विश्वचषक विजेते न्यूझीलंडच, पंचांची चूक किवींना भोवली

205

माधव गोठोसकर

रविवारी विश्वचषकाचा अंतिम सामना झाला त्यात चौकार जास्त मारल्यावरून इंग्लंडला विजयी घोषित केले गेले. कारण पहिला डाव आणि सुपर ओव्हर यात बरोबरी झाली. त्यामुळे नियमानुसार हा निर्णय दिला गेला. मुळात सामना टाय झालाच नसता जर ओव्हर थ्रो झाला तेव्हा पंच धर्मसेना यांनी 6 धावा जाहीर केल्या नसत्या. मुळात पाच धावाच दिल्या गेल्या पाहिजे होत्या. नियम 19 प्रमाणे धावा जमा करताना त्यातील कलम 7 ओव्हर थ्रोबद्दल म्हणते की, या धावा देताना 2 फलंदाजांची स्थिती पाहायला हवी. जर फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल तर ती धाव जमा केली जाते. इथे दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज जवळ होते. त्यामुळे दुसरी धाव न धरता एक धाव अधिक चौकार अशा पाच धावा द्यायला पाहिजे होत्या. म्हणजे इंग्लंडचा स्कोअर 240 झाला असता आणि न्यूझीलंड विजेते ठरले असते. मात्र धर्मसेनाचे त्याकडे दुर्लक्ष झाले. आणि फलंदाज एकमेकांना ओलांडले आहेत की नाहीत हे स्क्वेअरलेग पंचांनी (इरॅसमस) पाहायला पाहिजे होते. मात्र दोघेही दबावाखाली असावेत म्हणून त्यांचे दुर्लक्ष झाले. इतकेच नव्हे तर अनुभवी सामनाधिकारी रंजन मदुगले यांचेसुद्धा तिकडे दुर्लक्ष झाले. प्रख्यात आंतरराष्ट्रीय पंच ऑस्ट्रेलियाचे सायमन टौफेल जे आता प्रशिक्षक आहेत. त्यांनीसुद्धा धर्मसेना यांची चूक झाली असे मत नमूद केले आहे. आता या चुकीमुळे न्यूझीलंडला विश्वचषकाला मुकावे लागले. दुसरे म्हणजे चौकार जास्त मारले त्यावर विजेते ठरवणे चुकीचे आहे. हा नियम बदली करायला हवा. दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले असते तर काय झाले असते? अर्थात इतक्या वर्षांनी विश्वचषक मिळवायची न्यूझीलंडला आलेली संधी पुन्हा येईल का? त्यामुळे नुसता संघच नव्हे तर प्रेक्षक आणि न्यूझीलंडचे रहिवासी हळहळत असतील.

(लेखक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या