
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
आखाती देशांमधील पाकिस्तानचे दूतावास आयएसआयकरता वेगवेगळी कामे करण्याच्या जागा आहेत. हिंदुस्थानीयांना पाकिस्तानच्या बाजूने काम करण्याकरता, भरती करण्याची ठिकाणे आहेत. आखाती देशांमध्ये आलेले हिंदुस्थानी पर्यटक आणि इतरांवर नजर ठेवून काहीजणांना त्यातून पाकिस्तानचे हस्तक बनवले जातात. म्हणून शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या कारवाईवर पूर्ण नजर ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
हिंदुस्थानी दूतावासाच्या अधिकाऱयांशी पाकिस्तानची बेकायदेशीर हरकत मागच्या आठवडय़ामध्ये दिल्लीत पाकिस्तानी दूतावासाच्या दोन अधिकाऱयांना हेरगिरी करताना पकडल्यानंतर हिंदुस्थानने यांची तत्काळ हकालपट्टी केली व त्यांना देश सोडून देण्याचे आदेश देण्यात आले. हे आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणेच होते, कारण परदेशी मुत्सद्दी व दूतावासाचे कर्मचारी यांना राजनैतिक संरक्षण मिळालेले असते. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकत नाही. पण त्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानने इस्लामाबाद येथील हिंदुस्थानी मुत्सद्दी व कर्मचाऱयांना त्रास देणे सुरू केले. या वेळेस पाकिस्तानने असभ्यतेचा कळसच केला.
एक अधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हर हिंदुस्थानी दूतावासातून विमानतळाकडे निघालेले असताना अकस्मात गायब झाले. फोनवरूनही त्यांच्याशी संपर्क होईना. त्यामुळे दूतावासाने स्थानिक पोलिसांकडे आणि पाकिस्तान सरकारकडे तक्रार केली. लगेच हिंदुस्थान सरकारने दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱयांना परराष्ट्र खात्यात बोलवून त्यांना जोरदार तक्रार केली. लगेच पाकिस्तान सरकारने या दोघांविरुद्ध खोटय़ानाटय़ा तक्रारी सुरू केल्या. पाकिस्तानच्या प्रतिनिधींना कानपिचक्या देण्यात आल्यानंतर त्यांच्या अपहरणाच्या बातम्या पाकिस्तानच्या माध्यमात झळकायला लागल्या. मग त्यांना गुप्तहेर ठरवले गेले आणि त्यांचे अपहरण करणाऱया पोलीस आणि पाकिस्तान हेरखात्याने पुरवलेल्या बातम्या माध्यमात झळकायला लागल्या. बारा तासांनतर त्या दोघांची मुक्तता करण्यात आली. हिंदुस्थानने टाकलेल्या दबावामुळे पाकिस्तानला हे करावे लागले.
पाकिस्तानचे नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधले दूतावास हे तिथे पाकिस्तानच्या हस्तकांना हिंदुस्थानविरुद्ध कारवाई करण्याकरिता पैशाची मदत, प्रोत्साहन आणि इतर को-ऑर्डिनेशन करण्याची ठिकाणे आहेत. इथून अनेक हिंदुस्थानविरोधी कारवाया केल्या जातात. पाकिस्तान अनेक दहशतवाद्यांना विमानाने नेपाळमध्ये आणून नंतर रोडने नेपाळच्या हद्दीतून हिंदुस्थानात घुसवतो. कारण हिंदुस्थान-नेपाळ सीमेवर जास्त चौकशी होत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये नेपाळमधून हिंदुस्थानात घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांची संख्या ही पाकिस्तानच्या एलओसीवरून आलेल्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त आहे. आखाती देशांमधील पाकिस्तानचे दूतावास आयएसआयकरता वेगवेगळी कामे करण्याच्या जागा आहेत. हिंदुस्थानीयांना पाकिस्तानच्या बाजूने काम करण्याकरता, भरती करण्याची ठिकाणे आहेत. आखाती देशांमध्ये आलेले हिंदुस्थानी पर्यटक आणि इतरांवर नजर ठेवून काहीजणांना त्यातून पाकिस्तानचे हस्तक बनवले जातात. म्हणून शेजारी राष्ट्रांमध्ये असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या कारवाईवर पूर्ण नजर ठेवणे अतिशय गरजेचे आहे.
पाकिस्तानी राजदूत नियुक्त केलेल्या देशाचा वापर हिंदुस्थानात अराजकता माजविण्यासाठी करतात हे सर्वश्रुत आहे. खासकरून बनावट हिंदुस्थानी चलनी नोटा आणि दहशतवाद्यांना पाठविण्यासाठी यजमान देशांचा वापर केला जातो. जानेवारी 2015 मध्ये बांगलादेशातील सहाय्यक व्हिसा अधिकारी मोहम्मद मजर खान याला बांगलादेशाने बनावट चलनी नोटांच्या प्रकरणी अटक केली होती. हिज्ब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेच्या ते संपर्कात होते. पाकिस्तान उच्च आयोगातील दुसरी सचिव फारिन अर्शद हिलासुद्धा 2015 मध्ये जमात-उल-मुजाहिद्दीन (जेएमबी) या दहशतवादी संघटनेच्या इदरीस शेख याच्याशी संबंध असल्याच्या कारणावरून काढून टाकण्यात आले होते.
2009 ते 2016 श्रीलंकेत असणाऱया पाकिस्तान उच्च आयोगाचा समुपदेशक (व्हिसा) अमीर जुबैर सिद्दिकी याच्यावर अणुभट्टय़ा, संरक्षण आस्थापन, चेन्नईमधील अमेरिकन दूतावास, बेंगळुरूमधील इस्रायली दूतावास आणि इतर हिंदुस्थानी बंदरांवर हल्ला करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
नेपाळमधील पाकिस्तान दूतावासातील मोहम्मद अर्शद चीमा याला एप्रिल 2001 मध्ये काठमांडू पोलिसांनी 1 किलो आरडीएक्ससह अटक केली होती. डिसेंबर 1999 च्या इंडियन एअरलाइन्सच्या आयसी 814 च्या विमान अपहरणात त्याचा हात होता.
मग यापुढे काय करायला पाहिजे? आपण पाकिस्तानमधल्या आपल्या कर्मचाऱयांचे रक्षण कसे करू शकतो असे प्रश्न समोर येतात. लक्षात असावे की, पाकिस्तानचा हिंदुस्थानातला दूतावास हे हिंदुस्थानातल्या पाकिस्तानी हस्तकांना कंट्रोल करण्याचे एक ठिकाण आहे आणि अनेक गुप्तहेर ऑपरेशन्स तिथून केली जातात. अर्थातच त्यांच्यावरती हिंदुस्थानी गुप्तहेर संस्थांचेसुद्धा लक्ष असते, ज्यामुळे यांना वेळोवेळी पकडले जाते. मात्र पकडले गेल्यानंतर पाकिस्तानमधील हिंदुस्थानी दूतावासाच्या कर्मचाऱयांच्यावर घेतला बदला जातो. पाकिस्तानच्या दूतावासामध्ये पोस्टिंग झालेल्या हिंदुस्थानी कर्मचाऱयांना पाकिस्तान नेहमीच त्रास देत असतो. त्यांच्या कुटुंबीयांचा पाठलाग करणे, त्यांच्या गाडीला धडक मारणे, त्यांच्या घरामध्ये चोरी करणे, त्यांच्या फोनवर लक्ष ठेवणे आणि फोनवरून त्यांना धमक्या देणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या जातात. याचे मुख्य कारण त्यांच्यावर मानसिक दबाव टाकून त्यांना आपले काम नीट करता येऊ नये. अनेक वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी करूनसुद्धा पाकिस्तानची ही हरकत थांबलेली नाही. म्हणून हिंदुस्थानी दूतावासातील कर्मचाऱयांची सुरक्षा हा नेहमीच एक आव्हानाचा विषय राहिलेला आहे.






























































