
>> विद्या कुलकर्णी
घुबड. बाहुल्यासारखा रेखीव चेहरा… टपोरे डोळे. लक्ष्मीचे हे वाहन शेतकऱयाचा खरा मित्र…
घुबड हे संपत्ती, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्य यांचे प्रतीक मानले जाते. घुबड हा सर्वांत बुद्धिमान निशाचर असून त्याला भूत आणि भविष्य दोन्हीचे ज्ञान असते अशी समजूत आहे. घुबड हा शिकारी वर्गातील प्रमुख पक्षी आहे.
घुबडाच्या डोळ्यांची रचना गोल नसून टय़ुबसारखी असल्यामुळे ते एखाद्या दुर्बिणीप्रमाणे दूरपर्यंत बघू शकतात. घुबडाला तीन पापण्या असतात, त्यातील एक झोपण्यासाठी आणि एक डोळ्याला साफ ठेवण्यासाठी असते. मोठय़ा डोळ्यांमुळे ते रात्रीसुद्धा स्पष्ट बघू शकतात, परंतु जवळचे मात्र त्यांना धूसर दिसते. घुबड डोळे हलवू शकत नाहीत म्हणून आजूबाजूला बघण्याकरिता डोके हलवितात. घुबडाच्या मानेत 14 मणके असल्यामुळे त्याची मान 270 अंशामध्ये फिरू शकते.
घुबडाची ऐकण्याची क्षमतादेखील अतिशय उत्तम असते. त्यांचे कान डोक्यावर वेगवेगळ्या अंतरावर असल्यामुळे ध्वनीलहरींमधील थोडासा फरकही त्यांना जाणवतो व सावजाचे अचूक ठिकाण हेरण्यास मदत होते. घुबडाच्या चेहऱयाभोवती असलेली पिसेसुद्धा ध्वनीलहरींना दहापट मोठे करून कानापर्यंत पोहचवतात. पंखांच्या विशेष क्षमतेमुळे ते हवेत सरळ रेषेत वर उडू शकतात व त्यावरील पिसांच्या रचनेमुळे उडताना आवाजही होत नाही.
काही घुबड त्यांच्यापेक्षा छोटय़ा आकाराच्या घुबडांची शिकार करतात. शेतातील उंदीर, साप, विंचू, लहान-मोठे किडे हे घुबडांचे आवडते खाद्य . घुबड पिल्लांना अन्न देताना भेदभाव करतो, सशक्त पिल्लांना दिल्यावरच कमजोर पिल्लांना देतो!
ठिपकेवाला घुबड
ठिपकेवाला घुबड रंग करडा-तपकिरी असतो व त्यावर पांढरे ठिपके असतात. डोके गोल-वाटोळे असते आणि मानेवर तुटक पांढऱया रेषा असतात. चोच बाकदार असून डोळे पिवळे असतात. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतीच्या छिद्रात, कडेकपारीत असते. अंडी उबविण्यापासून पिलांच्या संगोपनापर्यंत सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
रानपिंगळा घुबड
रानपिंगळा हे पक्षी महाराष्ट्रात व मध्य प्रदेशात खूप मोठया प्रमाणात आढळतात. यांचे डोके गोलसर आकाराचे असून सबंध शरीरावर आडव्या रेखा असतात. खालील बाजूस पांढरट व तपकिरी रंगाचे पट्टे असतात. मादी एका वेळेस चार अंडी देते.
हुमा घुबड
हुमा घुबड हे धुरकट-राखाडी रंगाचे असून डोळे मोठे व लालसर पिवळ्या रंगाचे असतात. हुमा घुबड बसल्यावर डोक्यावरील पिसे शिंगासारखी वर, एकमेकांजवळ येतात. हुमा घुबडाची जोडी एकदा जमली की, कित्येक वर्षे एकाच ठिकाणी राहते. नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ त्यांच्या प्रजननाचा असून मादी एकावेळी 2 ते 3 पांढऱया रंगाची अंडी देते. सहसा पाण्याजवळच्या उंच झाडावर, काटक्यांच्या मदतीने हे पक्षी आपले घरटे बांधतात.
तपकिरी वन घुबड
तपकिरी वन घुबडाची वरचा भाग तपकिरी रंगाचा असून खांद्यांवर अस्पष्ट पांढरे ठिपके असतात. खालचा भाग फिक्कट पिवळ्या रंगाचा असून त्यावर तपकिरी रंगाच्या रेषा असतात. चेहरा लालसर- तपकिरी असून त्याला पांढऱया रंगाची कडा असते. झाडांच्या भोकात किंवा दोन फांद्यांच्या बेचकीत मादी एकावेळी दोन अंडी घालते.
छोटय़ा कानाचे घुबड
छोटय़ा कानाचे घुबड हे मध्यम आकाराचे घुबड असून लांबी डोळे व डोके मोठे असून मान बुटकी व पंख व्यापक असतात. चोच मजबूत, छोटी व बाकदार असून काळ्या रंगाची असते. डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळामुळे काजळ घातल्याप्रमाणे डोळे दिसतात. कच्छच्या रणामध्ये या घुबडाचे फोटो काढताना जमिनीवर पालथे झोपून काढले!!
मी फोटोग्राफीसाठी आतापर्यंत ताडोबा, रणथंबोर, ससन गीर अशा अनेक जंगलात फिरले आहे. प्रत्येक जंगलात घुबडांची जागा साधारण ठरलेली असते, तेथील स्थानिक मार्गदर्शक त्याबद्दल सांगू शकतात. झाडांच्या ढोलीतले आपल्याकडे टक लावून बघणारे घुबड कॅमेऱयात टिपण्यात खूप मजा येते.

























































