ठसा – जगन्नाथ कुंटे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नर्मदा परिक्रमेला आपल्या लिखाणातून लोकप्रिय करणारे लेखक जगन्नाथ कुंटे यांचे निधन सर्वांनाच चटका लावून गेले. त्यांच्या ‘नर्मदे हर हर’ या पुस्तकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. कुंटे यांनी 2006 मध्ये संन्यास घेतला तेव्हापासून ते कुटुंबासोबत नव्हते. स्वामी अवधूतानंद या नावाने ते ओळखले जायचे.

कुंटे यांचा जन्म 15 मे 1943 रोजी झाला. ते कतार येथे काही वर्षे वास्तव्यास होते. कुंटे यांनी खूपसे लिखाण केले, पण ते प्रकाशित झाले नाही. तीन नर्मदा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पहिले पुस्तक लिहिले. सामाजिक भान आणि आध्यात्मिक जाण ठेवून मोकळ्या मनाने त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केली. नर्मदा किनारी सुरू असलेल्या मेधा पाटकर यांच्या कामाबद्दल त्यांनी तळमळीने लिहिले आणि त्याच सहजतेने साधनेतील अनुभवही त्यांनी कथन केले. त्यांच्या ‘नर्मदे हर हर’ या एका पुस्तकाच्या 24 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. प्राजक्त प्रकाशनाने 2005 मध्ये प्रकाशित केलेल्या या पुस्तकाला अफाट लोकप्रियता मिळाली. कुंटे यांच्या ओघवत्या आणि भारावून टाकणाऱ्या लेखनशैलीचे हजारो चाहते निर्माण झाले. पुढच्या परिक्रमेनंतर त्यांनी ‘साधनामस्त’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर 2006 मध्ये त्यांनी संन्यास घेतला. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य वाचक व साधक यांच्या घरी, नदी किनारी किंवा आश्रमात असे. गेली पाच-सहा वर्षे त्यांचे वास्तव्य कोथरूड येथील प्रमोद कुलकर्णी यांच्या घरी होते. कुंटे यांना मधुमेहाचा त्रास होता. त्यांच्या  प्रसिद्ध झालेल्या ‘साधनामस्त’, ‘नित्यनिरंजन’, ‘कालिंदी’, ‘धुनी’ या पुस्तकांच्या प्रत्येकी दहापेक्षा जास्त आवृत्त्या निघाल्या आहेत. नऊ वर्षांच्या खंडानंतर 2019 मध्ये ‘प्रकाशपुत्र’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. पहिले पुस्तक नागिणीच्या पिल्लासारखे असेल हे त्यांचे शब्द ‘नर्मदे हर हर’ पुस्तकाच्या लोकप्रियतेने खरे ठरले. पुरस्कारासाठी पुस्तक पाठवण्याला त्यांचा विरोध होता. त्यांची राज्यभर व्याख्याने गाजली. एक पुस्तक वाचले की सगळी पुस्तके विकत घेणारा वाचक वर्ग त्यांनी वेगळ्या लेखन शैलीने तयार केला. पत्रकारिता ते साधक असा त्यांचा विलक्षण प्रवास होता. या सर्व पुस्तकांना वाचकांचा, साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाह्य प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची, साधनेतील जीवन चिंतनाची, अनुभवांची शोधयात्रा त्यांनी या सगळ्या पुस्तकांतून शैलीदारपणे सांगितली. नर्मदा परिक्रमेवर अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने होत. साधुत्वाच्या नावाखाली चाललेल्या बुवाबाजीवर ते परखड टीका करत असत. संप्रदायातीत एक वैचारिक उदारता त्यांच्यामध्ये होती. अध्यात्म म्हणजे मनाचा विकास, असे ते मानत. नर्मदा किनारी असलेल्या शाळांना ते आर्थिक मदत करत. अन्य समाजापयोगी कामांनाही त्यांनी सढळ हाताने मदत केली. त्याची कधीही वाच्यता केली नाही. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे दहा वर्षांपूर्वी टिळक स्मारक मंदिरात झालेल्या मुलाखतीला अफाट गर्दी झाली होती. काही प्रेक्षक टिळक रस्त्यावर थांबून होते, अशी आठवण गॅलरीचे संचालक रमेश राठिवडेकर यांनी सांगितली. त्यांच्या पुस्तकांना आजही जगभरातून मागणी आहे.

  • मेधा पालकर