ मध्ये. ‘सासुरवास’ हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला आणि अभिनेत्री म्हणून त्यांना याच चित्रपटाने ओळख मिळवून दिली. कोल्हापूरच्या प्रभातमध्ये हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता. पहिलाच सिनेमा असल्याने सुलोचनादीदींना प्रचंड कुतूहल होते. चित्रपट प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासूनच त्यांच्या प्रभातवर फेऱया सुरू असत. चित्रपटगृहावर त्या वेळी त्यांची मोठी तसबीर लावली जात होती. असे प्रथमच घडत असल्याने त्या एकदम हरखून गेल्या. हा चित्रपट त्यांनी तब्बल तीस-चाळीस वेळा पाहिला. ‘जिवाचा सखा’ (१९४८) हा ‘मंगल चित्र’चा पुणे शहरात रौप्यमहोत्सवी यश संपादन केलेला सुलोचनादीदींचा पहिला चित्रपट. हा रुपेरी प्रवास आकार घेत असतानाच १९५४ साली त्या मुंबईत राहायला आल्या. त्या वेळी त्या माहीम येथे वास्तव्याला होत्या. पुढे त्यांना हिंदी चित्रपटातूनही मोठीच संधी मिळाली. गजगौरी, गौरीपूजा, पतितपावन, शेषनाग, सती अनसूया, भक्त कबीर, एकादशी अशा पौराणिक वा संतपटांतूनही त्यांना भूमिका मिळाल्या, तर ‘सजनी’, ‘आधी रोटी’, ‘अब दिल्ली दूर नही’ अशा सामाजिक चित्रपटांत त्या नायिका होत्या. ही यादी खूप मोठी आहे. अर्थात चित्रपटांची संख्या, त्यांचे यशापयश यापलीकडे सुलोचनादीदींनी या माध्यमाशी आणि व्यवसायाशी बांधिलकी जपली आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा’ या चित्रपटातील एका करुण प्रसंगाचे चित्रीकरण सुरू असतानाच हा किस्सा. देवाचा कंठा चोरल्याचा आळ जनाबाईवर (सुलोचनादीदी) येतो. हा आरोप तिला अजिबात सहन होत नाही. ती देवाच्या पुढय़ात येते, देवाशी विलक्षण संतापात बोलते आणि मोठी आर्त किंकाळी मारून तिथेच पडते. हा प्रसंग चित्रित करताना सुलोचनादीदींनी ही किंकाळी अशी काही मारली की, सेटवर कमालीची शांतता पसरली. उपस्थित प्रत्येकाच्या काळजात चर्रर झाले. दृश्य ओके झाले आणि या चित्रपटात नामदेवाची भूमिका करणारे अरुण सरनाईक पुढे आले. त्यांच्या डोळय़ांत पाणी होते. त्यांनी दीदींच्या पायाला स्पर्श केला. भूमिकेशी तादात्म्य साधून जिवंत अभिनय म्हणजे काय असते हे या प्रसंगातून दिसते. अर्थात सुलोचनादीदींचे हे एक उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे त्यांच्यासोबत काम केलेले सहकलाकार सांगतात. ‘बहारों के सपने’ या चित्रपटात पदवीधर असूनही बेकार राहिलेला मुलगा राम (राजेश खन्ना) आपल्या पित्याला वैतागलेला असतो. त्यांना तो वाटेल तसे बोलतो. त्याच वेळी त्याची आई (अर्थात सुलोचनादीदी) त्याच्यावर खूप जोरात ओरडते. येथेदेखील दीदींनी जो अभिनयाचा आदर्श सादर केला त्यामुळे सेटवरील सगळेच हबकले. पुन्हा एवढय़ावरच हा प्रसंग थांबला नाही. संतापाच्या भरात आपण आपल्या मुलावर ओरडलो याचे दुःख आई म्हणून त्यांना असहय़ होते आणि त्या स्वतःच रडू लागतात हे दृश्यदेखील दीदींनी एवढे जीव ओतून केले की संपूर्ण सेट स्तब्ध झाला होता. व्यक्तिगत आयुष्यातही दीदी तशा हळव्याच आहेत. इतरांच्या सुखदुःखाशी त्या चटकन समरस होतात. परोपकारी वृत्ती, दुसऱयाचे कौतुक करणे हे तसे या मायानगरीत अपवादाने दिसणारे गुण, पण दीदी त्याला अपवाद आहेत. स्टुडिओतील सामान्य कामगारालाही दीदींबाबत नितांत आदर वाटत असे. त्या त्यांच्याशी कधीही ‘स्टार’ म्हणून वागल्या नाहीत. या स्वभाववैशिष्टय़ामुळेच सुलोचनादीदी समाजाच्या विविध स्तरांशी जोडल्या गेल्या आहेत. अमिताभ बच्चनदेखील त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या घरी दरवर्षी न चुकता येऊन त्यांना वाकून नमस्कार करतो. सुलोचनादीदींना सिनेरसिकांनी आपले मानले व त्यांनीही कायम सामाजिक जाणीव, भावना जपली. म्हणूनच त्यांच्या रुपेरी कारकीर्दीची ७५ वर्षे व त्यांचे नव्वदाव्या वर्षात पदार्पण हा जणू सामाजिक उत्सव ठरतो!