
>> अभय मिरजकर
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ अशी एक म्हण आहे. याचा मथितार्थ कोणी समजून घेत नाही. केवळ दहा वर्षांपूर्वी लातूर
शहराला थेट पश्चिम महाराष्ट्रातून रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. त्यानंतर ना लातूरकर सुधारले, ना प्रशासन, ना राज्यकर्ते. तात्पुरत्या स्वरूपातील घोषणा करून राज्यकर्ते मोकळे झाले झाले, पण लातूरच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमच राहिला. लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला हे लातूरला लागलेला कलंक मात्र कायम राहिला आहे.
लातूरची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर हा जिल्हा उंचावर आहे. मुळातच पाण्याचे स्रोत अत्यल्प आहेत. अन्य जिह्यातून पाणी लातूर जिह्यात येऊ शकत नाही. नाशिक भागात झालेल्या पावसामुळे मराठवाडय़ातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिह्यात पाऊस झाला नाही तरी गोदावरी नदीच्या माध्यमातून या भागात पाणी उपलब्ध होते; मात्र लातूर जिह्यात बाहेरून असे पाणी येत नाही. मांजरा नदीवरील साई आणि नागझरी या बंधाऱयावरून लातूर शहराची पाण्याची तहान भागवली जात होती. युती सरकारच्या काळात धनेगाव धरणातून लातूर शहरास पाणीपुरवठा होईल अशी योजना केली. ती पूर्ण झाली. लातूरकरांना पाणी मिळू लागले; पण पर्याय शोधण्याचे काम बंद झाले.
लातूर जिह्यात दर तीन वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. 2016 मध्ये धरण कोरडे पडले तेव्हा सर्वांना पर्याय शोधण्यासाठी डोळे उघडावे लागले. नंतर स्थिती जैसे थे अशीच राहिली. मागील वर्षी धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडावे लागले, पण लातूरला पर्यायी व्यवस्था आजही झालेली नाही.
भविष्यात पुन्हा रेल्वेने पाणी आणावे लागू नये यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे; पण ते करणार कोण, हा खरा प्रश्न आहे. लातूरकरांसारखे सोशिक, एकप्रकारे गुलामगिरीची मानसिकता असणारे लोक इतरत्र शोधूनही सापडणार नाहीत. मागील महिन्यातच शहरात आठ-दहा दिवसांनी पाणी पुरवठा केला गेला. कधी विद्युत पुरवठय़ाचा प्रश्न, तर कधी पाइपलाइन फुटल्याचा प्रश्न, कधी पाणीपट्टी न भरण्याचे कारण दाखवत लातूरकरांच्या माथी पाणीटंचाई मारली जाते. लातूरकर नैसर्गिक पाणीटंचाई सहन करतातच, पण त्यापेक्षाही अधिक मानवनिर्मित पाणीटंचाई पण सहन करतात हे देशातील एकमेव उदाहरण असावे.

























































