
>> नमिता वारणकर, [email protected]
साताऱ्याची प्रियांका मोहिते… अत्यंत अवघड मकालु शिखर सर करणारी पहिली हिंदुस्थानी महिला… गिर्यारोहण एक धाडसी आव्हानात्मक खेळ…
गरजेपुरती सामग्री जवळ बाळगून डोंगर आणि पर्वतांच्या रांगांवरून पायी केलेला प्रवास म्हणजे गिर्यारोहण… निखळ आनंद घेत निसर्गाच्या सान्निध्यात केलेल्या या चढाईवर योग्य मार्गदर्शन आणि सरावाच्या बळावरच यश मिळवता येते…या साहसी खेळाला अखिल भारतीय क्रीडा मंडळाने ‘क्रीडा प्रकार’ म्हणून मान्यता दिली आहे…कारण ट्रेकिंग करणारी माणसं त्यांच्या आवडीसाठी, मजा म्हणून कुठेतरी भटकत असतात, अशी गिर्यारोहकाची ओळख असली तरी या खेळाचं स्वतःचं एक तंत्र आहे… ते शिकण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रम असून काही संस्था याकरिता शिक्षण देतात.
साताऱयाची गिर्यारोहक प्रियांका मोहितेने नुकतेच हिमालयातील मकालू शिखर सर केले. हे शिखर सर करणारी ती पहिली हिंदुस्थानी महिला आहे. मकालू शिखराची उंची 8,463 मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे शिखर आहे. ते माउंट एव्हरेस्टच्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे. प्रियांकाच्या या यशस्वी कामगिरीसाठी तिला महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवलं आहे. यानिमित्त साहसी, कठीण आणि अत्यंत कार्यक्षमतेचा वापर करून पर्वतावर चढण्याची ही कला कशी आत्मसात होऊ शकते ते पाहूया.
गिर्यारोहण हे क्षेत्र कायम पुरुषप्रधान मानलं जातं, पण मला हे मान्य नाही. म्हणून महिलाही मागे नसल्याचं सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानते आणि यशाची उंची गाठण्याचा प्रयत्न करते, असं गिर्यारोहणाचं ध्येय जपणाऱया प्रियांकाचं म्हणणं असून कधीही स्वतःला कमकुवत समजू नका. जगातील कोणतीही गोष्ट साध्य करणे कठीण नसते, असा सल्ला ती स्त्र्ायांना देते. जगभरातील सर्वच अतिउंच शिखरं सर करण्याची तिची इच्छा आहे.
साहसातली सुरक्षितता…
इंडियन माउंटेनीअरिंग फाउंडेशन ही राष्ट्रीय शिखर संघटना आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ या राज्य शिखर संघटनेद्वारे गिर्यारोहकांना मार्गदर्शन केले जाते. तसेच बऱयाचदा इंटरनेट आणि फेसबुकच्या मदतीने मिऴवलेल्या माहितीच्या आधारावरही काही जणं गिर्यारोहण करतात, फक्त त्याची अधिकृत तपासणी करणे गरजेचे आहे.
तंत्रज्ञानाचा फायदा
गिर्यारोहणाच्या खेळात वळणावळणावर धोकेच धोके आहेत. सगळ्यात मोठा धोका हवामानाचा असतो, मात्र तंत्रज्ञानामुळे अपघात टळतात, खर्च वाचतो, इंधन वाचतं, ऊर्जा वाचते. जीपीएसमुळे भौगोलिक माहिती व रस्ता शोधणं खूप सोपं होतं. वॉकीटॉकीचे आकारमान व वजन कमी झालं आहे. नवीन इक्विपमेंट्स खूप सोयीचे व हलके आहेत. रेडी टू इट मुळे पंचवीस हजार फुटांवर विविध पदार्थ खाता येतात. याचं श्रेय प्रगत तंत्रज्ञानालाच !
गिर्यारोहणाचं वैशिष्टय़
– गिर्यारोहण हा असा खेळ आहे, जिथे शारीरिक शक्तीबरोबर मानसिक क्षमताही पणाला लागते. या दोन्हीही क्षमतांमध्ये वाढ करायला शिकता येते.
– यामध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नसतो. उलट यात गिर्यारोहक स्वतःच स्वतःचे प्रतिस्पर्धी असतो. आपल्या आयुष्यात कोणत्याही बाबतीत जेव्हा ‘शक्य नाही’ असं म्हणून आपण थांबतो, तिथून पुढं गिर्यारोहणाचा खेळ सुरू होतो.
– या खेळासाठी निर्णयक्षमता, सकारात्मकता लागते. सोबत्यांची काळजी घेत पुढे जाण्याची वृत्ती लागते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टींचं शिक्षण जेवढं या मोहिमा आखताना मिळतं, तेवढं कोणत्याही महागडय़ा मॅनेजमेंट स्कूलमध्ये पैसे भरून घेता येत नाही.
– या छंदामुळे फक्त आनंद नाही तर शरीराबरोबर कणखर मन तयार होतं.
– केवळ मोहिमा आखणे, त्या पूर्ण करणे किंवा आपली एक आवड जोपासणे इतक्याच संकुचित मनोवृत्तीऐवजी गिर्यारोहणाच्या निमित्ताने धाडसी खेळांचं प्रशिक्षण घेता येतं. नवनवीन धाडसांना सामोरं जाता येतं.
– देशातली एखादी दुर्घटना, पूर, भूकंप यासारखी नैसर्गिक आपत्ती, अपघातात अडकलेले लोक या ठिकाणी गिर्यारोहकांची मदत भासते.
गिर्यारोहणाचे प्रकार
– डोंगरावरील पायवाट, ट्रेक मार्ग, डोंगर उतारावर केलेली पायी भटकंती म्हणजे गिरीभ्रमण
– प्रस्तर, सुळके, भिंतींवर तांत्रिक कौशल्य आणि साधनांचा वापर करून केलेले आरोहण याला प्रस्तरारोहण असे म्हणतात.
– अतिउंचीवरील शिखरांवर तांत्रिक कौशल्य आणि सुरक्षा साधनांचा वापर करून केलेले गिर्यारोहण.
– रॅपलिंग, वॉटरफॉल रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, टायरोलीन ट्रव्हर्स, जायंट स्विंग असे काही अन्य प्रकारही आहेत.

























































