लेख – महर्षी वाल्मीकी : एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. रामनाथ खालकर

महर्षी वाल्मीकींनी रामायणात सप्रवृत्त व दुप्रवृत्त चरित्रांचे चित्रण करताना त्याच्या मानसिक विश्वात प्रवेश करून त्यांच्या मनातील विकार, विचार, भावभावना व प्रेरणासंघर्षांचे मानसशास्त्री तपशिलासह वर्णन केले आहे. यावरून महर्षी वाल्मीकी हे एक महान मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ होते याचा प्रत्यय येतो. वाल्मीकी ऋषींचा करुणा, शोक व क्रोध या भावनांचा आविष्कार अनुष्टुभ छंदात प्रकट झाला आहे. यावरून वाल्मीकी हे अनुष्टुभ छंदाचे जनक ठरतात. रामायणात वाल्मीकींनी ज्या प्रकारे व्यक्तिचरित्रांचे चित्रण केले आहे यावरून या चरित्रांचे पाय येथील मातीत रुतलेले आहेत हे स्पष्ट होते.

रामायण हे आदी काव्य असल्याने महर्षी वाल्मीकी हे आद्य कवी ठरतात. नारद ऋषींकडून रामाचे चरित्र ऐकल्यावर ते भारद्वाज नावाच्या शिष्याबरोबर तमसा नदीवर स्नान करण्यासाठी जातात. रामाचे चरित्र ऐकल्याने त्याचे मन भारावलेले होते. नदीवर जात असताना रस्त्यात एका वृक्षावर त्यांना क्रौंच पक्ष्याचे जोडपे दिसते. तितक्यात एका शिकाऱ्याने सोडलेला बाण लागून त्यातील नर क्रौंच खाली पडतो. वाल्मीकींना पक्षाविषयी करूणा तर शिकाऱ्याविषयी क्रोध निर्माण होतो ते शिकाऱ्यास ‘काममोहित क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील एकास तू मारल्याने तुला कधीच शाश्वत शांती मिळणार नाही’ असा शाप देतात.

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यक्रौंच मिथुनादेकमवधीः काममोहितम्।।

‘भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार’ अशी या काव्याची व्याख्या केली जाते. वाल्मीकींचा पक्ष्याविषयीचा शोक व शिकाऱ्याविषयीचा क्रोध आकाशात वीज चमकावी इतक्या उत्स्फूर्तपणे व्यक्त होते. इतक्या पराकोटीच्या उत्स्फूर्ततेतून क्वचितच दुसरे काव्य जन्मास आले असेल. वाल्मीकी ऋषींचा करुणा, शोक व क्रोध या भावनांचा आविष्कार अनुष्टुभ छंदात प्रकट झाला आहे. यावरून वाल्मीकी हे अनुष्टुभ छंदाचे जनक ठरतात. यानंतर बव्हंशी संस्कृत कवींनी अनुष्टुभ छंदात काव्यनिर्मिती केली आहे. संपूर्ण चोवीस हजार श्लोकांचे वाल्मीकींचे रामायण हेही अनुष्टुभ छंदात रचलेले आहे! आपला क्रोध ज्या छंदस्वरूपात प्रकट झाला आहे याचे वाल्मीकींना आश्चर्य वाटते. ते मनातून अस्वस्थ होतात. त्यांची मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी ब्रह्मदेव त्यांना याच छंदात रामाचे संपूर्ण चरित्र लिहिण्यास सांगतात.

वाल्मीकींनी रामायणामध्ये बाल, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर युद्ध व उत्तरकांड अशा सात कांडांमध्ये रामाच्या जीवनातील सर्व लहानमोठय़ा घटनांचे अतिशय तपशीलवार वर्णन केले आहे. प्रभू रामाचे चरित्र सांगत असताना त्यांनी रामाने केलेल्या धर्मसंस्थापनेच्या कार्याचेही वर्णन केले आहे. रामाने दुप्रवृत्त, राक्षसांचा वध करून सप्रवृत्त ऋषींचे व सामान्य लोकांचे रक्षण करून हिंदुस्थानात ठिकठिकाणी व हिंदुस्थानबाहेर धर्माच्या अधिष्ठानावर राज्यव्यवस्था स्थापन केली. अधर्मास निप्रभ करून धर्माचा प्रभाव प्रस्थापित केला. महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या रामायणात रामाचे जीवन व धर्मसंस्थापनेचे कार्य इतके एकरूप झाले आहे की, त्यांना वेगळे करणे केवळ अशक्य आहे. यातून वाल्मीकींचे एक प्रतिभाशाली कवी व द्रष्टे ऋषी म्हणून श्रेष्ठत्व सिद्ध होते.

वाल्मीकी हे एक मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी रामादी सच्चरित्रांचे व रावणादी दुश्चरित्रांचे चित्रण करताना प्रसंगी त्यांच्यासमोर निर्माण झालेल्या प्रेरणासंघर्षाचे व हे प्रेरणासंघर्ष त्यांनी कसे सोडविले याचेही वर्णन केले आहे. विश्वामित्रांना त्यांचे कुठलेही काम करण्याविषयी दिलेले वचन व रामावरील आत्यंतिक प्रेम यामुळे विश्वामित्रांबरोबर रामास पाठविताना दशरथ राजासमोर प्रेरणासंघर्ष निर्माण होतो. दशरथ राजा हा संघर्ष वसिष्ठांकडे नेतो. रामावरील प्रेमामुळे दशरथ राजास विश्वामित्रांबरोबर रामास पाठवायचे नसते. वसिष्ठांनी ईश्वाकू कुलाची परंपरा सांगून दशरथ राजास विश्वामित्रांबरोबर पाठविण्यास सांगितले

विश्वामित्र रामास तटकेस दिसताक्षणी मारण्यास सांगतात. परंतु ती स्त्राr असल्याने रामाच्या मनात तिला मारण्याविषयी संभ्रम निर्माण होईल म्हणून विश्वामित्रांनी रामास तिला ही स्त्राr आहे असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष न करण्यास सांगितले. रामानेही ताटकेस मारले.

रामाच्या राज्याभिषेकप्रसंगी कैकेयीस वरपूर्तीचे दिलेले वचन व रामावरील प्रेम यामुळे दशरथ राजासमोर मानसिक व नैतिक संघर्ष निर्माण होतो. पित्याच्या आज्ञेचे पालन व वनगमनप्रसंगी रामाच्या मनातील झालेली घालमेल आपल्या ध्यानात येते. सीतेस व लक्ष्मणास वनवासात येण्यासाठी अनुमती देताना रामाच्या मनातील चलबिचलही आपल्याला समजते. मुनीवृत्तीने वनात राहत असताना शस्त्रधारण करणाऱ्या रामास या विसंगतीविषयी सीतेने प्रश्न विचारला आहे. यातून सीतेच्या मनातील घालमेल आपणास समजून येते. सीतेच्या रक्षणार्थ थांबलेल्या लक्ष्मणास सीता रामास मदत करण्यासाठी जाण्याचा आग्रह करते. लक्ष्मणाच्या रामाबरोबर वनात येण्याविषयीच्या हेतूविषयी व चारित्र्याविषयी संशय घेतो. त्यावेळेस लक्ष्मणाच्या मनातील संघर्ष आपणास सहज समजतो. भरत चित्रकूट पर्वतावरून रामास परत अयोध्येत आणण्यासाठी जातो व कैकयीने ज्याच्यासाठी राज्य प्राप्त केले तो भरतच रामास राज्य स्वीकारण्याविषयी आग्रह करतो. रामास पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी वनात राहावयाचे असते व भरतास अयोध्येचे राज्य स्वीकारावयाचे नसते. याविषयी राम व भरत यांनी परस्परांशी केलेले युक्तिवाद हे त्यांच्या मनातील संघर्षाचे प्रकटीकरण होय.

रामायणातील मनोनैतिक प्रेरणासंघर्षाची अनेक ठळक उदाहरणे आहेत. रामायणातील व्यक्तिचरित्रांनी हे संघर्ष प्रसंगानुरूप एका पर्यायाची निवड करून, कधी दोहोंमध्ये तडजोड करून तर कधी संघर्षापासून माघार घेऊन सोडविले आहेत. सप्रवृत्त चरित्रांनी नीती-अनीतीचा साधकबाधक विचार करून हे संघर्ष सोडवून आपले चारित्र्य व नीतिमत्ता सांभाळली आहे. रामायणातील व्यक्तिचरित्रांच्या मनातील हे संघर्ष मुख्यतः मनोनैतिक स्वरूपाचे आहेत. यातील सर्वच संघर्ष प्रत्यक्षात सुटण्यासारखे होते असे नाही. अशा न सुटणाऱ्या संघर्षाच्या बाबतीत त्यांनी अपवादात्मक परिस्थितीमध्ये सामान्य माणसांप्रमाणे परिस्थितीनुरूप वृथा समर्थन, प्रक्षेपण, प्रतिपुरण, स्वप्न, दिवास्वप्न, उदात्तीकरण अशा विविध संरक्षण यंत्रणांचा वापर करून अप्रत्यक्ष मार्गांनी संघर्ष सोडविले आहेत. महर्षी वाल्मीकींनी रामायणात सप्रवृत्त व दुप्रवृत्त चरित्रांचे चित्रण करताना त्याच्या मानसिक विश्वात प्रवेश करून त्यांच्या मनातील विकार, विचार, भावभावना व प्रेरणासंघर्षांचे मानसशास्त्राr तपशिलासह वर्णन केले आहे. यावरून महर्षी वाल्मीकी हे एक महान मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ होते याचा प्रत्यय येतो. रामायणात वाल्मीकींनी ज्या प्रकारे व्यक्तिचरित्रांचे चित्रण केले आहे यावरून या चरित्रांचे पाय येथील मातीत रुतलेले आहेत हे स्पष्ट होते.

अशा या प्रतिभाशाली आद्य कवी व मनोज्ञ मानसशास्त्रज्ञ महर्षी वाल्मीकींना त्यांच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने ‘श्री रामरक्षा’ स्तोत्राची रचना करणाऱ्या बुधकौशिक ऋषींच्या शब्दांनी वंदन करून त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो.

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।

आरूह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकीकोकिलम्।।

अर्थात कवितेच्या फांदीवर बसून ‘राम राम’ अशा मधुर अक्षराचे मधुर गुंजन करणाऱ्या वाल्मीकीकोकिळास मी वंदन करतो.