
>> अजित कवटकर
चराचरांत जाणवणारी सकारात्मक ऊर्जा व चैतन्य, प्रत्येक सणाचा पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा उत्सव आणि त्यातील अस्सल खरेपणा ज्या गावात राखला जाईल, टिकवला जाईल तेच समृद्ध राहील, संपन्न होईल. अशा निरागस व आरोग्यदायी साधेपणात आपल्याला निदान एखादा तरी दिवस विश्रांती घेण्याचे भाग्य लाभावे, अशी आस मग जग बाळगेल आणि अशाच पर्यावरणस्नेही गाव संस्कृती या नैसर्गिक पर्यावरणाच्या व धर्मसंस्कारांच्या खऱ्या राखणदार ठरतील.
उन्हाळी सुट्टय़ांचा मोहोर दरवळू लागला की, गावी जाण्याचे वेध हे केवळ लहानग्यांनाच लागतात असे नाही, तर मोठय़ांनादेखील गावाला जाण्याची ओढ अनावर होते. तसे पाहता प्रत्येक सण व सुट्टी ही गावीच घालवणे बहुतेकांना आवडेल, परंतु नोकरी, व्यवसाय, शिक्षणामुळे त्या इच्छेला लगाम घालणे अपरिहार्य ठरते, परंतु एकदा का मोठी सुट्टी लागली की, मात्र त्या इच्छेला कंठ फुटतो आणि ती सुट्टी गावी घालवणे जणू आपला मूलभूत अधिकारच आहे असे वाटू लागते.
निसर्गाने जन्माला घातलेल्या व निसर्गात वाढलेल्या आणि त्यात उक्रांत होत गेलेल्या मनुष्यप्राण्याला त्यामुळे निसर्गाचे आकर्षण असणे स्वाभाविक आहे आणि निसर्गाचे नैसर्गिक सौंदर्य हे आजही ग्रामीण भागांत अधिक जपले गेले आहे, ही वास्तविकता आहे. त्यामुळे गर्द वनस्पतीमुळे हिरवेगार, स्वच्छ, सुंदर झालेल्या तेथील वातावरणाकडे कोणीही ओढला जाणे, त्या सृष्टिसौंदर्याच्या प्रेमात पडणे ही सहज प्रवृत्तीच. अशा संपन्नतेत समृद्ध होणारी आपली धर्मसंस्कृती ही जीवन जगण्याला आनंद, इच्छाशक्ती, शिस्त देणारी एक व्यवस्था होय. जीवन ऊर्जेचे हे शुद्ध स्रोत त्यामुळे टिकले पाहिजेत, टिकवून ठेवले पाहिजेत.
शहरांमध्ये परिस्थितीनुरूप बदलणाऱ्या परंपरा या आधुनिकतेची कास धारण करत गेल्या. सगळं काही ‘रेडीमेड’ उपलब्ध असल्याकारणाने इथे कशातही काही कमतरता ठेवली जात नाही. ‘इव्हेंट मॅनेजमेंट व आऊटसोर्सिंग’मुळे तर सण-उत्सव हे हल्ली आपल्यासमोर अगदी बाशिंग बांधून उभे असल्यासारखे एकदम तयारीतच येतात. ग्रामीण संस्कृतीला मात्र अजून तरी ही ‘रेडी टू युज’ मानसिकता फारशी शिवलेली नाही. त्यामुळे आपल्या धर्म-संस्कृतीच्या मूळ रूढी-परंपरांची निर्मळता, सात्त्विकता, शुभकारकता आजही ग्रामीण जीवनात टिकून राहिलेली पाहायला मिळते. त्यामुळे इथल्या सण-उत्सवांमधील शुद्ध साधेपणातच दैवत्व दर्शनास पडते, विश्वास वाटतो, श्रद्धा जागृत होते. स्थानिक स्तरावर उपलब्ध संसाधनं व नैसर्गिक संपदा यांच्याच सहाय्याने सण-समारंभ होत असल्याकारणाने प्रत्येक ठिकाणच्या पद्धती आपापल्यापरीने अद्वितीय ठरतात. पुरातन वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या गावातील मंदिरांची भव्यता, कलात्मकता, सुंदरता ही तर आपल्या संस्कार-संस्कृतीची अस्मिताच आणि याच देवळांभोवती पडतात तेथील सर्व सणोत्सवांच्या प्रदक्षिणा. म्हणून गणेशोत्सव असो, होळी असो अथवा इतर कोणताही सण असो, तो गावी साजरा करण्यातच अधिक समाधान जाणवते.
गाव/ग्रामीण प्रदेश याच्या अनेक व्याख्या करता येतील, परंतु निसर्ग, वातावरण, पर्यावरण, संस्कृती आणि अशा अनेक गोष्टी जिथे शुद्ध, सुंदर, संपन्न स्थितीत अनुभवास येतात ते गाव, असे म्हणणे अधिक योग्य असेल. त्यामुळे जिथे पर्यावरणाची नैसर्गिकता अबाधित आहे, तिथे धर्मसंस्कार – संस्कृती आजही टिकून आहे. पर्यावरणाला अनुसरून स्वभावगुण आणि त्यातूनच पर्यावरणस्नेही कृती ही ग्रामीण जीवनाचे एक वैशिष्टय़ आणि तेच तेथील पर्यावरणीय संतुलन सुरक्षित असण्यामागील मुख्य कारण होय. झाडांशी, जलस्रोतांशी, मातीशी, पशु-पक्ष्यांशी, डोंगरांशी, देवळांशी नाते जोडणाऱ्या व सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांबरोबरची आपली अतूट बांधीलकी दर्शविणाऱ्या तेथील रूढी-परंपरा यांमुळेच ते जग आजही श्रेष्ठ ठरते. म्हणूनच मनशांती, श्रमपरिहार, अध्यात्म, आरोग्य वगैरेंसाठी आजही सर्वात आवडता व परिणामकारक पर्याय ठरतो तो निदान काही दिवसांसाठी तरी गावाला जाण्याचा.
काळानुरूप गावांचे शहरात रूपांतर होणे हे सामाजिक अर्थव्यवस्थेतील एक नैसर्गिक स्थित्यंतर आहे, पण असे होत असताना अनवधानाने गावचे गावपण हरवणे यास शहरीकरणासाठीची अनैसर्गिक विकास प्रक्रिया कारणीभूत ठरते. शहरी अर्थव्यवस्थेत लोकांचे राहणीमान, दरडोई उत्पन्न वाढते हे कबूल, परंतु निसर्गाकडून अगोदर लाभणाऱ्या इतर सर्व श्रीमंतीस मात्र त्यांना कायमचे मुकावे लागते. त्यासोबत हळूहळू निस्तेज होत जातात त्या पूर्वापार जतन करून ठेवलेल्या सांस्कृतिक परंपरा. कारण या परंपरांना जिवंत ठेवणारे तेथील नैसर्गिक घटक या शहरीकरणाच्या असंवेदनशील प्रक्रियेत नष्ट होत जातात. मग अशाने गावचे वेगळेपणच संपुष्टात येत असल्याकारणाने गावाला जाण्याचे अप्रूप ते काय उरते ?
म्हणून यासाठी ग्रामीण भागाचा विकास होऊ द्यायचा नाही का? तेथील मागासलेपणा दूर करायचा नाही का ? तो दूर व्हायलाच हवा. मात्र त्याचबरोबर आत्मिक आनंद व स्वच्छ समाधान देणाऱ्या निसर्गसंपन्न परिसंस्थांची जोपासना करणाऱ्या आपल्या गावांची, ग्रामस्थांची उन्नती व शाश्वत विकास होणे आवश्यक आहे. श्रीमंतीत सर्व सुख नसते याची अनुभूती शहरवासीयांपेक्षा अधिक कोणाला असणार! म्हणूनच जन्मभर कष्ट करून कमावलेला पैसा हा निसर्गाने समृद्ध असलेल्या ठिकाणी एक ‘सेकंड होम’ बांधण्यात खर्च करण्याचा ट्रेंड जोर धरत आहे. त्यामुळेच गावाकडील जमिनींचे भाव आता शहरांशी स्पर्धा करू लागले आहेत. अनेक गावं ही आज पर्यटनासाठीचे विशेष आकर्षण झाली आहेत. पर्यटनाने तेथील अर्थकारणात अशा प्रकारे आमूलाग्र बदल घडवून आणला आहे की, असे प्रदेश आता राज्य / राष्ट्राच्या विकासाला हातभार लावण्याची क्षमता दाखवून देत आहेत, परंतु हा लाभ तोपर्यंतच जोपर्यंत तेथील नैसर्गिक व सांस्कृतिक सौंदर्य टिकून राहील. यात कायमच सर्वाधिक लाभ होणार तो गावकऱ्यांचाच. म्हणून गावपण टिकवून ठेवणारी प्रगती सर्वांना अभिप्रेत असली पाहिजे.
पहाटेचा पक्ष्यांचा किलबिलाट, रानावनाच्या हवेतील ओलसर गारवा आणि त्यात न्हाऊन निघाल्यामुळे पानाफुलांतून दरवळणारा तो मनमोहक सुगंध, मातीचा तो सुखावणारा स्पर्श, डोंगरदऱ्यांतून खळखळून वाहणाऱ्या स्वच्छ नद्या, मंदिरातून घुमणारा व प्रसन्न करणारा तो घंटानाद, वन्य प्राण्यांचा त्यांच्या अधिवासातील मुक्त संचार, पारंपरिक जीवन पद्धतीमधील तो विस्मयकारी वेगळेपणा, प्रत्येक घासात जाणवणारी तेथील अन्नाची शुद्धता व ताजेपणा, मोकळ्या आकाशाचे अबाधित दर्शन, चराचरांत जाणवणारी सकारात्मक ऊर्जा व चैतन्य, प्रत्येक सणाचा पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा उत्सव आणि त्यातील अस्सल खरेपणा ज्या गावात राखला जाईल, टिकवला जाईल तेच समृद्ध राहील, संपन्न होईल. अशा निरागस व आरोग्यदायी साधेपणात आपल्याला निदान एखादा तरी दिवस विश्रांती घेण्याचे भाग्य लाभावे, अशी आस मग जग बाळगेल आणि अशाच पर्यावरणस्नेही गाव संस्कृती या नैसर्गिक पर्यावरणाच्या व धर्मसंस्कारांच्या खऱ्या राखणदार ठरतील.


























































