लेख – बालवयापासूनच जलसाक्षरतेची गरज

740

>> डॉ. चंद्रकांत शंकर कुलकर्णी

पाणी वापराबाबत आपण गंभीर नाही. किंबहुना जलनिरक्षरच आहोत. आज वीस ते पंचवीस रुपये प्रतिलिटर पाणी व पेट्रोल ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये प्रतिलिटर आहे. पुढील काही वर्षांत हेच गणित उलट झाले तर आश्चर्य वाटायला नको, परंतु हे गणित कसे ठेवायचे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी गरज आहे ती जलसाक्षरतेची.

लोकसंख्यावाढ, विविध कामांसाठी पाण्याची वाढणारी मागणी आणि अनियमित व अपुऱया पावसामुळे महाराष्ट्रातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. गेल्या वर्षी उन्हाळय़ात 28500 ग्रामपंचायतींना, 86681 मनुष्यवस्त्यांपैकी 25500 वस्त्यांना पुरेसे पाणी (40 लिटर प्रतिदिन, प्रतिव्यक्ती) उपलब्ध नव्हते. सरासरी 20 हजार वस्त्यांना दरसाल पाणीटंचाईची झळ पोहोचते. दरवर्षी सरासरी 5 हजार 500 वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा होतो. यावर्षी तर 19 हजार वस्त्यांना पाणी पुरवावे लागते.

हिंदुस्थानात जलसाक्षरतेचे प्रमाण 30 टक्क्यांच्या आसपास दिसते आणि म्हणूनच पर्जन्यमान चांगले असतानाही पाणीटंचाई अथवा महापुरासारख्या परिस्थितीला येथे सामोरे जावे लागते. साधारणतः 60 वर्षांपूर्वी पाणी मुबलक होते व लोकसंख्या मर्यादित होती. आज पाणी आहे तेवढेच आहे, लोकसंख्या मात्र चारपटीने वाढली. म्हणजे एका व्यक्तीच्या पाण्यात आता चार व्यक्ती वाटा मागायला लागल्या. पाण्याची मागणी वाढली, परंतु पुरवठा मात्र तितकाच आहे आणि त्यासाठीच जलसाक्षरता गरजेची आहे, तीसुद्धा बालवयापासूनच.

1992 ला रिओ दी जानेरो (ब्राझील) येथे झालेल्या जागतिक पाणी परिषदेत पाण्याला आर्थिक मूल्य असल्याचा ठराव संमत झाला. ज्या वस्तूला उपयोगिता आहे व ती दुर्मिळ आहे त्यास आर्थिक मूल्य प्राप्त होतेच. जगातील एकूण पाण्यापैकी 97.5 टक्के पाणी समुद्रात खाऱया पाण्याच्या रूपाने आहे. उरलेले 2.5 टक्के पाणी गोडे आहे. या गोडय़ा पाण्यापैकी 70 टक्के पाणी बर्फाच्या स्वरूपात तर 27 टक्के पाणी भूगर्भात अत्यंत खोलीवर आहे. म्हणजे राहिलेले तीन टक्के पाणीच भूपृष्ठावर आहे. या तीन टक्के पाण्याचे नियोजन आजपर्यंत मानवाला शक्य झालेले नाही. म्हणूनच दिवसेंदिवस पाण्याची कमतरता भासू लागली आहे. जागतिक प्रमाणकानुसार जेथे पाणी भरपूर उपलब्ध आहे तेथे दर दिवशी माणशी 200 लिटर पाणी वापरावे लागते. हिंदुस्थानी प्रमाणकानुसार शहरी भागात दर दिवशी दर माणशी 135 लिटर पाणी पुरते. तेच प्रमाण ग्रामीण भागात 60 लिटर आहे, परंतु घरोघरी शौचालय योजनेमुळे हे प्रमाणही आता वाढले आहे. शहरातील 135 लिटर पाण्यापैकी स्वयंपाक व पिण्यासाठी 15 लिटर, आंघोळीसाठी 20 लिटर, कपडे धुण्यासाठी 20 लिटर, भांडी घासण्यासाठी 20 लिटर, फरशी धुणे, गाडी धुणे 20 लिटर व संडास फ्लश करण्यासाठी 45 लिटर असे वाटप होईल, परंतु तेच पाणी आपणांस मुख्यत्वे शहरी भागात 10 ते 20 रुपये प्रति हजार लिटर दराने मिळत असल्याने म्हणजे जवळ जवळ फुकटच मिळत असल्याने त्याच्या काटकसरीच्या किंवा बचतीच्या पर्यायाबाबत आपण विचार करतो, परंतु अमलात आणण्याच्या मानसिकतेमध्ये राहत नाही.

महापालिकेने पाणीपुरवठा केला नाही तर आपण पाण्याचा टँकर विकत घेतो. त्याचा दर सरासरी 100-120 रुपये प्रति हजार लिटर पडतो. तेव्हा मात्र आपण पाणी बचतीचे मार्ग अवलंबतो. तेच पाणी जर पाणीपुरवठा कंपन्यांकडून 30-40 रुपये प्रति वीस लिटर कॅन या दराने म्हणजे 1500 ते 2000 रुपये प्रति हजार लिटर दराने दिले तर आपण आणखी जास्त बचतीचे मार्ग अवलंबतो. म्हणजेच वर उल्लेख केलेले 135 लिटर दर दिवशी माणशी प्रमाण कमी होते. हेच पाणी जर 20 रुपये प्रति लिटर असे बाटलीबंद दिले तर? निश्चितच आपला वापर 135 लिटरऐवजी 35 लिटरपेक्षाही कमी होईल. म्हणूनच पाण्याचे आर्थिक मूल्य जितके वाढेल तितकी त्याची बचत होईल.

पाण्याचा काटेकोरपणे वापर होण्यासाठी खालील बाबी अपरिहार्य ठरतात ः आपल्या घरात बाथरूम, टॉयलेट, किचन, अंगण, फिल्टर, पिंप अशा अनेक ठिकाणी नळ आहेत. यापैकी एखादा तरी नळ अनेकदा थेंब-थेंब गळत राहतो तो वायसर खराब झाल्याने किंवा व्यवस्थित बंद न केल्याने. आपण या क्षुल्लक बाबीकडे अनेकदा नव्हे, बहुतेक सर्वच वेळी दुर्लक्ष करतो. कारण त्यामुळे काहीच फरक पडत नाही असे आपले ठाम मत असते. असा थेंब-थेंब ठिबकणारा जो नळ आहे, त्याखाली एखादा मग किंवा तांब्या ठेवा. साधारण तो लिटर मापाचा असावा आणि घडय़ाळात किती वाजलेत पहा. तो तांब्या किंवा मग भरला की, किती मिनिटे झाली ते पहा. म्हणजे एक लिटर पाणी साठायला इतकी मिनिटे यावरून 24 तासांत किती पाणी साठतं ते पहा. त्याला गुणिले 365 केले तर…?

थेंबाथेंबाचा महापूर दिसेल. आता हे गणित जरा आपल्या गावात किंवा राज्यात किंवा देशात किती घरं आहेत त्याला लावून पहा. एखाद्या धरणाचा साठा थेंबाथेंबाने संपतो हे लक्षात येईल. मग काय कराल? ताबडतोब नळ दुरुस्त करून घ्याल ना? आता हाच हिशेब जरा वाहणाऱया नळासाठी करून पहा. जर आपण काही काम करतो आहे, फोनवर बोलतो, शेजाऱयाशी गप्पा, दाढी-ब्रश करताना पेपर वाचतो, घरातल्यांशी गप्पा मारतो तेव्हा बादलीत सोडलेला नळ बंद करायचा राहून जातो. टाकीतला नळ सुरू राहिल्याने ती वाहत असते. अनेकदा दिवसाकाठी असा एक मिनिटासाठी का होईना, नळ वाहतो. एका मिनिटात किमान दहा लिटर पाणी वाहत असेल ना? मग आपल्या घरातून वर्षाला दहा गुणिले 365 असा हिशेब केला तर हिंदुस्थानातले सगळे लोक अशी चूक करीत असल्यास शुद्ध केलेल्या पाण्याचं काय होईल? जगातील जलशास्त्र्ाज्ञांनी पाण्याची नवीन व्याख्याच केली आहे. ते पाण्यासाठी water हा शब्दप्रयोग न वापरता wash हा शब्दप्रयोग वापरायला लागले आहेत. water in Relation to Sanitation And Hygine. आरोग्य आणि स्वास्थ्य या दोन संकल्पना त्यांनी पाण्याशी जोडल्या आहेत. मानवाला खरोखरच जलसाक्षर व्हायचे असेल तर जलसाक्षरतेची पुढील पंचसूत्री वापरावी लागेल – 1) पाणी वापरात काटकसर 2) जल पुनर्भरणाची कास धरा. 3) पाण्याचा पुनर्वापर 4) पाण्याचे प्रदूषण टाळा 5) शुद्ध पाण्याचे प्राशन.

आपली प्रतिक्रिया द्या