
>> रणजीतसिंह देशमुख
‘राजहंस’ हे संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या उत्पादनांच्या ब्रॅण्डचे नाव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘राजहंस’ हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यातील सहकारी डेअरी उद्योगातील नामांकित ब्रॅण्ड बनला आहे. संगमनेर दूध संघाद्वारे दररोज सरासरी चार लाख लिटर दूध संकलित होते. ‘राजहंस’ची दुग्धजन्य पदार्थांची विस्तृत श्रेणी असून कमी आणि दीर्घ कालावधीसाठी टिकणारे अनेकविध पदार्थ सुसज्ज, स्वच्छ सुविधांमध्ये प्रक्रिया करून उत्पादित (आयएसओ प्रमाणित/एचएसीसीपी अनुपालन) केले जातात.
नगर जिह्यातील संगमनेर तालुक्यात ‘संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघा’च्या स्थापनेपासून दुग्ध व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. या क्षेत्रातील अग्रगण्य दुग्धशाळा असल्याने संगमनेर तालुका सहकारी दूध संघाने दुष्काळ प्रभावित शेतकऱयांना तारले. ‘राजहंस’ दुधाला गेल्या 43 वर्षांचा वारसा आहे. ‘राजहंस’कडे नगर जिह्यातल्या संगमनेर तालुक्यातील सुमारे 50 हजार दूध उत्पादक आणि शेतकरी यांचे विस्तीर्ण जाळे आहे. या विस्तृत नेटवर्कद्वारे संघ कार्यक्षेत्रात जवळपास 250 डीसीएस (दुग्धशाळा सहकारी संस्था) समाविष्ट आहेत, ज्यात दररोज सुमारे 4 लाख लिटर दूध गोळा केले जाते आणि विविध दुग्धजन्य उत्पादनांमध्ये त्याचे रूपांतर केले जाते.
दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनासाठी अद्ययावत तांत्रिक संसाधने आणि आवश्यक सहाय्य प्रदान करण्यासाठी राजहंस सातत्याने सक्षम आहे. आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आणि अन्न-सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीच्या अंमलबजावणीसह राजहंस सतत प्रभावीपणे कार्यरत आहे.
‘राजहंस’मध्ये दररोज 15 टन उत्पादन क्षमतेचा दूध भुकटी प्रकल्प आणि त्यापूर्वीच एक टन क्षमतेसह सर्वात आधुनिक चीज उत्पादन संयंत्र स्थापित केले गेले असून उत्पादन प्रक्रिया जोमाने सुरू आहे.
बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने संगमनेर तालुका सहकारी दूध संघ आज महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकपर्यंत देदीप्यमान व्यावसायिक प्रगती करत आहे. या वर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात दुधाबाबतदेखील मोठे संकट निर्माण झाले. सर्वप्रथम शेतकऱयांची काळजी करताना शासनाने दहा लाख लिटर अतिरिक्त दुधाची खरेदी सुरू करून शेतकऱयांना दिलासा दिला आहे.
देशाच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनातील एक महत्त्वपूर्ण घटक अशी मान्यता दुग्ध व्यवसायाला मिळाली आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय यांत एक अनोखा परस्परसंबंध आहे. शेतीमुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो आणि जनावरांच्या दुधापासून तूप, पनीर, दूध पावडर, दही अशी कितीतरी उत्पादने तयार होतात. प्रत्येकाच्या दैनंदिन आहारात किमान एक ग्लास दुधाचा समावेश असावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या लढय़ात आपली प्रतिकारशक्ती चांगली राहील.
राज्यव्यापी मार्गदर्शक
मनमिळावू, शांत आणि संयमी स्वभावामुळे तसेच रचनात्मक कार्यातून महाराष्ट्र राज्याच्या विविध खात्यांना नवी दिशा देऊन लोकाभिमुख काम करणारे, स्वच्छ प्रतिमेचे कार्यकुशल नेतृत्व म्हणजे राज्याचे विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात ऊर्फ दादांच्या संस्कारात तयार झालेल्या बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व, पारदर्शकता, गतिमानता आणि लोकाभिमुखता या सर्व कसोटय़ांवर खरे ठरले आहे. सहकार महर्षी दादांनी शेतकऱयांच्या व गोरगरीबांच्या विकासासाठी सहकाराचा राजमार्ग निवडला. तालुक्यात सहकारी संस्थांची व शैक्षणिक संस्थांची उभारणी करून आर्थिक परिवर्तन घडवून आणले. संगमनेरातील सहकार फुलवला. दादांच्या विचारांची व संस्कारांची कास धरून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार राज्याला मार्गदर्शक ठरतो आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, इंजिनीअरिंग कॉलेज, अमृतवाहिनी बँक, शेतकी संघ, शॅम्प्रो, सह्याद्री शिक्षण संस्था, अमृतवाहिनी शेतकी सहकारी शिक्षण संस्था आपल्या गुणवत्तेमुळे राज्यात अग्रेसर ठरल्या आहेत. सहकारातून संगमनेरचा सर्वांगीण विकास करताना बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गावोगावी अनेक विकासकामे झाली. दूध सोसायटय़ा, पतसंस्था, शैक्षणिक संस्था इ. सक्षमपणे कार्यरत आहेत. खेडोपाडी, वाडय़ावस्त्यांवर आधुनिक बदल झाले आहेत.































































