लेख : राष्ट्रीय युवा संपत्ती-एक चेतना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनायक श्रीधर अभ्यंकर

सध्या समाजात ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती बळावत असून बहुसंख्य यांत्रिकपणे वागून आत्मसंतुष्ट व आत्मकेंद्रित झाला आहे. सर्वांना सामावून घेत पुढे जाणे व स्वतःबरोबर इतरांना घडवणे हा खरा राष्ट्रधर्म आहे. त्याकरिता मनामध्ये ‘हे राष्ट्र माझे आहे’ ही वृत्ती जोपासणे, बळावणे हे युवकांच्याच मनगटाला शक्य व साध्य असते. फक्त तशी वृत्ती आत्मिक अंतरंगात निर्माण झाली पाहिजे. या देशात अनेक युवकांनी स्वार्थत्याग करून, प्रसंगी प्राणार्पण करून युवक धर्म स्वीकारला आहे.

जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर असणाऱ्या हिंदुस्थानात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. हिंदुस्थानला महासत्ता बनवणे अर्थातच या तरुणांच्या हातात आहे. राष्ट्राच्या तारुण्यात शिस्त, परिश्रम, अभ्यासू वृत्ती व संघर्ष करण्याची धमक असेल तर ते राष्ट्र विकासात अग्रेसर होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेले हे राष्ट्र केवळ कठोर परिश्रमामुळे उद्योगधंद्यात अग्रणी आहे. तारुण्यात युवकांनी मनात आणले तर भगीरथ प्रयत्नांतून आपल्या शहरात समृद्धीची गंगा उतरवू शकतात.

खरे तर सध्याची परिस्थिती पाहिली तर युवकांना अनेक संधी, पर्याय व बहुसंख्य क्षेत्राची उपलब्धता आहे. त्या सर्व बाबींचा सुयोग्य उपयोग करून घेतल्यास स्वतःबरोबर कुटुंबाची आर्थिक प्रगती करून घेता येईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त झाल्यास आयुष्याला चांगले वळण लागते, पण त्यासाठी परिश्रम व प्रयत्नांचा पाठपुरावा सतत करत राहणे, ज्ञानलालसेने झपाटून अपेक्षित ज्ञान मिळवणे हे ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करणे महत्त्वाचे आहे. संशोधक वृत्ती ही जीवनाला जोडली तर अनेक नवे शोध लागून सामाजिक संपन्नता प्राप्त होते. धनप्राप्ती व कौटुंबिक सौख्य हेच उद्दिष्ट ठेवून पुढे जाणे यात पुरुषार्थ नसून राष्ट्रीय उभारणीला कटिबद्ध होणे यात खरा ‘युवक धर्म’ समावलेला आहे.

अभ्यासाबरोबरच शारीरिक क्षमता हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. मेंदूला बलदंड शरीराची जोड असेल तर कोणतेही आव्हान लीलया पेलता येते. शारीरिक व्याधी या परिश्रमामधला अडसर आहे. लोकमान्य टिळकांनी एक वर्ष अभ्यासातून रजा घेऊन तालीमबाजी करून प्रथम शारीरिक संपदा कमावली हे प्रसिद्ध आहे. आजचा तरुण संगणकासमोर तासन् तास बसून असतो. शारीरिक हालचाली मर्यादित झाल्यामुळे सुस्तावतो, बौद्धिकदृष्टय़ा थकतो याबाबत विचार व्हावा. मी रशिया, जपानमध्ये गेलो असताना तेथील युवक कामावर आला की, प्रथम सांघिक कवायत करतो व मग दैनंदिन व्यवहार सुरू होतो. इतर बाबीत आम्ही परकीयांचे अनुकरण करतो तर याबाबत का नाही? शालेय शिक्षणाची इतिश्री झाली की, व्यायाम ठप्प! हे अपेक्षित नाही.

जगातल्या काही उत्पादनांचे राष्ट्रीयीकरण करून अनेक देशांनी त्या-त्या उत्पादनात मक्तेदारी निर्माण केली आहे. ज्याला ‘ब्रॅण्ड’ असे संबोधतात. हिंदुस्थानी युवकांनी आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करून दैनंदिन जीवनातील उपभोग्य वस्तूंबाबत संशोधन करून दर्जेदार वस्तू उत्पादित केल्या तर हिंदुस्थान त्याबाबत स्वयंस्फूर्त होऊन राष्ट्राचे परकीय चलन वाचेल आणि आर्थिक क्षेत्रात काही प्रमाणात स्वायत्तता येईल. चीन, जपान इत्यादी देशांतून आयात होणाऱ्या वस्तू बंद होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाल्याने अनेक गुन्हे, अपप्रवृत्तींना लगाम बसेल. हा प्रयत्न संरक्षणात्मक संशोधनात झाला तर देशाचे राष्ट्रप्रहरी आत्मनिर्भर होऊन ‘सामरिकदृष्टय़ा’ हिंदुस्थान बलवान होईल. हे फार गरजेचे आहे.  दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. कलाम यांचा आदर्श युवकांनी अंगीकारावा. त्यामुळे वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक प्रगती होऊन हिंदुस्थान 2020 पर्यंत नक्कीच महासत्ता होईल. तसे उद्दिष्ट, ध्येय युवकांनी स्वीकारावे.

सध्या समाजात ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती बळावत असून बहुसंख्य यांत्रिकपणे वागून आत्मसंतुष्ट व आत्मकेंद्रित झाला आहे. सर्वांना सामावून घेत पुढे जाणे व स्वतःबरोबर इतरांना घडवणे हा खरा राष्ट्रधर्म आहे. त्याकरिता मनामध्ये ‘हे राष्ट्र माझे आहे’ ही वृत्ती जोपासणे, बळावणे हे युवकांच्याच मनगटाला शक्य व साध्य असते. फक्त तशी वृत्ती आत्मिक अंतरंगात निर्माण झाली पाहिजे. या देशात अनेक युवकांनी स्वार्थत्याग करून, प्रसंगी प्राणार्पण करून युवक धर्म स्वीकारला आहे.

इथे एक किस्सा आठवला. तो मननीय आहे. आमचे एक नौसेना सरखेल अमेरिकेच्या सदिच्छा दौऱ्यावर गेले असताना त्यांना अमेरिकन अधिकारी ‘नासा’मध्ये घेऊन गेले. त्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रश्न केला, ‘‘ऍडमिरल, आपल्याला  ‘नासा’मध्ये व आपल्या शहरामध्ये काही साम्य दिसते का?’’ हिंदुस्थानी ऍडमिरल क्षणाचाही विलंब न लावता उत्तरले, ‘‘मला तर वाटते की मी जणू सदाशिव पेठेतच उभा आहे.’’

या प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते की, हिंदुस्थानी युवकांच्यात जागतिक स्तरावर कौशल्य, बुद्धिमत्ता असून ती हिंदुस्थानबाहेर धनसंचयासाठी धाव घेते. हे थांबले पाहिजे. युवकांनी थोडा स्वार्थत्याग करून आपले कौशल्य stand up
India ला समर्पित करावे. राष्ट्रीय प्रगती व विकासासाठी हे मोलाचे सहाय्य ठरेल. सर्वच बाबतीत सरकार, समाज यांच्यावर अवलंबून राहणे व अपेक्षा करणे याने आत्मोन्नती साधत नसते. आपले ते सर्व कनिष्ठ दर्जाचे हा भाव सोडून प्रत्येक राष्ट्रीय आचार, विचार डोळसपणे स्वीकारावा. हिंदुस्थानी अनेक विचार आज जागतिक स्तरावर स्वीकारार्ह असताना ‘आपले ते आपले’ समजून घ्यावे. आध्यात्मिक, श्रमिक, वैज्ञानिक, सामाजिक इत्यादी प्रत्येक क्षेत्र हे हिंदुस्थानींनी समृद्ध केले आहे. त्यातील प्रासंगिक त्रुटी दूर करून ते ज्ञान पुढे नेणे हे युवकांच्याच हातात आहे.

‘खरा दागिना’ नावाचा धडा आम्हाला लहानपणी शिक्षकांनी शिकवला. शाळेत आरोग्य तपासणी असते. इनामदारांचा बंडय़ा अंगावर खूप दागिने घालून येतो अतिशय कृश शरीराचा तर पाटलांचा खंडय़ा स्वच्छ कपडे, गुटगुटीत शरीराचा उभा राहतो. दोघांची बौद्धिक परीक्षा होते. परीक्षक विचारतात ‘‘मुलांनो खरा दागिना कोणता?’’ मुले उत्तरतात ‘‘इनामदारांचा बंडय़ा’’ परीक्षक म्हणतात ‘‘चूक, गुटगुटीत निरोगी शरीर, तल्लख तैलबुद्धी हाच खरा दागिना!’’

युवकांनी स्वतःमध्ये लपलेला कर्तृत्ववान, सचेतन आत्मा ओळखायला हवा. त्याला कार्यान्वित करायला हवे. यश आपोआप पायाशी लोळण घेईल.

(लेखक माजी लष्करी अधिकारी आहेत.)