इतिहासाच्या पानातून – पहिले महायुद्ध अमेरिकेचे ‘दोन चेहरे’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अॅड. प्रतीक राजूरकर

पहिल्या महायुद्धात सुरुवातीला अमेरिका सहभागी झाली नव्हती. अमेरिकन जहाज ल्युसिटानिया हे जर्मन नौदलाने बुडविल्यानंतरही अमेरिका तटस्थच होती. नंतर मात्र जर्मनीने मेक्सिकोला अमेरिकेविरोधात पाठविलेला एक चिथावणीखोर संदेश अमेरिकेला पहिल्या महायुद्धात उडी घेण्यास कारणीभूत ठरला. अर्थात, दुसऱया विचारप्रवाहानुसार पहिले महायुद्ध समुद्रात लढले न जाता फक्त जमिनीवरच लढले गेले असते तर अमेरिकेच्या व्यापारी हितसंबंधांना धक्का बसला नसता आणि कदाचित अमेरिका महायुद्धापासून अलिप्तच राहिली असती. कारणे काहीही असली तरी पहिल्या महायुद्धात अमेरिकेचे ‘दोन चेहरे’ जगासमोर आले हे नक्की!

शालेय परीक्षेत एखाद्या ऐतिहासिक घटनेचे तात्कालिक कारण विशद करा हा प्रश्न हमखास विचारला जातो. इतिहासात जवळ जवळ प्रत्येक घटना, प्रसंगाला कुठले तरी तात्कालिक कारण निमित्त ठरले. या तात्कालिक कारणांनी जगाचा इतिहास आणि भूगोलात अनेकदा बदल झाले. शालेय परीक्षेतील गुणात्मक प्रश्न हा जागतिक स्तरावर किती महत्त्वाचा आहे याची प्रचीती इतिहासाच्या पानोपानी आढळते. एखाद्या तात्कालिक कारणामुळे अनेक दूरगामी परिणाम झाल्याचे बघायला मिळतात. अमेरिकेचाच विचार केल्यास आज युद्धाच्या वल्गना करणारी अमेरिका पहिल्या महायुद्धात जवळजवळ तीन वर्षे सहभागी झाली नव्हती. 1914 साली सुरू झालेल्या पहिल्या महायुद्धात अमेरिका 1917 साली संयुक्त राष्ट्रांच्या बाजूने सहभागी झाली.

वास्तविक युरोपातील युद्धात अमेरिकेने सहभागी होण्याचे सकृतदर्शनी काहीच कारण नव्हते. युद्ध सुरू झाल्यावर अमेरिका संयुक्त राष्ट्र व जर्मनीसमवेत व्यापारात अधिक समाधानी होते. जर्मनीसमवेत व्यापारात अमेरिकेचा फारसा जम बसला नव्हता. इंग्लंड, फ्रान्स, संयुक्त राष्ट्रे अमेरिकेची नियमित गिऱहाईके होती. 1915 साली अटलांटिक समुद्रामार्गे अमेरिकेतून ब्रिटनकडे जाणारे ल्यूसिटानिया नामक व्यापारी जहाज जर्मनीच्या नौदलाने बुडवले. त्या जहाजावर असलेल्या 128 अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. शंभर वर्षांपूर्वीच्या अमेरिकेने त्याविरोधात जर्मनीला निषेधाची काही पत्रे पाठवून आपला रोष प्रकट केला. इतकी मोठी घटना होऊनही अमेरिकेने युद्धापासून स्वतःला अलिप्त ठेवले याचे आज अनेकांना आश्चर्य वाटेल. प्रत्यक्षात ही घटना अमेरिकेचे युद्धात सहभागी होण्यास निमित्त न ठरता केवळ वातावरण निर्मिती करणारी ठरली. झालेल्या घटनेसाठी जर्मनीची दिलगिरी स्वीकारून अमेरिका युद्धापासून अलिप्तच राहिली.

जर्मनीच्या परराष्ट्र सचिव आर्थर झिम्मरमॅन्न यांनी 16 जानेवारी 1917 रोजी मेक्सिकोच्या प्रशासनाला एक तार केली. तारेत मेक्सिकोने जर्मनीच्या बाजूने अमेरिकेविरोधात युद्ध पुकारावे, युद्धाचा सर्व खर्च व अमेरिका युद्धात पराभूत झाल्यावर अमेरिकेच्या ताब्यातील न्यू मेक्सिको, टेक्सास, ऍरिझोना हे प्रांत मेक्सिकोला परत मिळवून देण्याची हमी देण्यात जर्मनीने दिली होती. जर्मनीने मेक्सिको प्रशासनाला पाठवलेला गुप्त संदेश उघड करण्यात ब्रिटनला यश आले. ब्रिटनने अमेरिकेविरोधात जर्मनीने सुरू केलेल्या गुप्त योजना उघड करून अमेरिकेला अप्रत्यक्षपणे युद्धात सहभागी होण्याची एका प्रकारे चिथावणीच दिली होती. अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावे यासाठी दबाव वाढू लागला. जर्मनीने मेक्सिकोला पाठवलेली गुप्त तार ब्रिटनच्या पथ्यावर पडली आणि अमेरिकेचे पहिल्या महायुद्धात सहभागी होण्यास निमित्त ठरली. एप्रिल 1917 साली अमेरिकेच्या संसदेत युद्धात सहभागी होण्याचा निर्णय मान्य झाला. अमेरिकेचे युद्धात सहभागी होणे जागतिक स्तरावर लोकशाहीच्या स्थापनेला चालना देणारे ठरेल असे मत व्यक्त करून राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी 6 एप्रिल रोजी युद्धाची घोषणा केली.

काही अभ्यासकांच्या मते जर्मनीने अमेरिका मेक्सिकोदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न कारणीभूत असल्याचे विश्लेषण केले आहे, तर काही अभ्यासकांनी यामागे अमेरिकेचा व्यापार कारणीभूत असल्याचे लिहिले आहे. 1916 पर्यंत अमेरिकेने युद्धात सहभागी नसताना ब्रिटन व इतर राष्ट्रांच्या समवेत 1.2 अब्ज डॉलरचा व्यापार केला होता. समुद्रामार्गे व्यापारासाठी अमेरिकेला हा सर्वात अनुकूल मार्ग होता. पहिले महायुद्ध जर केवळ जमिनीवर लढले गेले असते तर कदाचित पहिल्या महायुद्धात अमेरिकेची तटस्थ बाजू कायम राहिली असती. अमेरिकेच्या व्यापारी मार्गात युद्धाचा अडसर येऊ लागल्याने अमेरिकेने युद्धाचा मार्ग निवडला असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. अमेरिका कम्युनिस्ट विचारांची नसली तरी ‘सर्व समस्यांचे मूळ अर्थकारणात दडलेले आहे’ हे कार्ल मार्क्सचे सूत्र अमेरिकेला तंतोतंत लागू पडते.

पहिल्या महायुद्धात सहभागी झाल्यावर युद्धाच्या अखेरीस नोव्हेंबर 1918 पर्यंत अमेरिकेचे 50 हजार सैनिक ठार तर दोन लाख जखमी झाले. जून 1917 साली अमेरिकन सैन्याची पहिली तुकडी युद्धभूमीवर उतरल्यावर पुढच्या प्रत्येक दिवसाला अमेरिकेचे दहा हजार सैनिक युद्धात सहभागी होत होते. युद्धात अमेरिकेचा शस्त्र्ाास्त्र्ाांच्या व्यापारात प्रचंड वाढ झाली. बलशाली राष्ट्र म्हणून अमेरिकेला जागतिक ओळख प्राप्त झाली. पहिल्या महायुद्धानंतर झालेला वर्सेलिसच्या तहात अमेरिकेचा वरचष्मा होता. वर्सेलिसच्या तहात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष विल्सन यांनी 14 सूत्रांची मांडणी केली. जगात पहिल्यांदा औपचारिकपणे संयुक्त राष्ट्र ही संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणामुळे अमेरिका संयुक्त राष्ट्रांची सदस्य होऊ शकली नाही. तो एक स्वतंत्र विषय ठरेल. जर्मनीविरोधात संयुक्त राष्ट्रांनी मोठय़ा प्रमाणात निर्बंध लादले. अभ्यासकांच्या मते जर्मन नागरिकांच्या पराभूत मानसिकतेतून हिटलरचा उदय होण्यास वर्सेलिस तह निमित्त ठरला. हिटलरचा नुसता जर्मनीतच उदय झाला नाही तर पुढल्या वीस वर्षांत जगाला दुसऱया महायुद्धाची झळ बसली. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली यांच्यात महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा बळावली. ही महत्त्वाकांक्षा पुढे दुसऱया महायुद्धानंतर अधिक प्रकर्षाने दिसू लागली. त्यातील स्पर्धक बदलून रशियाचा उदय झाला. अमेरिका पहिल्या महायुद्धात सहभागी झाली नसती तर कदाचित हे चित्र वेगळे ठरू शकले असते. जागतिक स्तरावर अमेरिकेचा उदय राजकारणाला कलाटणी देणारा ठरला. 1917 सालापर्यंत अमेरिका पहिल्या जागतिक महायुद्धात सहभागी होण्यास अनुकूल नव्हती. 1918 साली पहिले महायुद्ध संपूनही अमेरिकन संसदेने 1921 साली एक ठराव घेऊन जर्मनी विरोधातील युद्ध संपुष्टात आल्याची औपचारिक घोषणा केली. एक मात्र खरे, पहिल्या महायुद्धात पहिल्यांदा अमेरिकेचे दोन चेहरे जगासमोर आले.