लेख – पावसा, शेतकऱ्याला आता तरी जगू दे!

>> आकाश दीपक महालपुरे

सध्या महाराष्ट्रात परतीच्या पावसाने कहर केला आहे. सोन्यासारखी आलेली पिकं संपूर्ण आडवी झाली आहेत. महापुराने शेतकऱयांचे होत्याचे नव्हते केले. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांतील दगड-माती शेतात वाहून आली. सरकार नुकसानभरपाई देईलच, पण गेल्यावर्षीच्या परतीच्या पावसाने दिलेल्या जखमा भरल्या नसतानाच पुन्हा त्याची खपली पावसाने का काढावी? शेतकरी आणि पाऊस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कितीही झालं तरी पावसावर नाराज होऊन शेतकऱयाला कसे चालेल? माणसाने हव्यासापोटी निसर्गावर जे अत्याचार केले, त्याचाच हा परिणाम असला तरी शेवटी एकच मागणं, पावसा आता तरी शेतकऱयाला जगू दे. निर्दयी होऊ नकोस!

ऊर फुटेपर्यंत कष्ट करून पिकवलं होतं रे सारं मी घामानं,
पण आभाळच फाटलं होतं जिथं
ठिगळ लावलं असतं रे मग मी कशानं…!

पावसा, आता थांब म्हणून कुठल्या तोंडांनं सांगावं हेच कळेनासं झालं आहे. तू कमी प्रमाणात बरसलास तरी चिंता आणि तू जास्त प्रमाणात बरसलास तरी चिंता! पावसा, आता काय ठरवलंयस ते तरी सांगून टाक एकदा. आधीच गेले काही महिने संपूर्ण महाराष्ट्र अदृश्य संकटाशी लढत आहे. संकट अजून गहिरं होता होता हळूहळू शमत होतं. पण पावसाच्या अचानक विध्वंसक बरसण्याने ते अजूनच गहिरं झालं.

पोटचं लेकरू गमावल्यावर ज्या यातना होतात, अगदी तशाच यातना ऊर फुटेपर्यंत कष्ट करून पिकवलेली उभी पिकं आडवी झाल्यावर होतात. आभाळातून पाऊस धो-धो बरसतो आणि शेतकऱयाच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक वाहून जाते. पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेली सगळी पिकं भुईसपाट होऊन जातात. अगदी सोन्यासारखी सर्वत्र पिकं दिसत होती, पण पावसाच्या या ओबडधोबड बरसण्याने सगळय़ा पिकांची मातीच करून टाकली. पांढरं सोनं तर सोनाराकडे मोडल्यागत झालं.

हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. काळजाचं पाणी-पाणी झालं आणि शेवटी प्रसाद म्हणून आम्हा शेतकऱयांच्या, काळय़ा आईच्या पापण्यांमध्ये तेवढं पाणी मात्र पावसानं ठेवलं. खरंच पावसा, ग्रेट आहेस तू!

पावसाने यंदा सुरुवात चांगली केली होती. म्हणून शेतकऱयाने सगळं शिवार पेरलं होतं. पिकं आनंदाने डोलत होती. कोरोना असला तरी यंदाची दिवाळी झाक होणार होती, पण कशाचं काय आणि फाटक्यात पाय.

तुला आमचं सुखच बघवलं नाही. अप्रिय पावसा, तुला माहीत आहे की ज्या वडय़ा-वगळींनी कित्येक वर्षे पाणीच बघितलं नव्हतं. ती वडं, फुलं न्हाऊन निघाली. न्हाऊन निघाली नाही, तर घरात शिरून वाहून गेली. पडझड झाली, डोक्यावरचं छप्पर गेलं, आश्रयाची जागा गेली, भिंत खचली, पोटापाण्याची चूलसुद्धा विझली. घरातील एक-एक पैक्याने जमवलेल्या वस्तूसुद्धा वाहून गेल्या. बापानं धान्य आणि महत्त्वाचं सामान ज्या माळय़ावर ठेवलं होतं, तेही पावसा, तू वाहून नेलंस. ‘तू पाऊस…मी पाऊस…या जन्माजन्मांतरीचं नातं…’ यासारख्या तुझ्यावर लिहिलेल्या कविता ज्या अंकात छापून आल्या होत्या, ती कात्रणंसुद्धा वाहून गेली.

पावसा, तुझ्यावर मी ढीगभर कविता लिहिल्या असल्या तरी वर्तमानपत्रात तुझ्या रुसव्याची बातमी देणं हे मला कधीच पटत नव्हतं, पण तू जरासाही आमचा विचार केला नाहीस. सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलंस.

पावसा, आधीच बापावर कर्ज होतं. आता तर ते कर्ज कसं फेडलं जाईल, चिंगीचं लग्न कसं होईल, गण्याला आमंत्रण कोण देईल याचा विचार करण्यातच त्याचं आयुष्य जाणार आहे.

माझे मायबाप उपाशी राहतील. दहा-वीस दिवस, पण माझे छोटे छोटे सोन्यासारखे भाऊ-बहीण कसे उपाशी राहतील इतके दिवस?

सांग ना पावसा, अरे सांग ना…
हं…तू काय सांगशील म्हणा!
तुला यातलं काय कळणार नाही का?
कारण तू कधी शेतकरी होऊन जगलासच नाही!

अप्रिय पावसा, तू शेतकऱयाचा मित्र होण्यापेक्षा कधीतरी स्वतः शेतकरी होऊन बघ! मग तेव्हा तुला कळेल, तो बियाणे जमिनीत टोपतो कसा, त्याला वर्षभर खतपाणी घालतो कसा, अरे पावसा…तुला सांगू, त्या पिकाचं संगोपन करण्यातच अन् सावकाराकडे चकरा मारण्यातच त्याचं संपूर्ण आयुष्य जातं!

‘दे रे हरी पलंगावरी’ असं कधी होत नाहे त्याच्या आयुष्यात. कारण स्वप्नाला तो जिद्दीचा आकार देत असतो. त्यासाठी मग तो वाट्टेल ती रात्रंदिवस मेहनत करत असतो.

दुष्काळाच्या झळा आणि अतिवृष्टीच्या कळा मी जरी अनुभवल्या नव्हत्या तरी त्या बापाच्या तोंडून ऐकल्या होत्या, वाचल्या होत्या. मात्र मागच्या वर्षी मी त्या प्रचंड प्रमाणात अनुभवल्या. अतिशय भयानक. परतीच्या वाटेवर पावसाने शेतकऱयाला एक वर्ष मागे लोटले. महापुराने कहर केला. श्रीमंत, गरीब एका छताखाली आले होते. महापुराची पुण्या-मुंबईकडून आलेली मदत पाहिली. मिळाली, वाटली. विस्कटली, उलथली. चांगल्या-चांगल्यांना भीक लागलेलीसुद्धा बघितली. काही जण तर अजूनही वर्ष उलटून गेलं तरी पुरवून पुरवून खात आहेत. याच काळात आयुष्यात मोठी उलथापालथ झाली.

वाळव्यातल्या घरात कधी नव्हे ते नऊ फूट पाणी साचलेलं होतं. पावसाचाआणि महापुराचा विषय निघतो तेव्हा आजही माझ्या त्या लहान भावंडांच्या डोळय़ात मला महापूर दिसतो. आई-बाबांच्या बोलण्यात तुझे थेंब अजूनही तसेच्या तसे आहेत. त्या काळात सुरू झालेली तुझी ओल वाळायच्या आत, भिंतींवरचे पुराचे, साठलेल्या पाण्याचे व्रण जायच्या आत निसर्गाने कोरोनाच्या रूपाने कहर केला.

महापुराच्या अनुभवांनी शहाणे झालेल्या लोकांची आतूनच प्रार्थना आहे की,
पावसा, तू आता तरी जा!
शेतकऱयाला आता तरी जगू दे!!
पावसा, आम्ही आजही तुझ्यावर नाराज नाही. का म्हणून नाराज व्हायचं? आम्हाला जसं तुला ठेवायचं तसं तू ठेव. कारण आम्हाला माहीत आहे, आम्ही अपराध केला आहे. नद्या, नाले, गटारी बुजवल्या आणि आमच्या सुखासाठी घरे बांधली आहेत. पैसे देणारी पिकं घेण्यासाठीसुद्धा त्या काळय़ा आईच्या पार पोटात शिरून नाही नाही तेवढं संपूर्ण पाणी उपसलं आहे. आमचं आम्हीच वाटोळं केलं आहे. त्यामुळे तुला काय दोष द्यावा? चूक आमचीच आहे.
पण पावसा, तू निर्दयी होऊ नकोस.
तुझ्याव्यतिरिक्त आम्हाला कोणीच नाही.
फक्त एकच मागणं,
प्रिय पावसा, आता तरी जा!

आपली प्रतिक्रिया द्या