लेख – आवाजाचे तंत्र

>> दिलीप जोशी  

आवाज किंवा ध्वनी ही आपल्या जीवनात किती मोठी गोष्ट आहे हे ज्यांना सहज ऐकू येतं त्यांच्या लक्षात येणं कठीण. कारण बालपणापासून आपण ध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधायला, व्यक्त व्हायला शिकत असतो. मूल बोलायला लागल्यावर त्याचं आकलन हळूहळू शब्दरूप घेतं आणि थोडय़ाच काळात ते मातृभाषेत स्वतःचे म्हणणे मांडू शकते. पुढे जसजसा शब्दसंग्रह वाढत जातो तसतशी अभिव्यक्ती अधिक परिणामकारी, प्रगल्भ होते. मग त्यापुढच्या शिक्षणाच्या काळात इतरही अनेक भाषा शिकता येतात. प्रत्येक भाषेची ‘आवाजी अभिव्यक्ती निराळी असते. मराठीत ‘ये’ असा ध्वनी काढला तर कोणी येईल, पण त्यासाठी इंग्लिशमध्ये ‘कम’ असा ध्वनी बोलावण्याचा आवाजी संकेत ठरेल. तोच ‘कम’ उच्चार हिंदीत ‘कमतरता’ असा अर्थ घेऊन येईल. एकाच ध्वनीचे विविध भाषांमधले अर्थ भिन्न असू शकतात हे अभ्यास वाढत गेला की कळते.

ध्वनी किंवा आवाजाचा उपयोग पक्षी, प्राणी, कीटकही करतात. परस्परांना सावध करण्यापासून ते मिलनासाठी साद घालणरे पशुपक्ष्यांचे ध्वनी ही त्यांची ‘भाषा’ असते. याशिवाय ध्वनीचे विविध आविष्कार आपल्या अवतीभवती निनादत असतात. तालवाद्यांचा आवाज, गाण्याचा स्वर, भाषणातील, नाटकातील, व्याख्यानातील ध्वनीवर आधारित शब्दयोजना आणि शब्दफेक श्रोत्यांना आकर्षित करते. सध्याच्या जाहिरातीच्या युगात तर भारदस्त स्वरापासून किनऱ्या आवाजापर्यंत अनेक प्रकारच्या ध्वनिलालित्याचा वापर विविध ‘स्वभाव’ आणि व्यक्तिरेखा व्यक्त करण्यासाठी होतो.

आकाशवाणीसारखे माध्यम जगात अवतरले तेव्हा श्रोत्यांना प्रत्यक्ष न दिसता केवळ आवाजी जादूमधून रेडिओसमोर खिळवून ठेवण्याची कला विकसित झाली. वाक्यातील कोणत्या शब्दांचा ध्वनी कसा उमटवला म्हणजे ऐकणाऱयाला कोणता योग्य तो अर्थपूर्ण संदेश जाऊ शकतो याचेही तंत्र लक्षात येऊ लागले. मला आठवते मुंबई आकाशवाणीवरच्या प्रसिद्ध निवेदिका नीलम प्रभू (करुणा देव) त्यांच्या एका कार्यक्रमातून हे ध्वनीचे आविष्कार सांगत असत. ‘रामाने आंबा खाल्ला’ या वाक्यातील प्रत्येक शब्दावर वेगवेगळय़ा पद्धतीने जोर देऊन तो आंबा रामाने खाल्ला इतर कुणी नव्हे. रामाने आंबा खाल्ला इतर कोणते फळ नव्हे आणि त्याने आंबा स्वतः खाल्ला, म्हणजे खाण्यास नकार दिला नाही असे अतिशय उत्तम पद्धतीने त्या स्पष्ट करीत असत.

अनेक चित्रपट, नाटके किंवा इतर ध्वनी आधारित कलांचा आस्वाद घेणारा प्रेक्षक, श्रोताही असतोच. अभिनय पाहताना तो कलाकाराच्या स्वरातून निर्माण होणारे भावही टिपत असतो. तीच गोष्ट विख्यात गायक-गायिकांची. अनेक अभिनेत्यांचे ‘डायलॉग’ लोक पाठ करतात आणि स्वरमधुर गाणी तर आपोआपच स्मरणात राहतात ही आवाजाची ताकद.

त्याचप्रमाणे विविध वक्त्यांच्या आवाजाची पद्धत असते. त्यापैकी जनमानसाची पकड घेणारे प्रभावी भाषण उत्कृष्ट वक्तृत्वकलेचा आविष्कार ठरते. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सभा ‘ऐकताना’ श्रोते मंत्रमुग्ध होत ते त्यांच्या भाषण शैलीमुळे. साहित्यक्षेत्रात आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे यांनीही एकेक काळ गाजवला. गेल्या महिन्यात जागतिक व्हॉईस किंवा आवाज दिवस होता त्यानिमित्ताने सारे आठवले.

असा ‘आवाजी’ हा आवाजाचे व्यक्तिमत्त्वातील महत्त्व जाणून घेणे, आवाजाचे आरोग्य अबाधित ठेवणे आणि प्रभावी बोलण्यातून आत्मविश्वास वाढवणे याचे स्मरण करून देतो.

…काही व्यक्तींचा आवाज मात्र उमटतच नाही. निसर्गतःच जन्मजात आवाजी उणेपणा असलेल्यांना अनेकांना बोलण्यातून व्यक्त होता आले नाही तर ती माणसे चेहऱयावरच्या हावभावातून आपल्या भावना व्यक्त करतात. हे अर्थातच कठीण आहे. हेलन केलर या अमेरिकन लेखिकेला आपला स्वतःचा आवाज कधीही ऐकू आला नाही. कारण तिला ऐकू येत नव्हते. केवळ एकोणीस महिन्यांची असताना केलरने दृष्टी आणि श्रवणशक्ती गमावली. मात्र तिच्या जिद्दी गुरू, ऍनस्युलिबॅन यांनी ओठाच्या हालचालींवरून स्पर्शाने बोलायला शिकवले. हेलनला तिचा स्वर गवसला. त्यापुढे खूप शिकल्या. जगभर प्रवास करून त्यांनी व्याख्यानेही दिली. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ‘मूकं करोति वाचालम्’ हे त्यांनी प्रत्यक्षात आणले. ही एक विस्मयकारी कहाणी आहे. आपला स्वर जगासाठी आश्वासक करून निराशेवर मात करण्याचा ‘आवाज’ दिला हे स्फूर्तिदायक.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या