ठसा – सुमित्रा भावे

973

>> प्रशांत गौतम

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे दिला जाणारा तिसरा ‘पद्मपाणी जीवनगौरव’ पुरस्कार प्रख्यात मराठी चित्रपट दिग्दर्शिका, पटकथा लेखिका आणि निर्मात्या सुमित्रा भावे- सुखटणकर यांना घोषित झाला आहे. संभाजीनगरात नाथ ग्रुप, महात्मा गांधी प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात येत असते. प्रोझोन मॉलचे सहकार्य यासाठी लाभते. या महोत्सवाचा समारोप रविवार, 9 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यात सुमित्रा भावे यांना त्यांच्या क्षेत्रातील भरीव आणि ठसठशीत योगदानासाठी ‘पद्मपाणी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या आधी हा पुरस्कार दिग्दर्शक व अभिनेता अमोल पालेकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांना प्राप्त झाला आहे.

संभाजीनगरच्या चोखंदळ रसिक प्रेक्षकांना यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा आस्वाद घेण्याची व हिंदी/मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रख्यात मान्यवरांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळत असते. यंदा सुमित्रा भावे यांना त्यांच्या एकूण कार्याबद्दल जाणून घेता येणार आहे. सुमित्रा भावे आज पंचाहत्तरीत आहेत. याही वयात सिनेक्षेत्रात कार्यरत आहेत आणि ते या क्षेत्रात काम करणाऱया नव्या पिढीसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. 12 जानेवारी 1943 रोजी पुणे येथे जन्म झालेल्या भावेजी आज मराठी चित्रपट, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन क्षेत्रात सर्वसुपरिचित आहेत. संहितेचा सखोल अभ्यास, विषयाकडे पाहण्याची शोधक दृष्टी, कलात्मक गुणवत्तेचा सातत्याने शोध घेत असतात आणि या बहुआयामी वाटचालीतून त्यांच्यातील कसदार दिग्दर्शक वेळोवेळी व्यक्त झाला व होत असतो. भावे यांनी आजपर्यंत 14 चित्रपट, 50 पेक्षा अधिक लघुपटांचे तसेच चार दूरचित्र वाहिनी मालिकांचे लेखन केले. त्यातीलच महत्त्वाचे मराठी, हिंदी चित्रपट म्हणजे ‘अस्तु’, ‘एक कप च्या’, ‘कासव’, ‘घो मला असला हवा’, ‘जिंदगी जिंदाबाद’ (हिंदी), ‘दहावी फ’, ‘देवराई’, ‘दोघी’, ‘नितळ’, ‘फिर जिंदगी’ (हिंदी लघुपट), ‘बाधा’, ‘बेवक्त बारिश’ (हिंदी लघुपट), ‘मोर देखने चले’ ‘जंगल में’ हिंदी माहितीवजा कथापट, ‘वास्तुपुरुष’, ‘हा भारत माझा’ असे मराठी हिंदी-चित्रपट चोखंदळ जाणकार रसिकांच्या स्मरणात असतात. आपल्यापैकी यातील अनेक चित्रपट ज्यांनी पडद्यावर पाहिले असतील त्यांना सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे नेमके वेगळेपण लक्षात येऊ शकते. भावे यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र्ा आणि समाजशास्त्र्ा या दोन महत्त्वपूर्ण विषयात एम. फिल संपादन केली. शिवाय मुंबईच्या टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सच्या ग्रामकल्याण विषयाचीही पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे विनामोबदला काम केले. त्याचवेळी त्या अनेक सेवाभावी संस्थांशीही जोडल्या गेल्या. सरकारप्रणीत कम्युनिटी एड ऍण्ड स्पॉन्सरशिपच्या कार्यक्रमात त्यांनी व्यवस्थापिका म्हणूनही कार्य केले. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांच्या समाजकल्याणविषयक अनेक शोधपत्रिकाही प्रसिद्ध झाल्या. पुणे आकाशवाणीवर वृत्तनिवेदिका म्हणून त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली. त्यांच्या क्षेत्रातील लक्षणीय कार्यासाठी पुण्याच्या रेसिडेन्सी क्लबचा पुणे प्राइड, छत्रपती शाहू महाराज जीवनगौरव पुरस्काराने गौरव झाला.

चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखनाचा सन्मान अनेक राष्ट्रीय-आंतररराष्ट्रीय पुरस्कारांनी झाला. त्यात ‘पद्मपाणी जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांचे लक्षणीय कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या