
>> गणेश आचवल
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत सध्या एक नवीन वळण आले असून ती काही वर्षे पुढे ढकलली आहे. त्यात दीपिका व कार्तिकी यांच्या मित्राच्या म्हणजे आर्यनच्या भूमिकेत मेघन जाधव आपल्यासमोर आला आहे.
मेघन जाधव म्हणजे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील जयदीपची भूमिका करणाऱ्या मंदार जाधवचा धाकटा भाऊ. मेघनने बालपणापासून सातत्याने या क्षेत्रात काम केले आहे. ‘सलाम दी सॅल्यूट’ या मराठी चित्रपटात त्याने बालकलाकार म्हणून पदार्पण केले. त्यानंतर ‘बंडू बॉक्सर’, ‘सलाम बच्चे’, ‘जोर लगा के हय्यो’ अशा हिंदी चित्रपटांत तो बालकलाकार म्हणून चमकला. 2009 मध्ये आलेल्या ‘जय श्रीकृष्णा’मधील त्याची श्रीकृष्णाची भूमिका गाजली.
त्याचे शालेय शिक्षण शारदाश्रम हायस्कूल, तर कॉलेजचे शिक्षण चर्चगेट येथील के. सी. कॉलेजमध्ये कला शाखेत झाले. कॉलेजला असतानाच मेघन अनेक हिंदी मालिकांत काम करत होता. ‘तेरे लिये’ आणि ‘सास बिना ससुराल’ मालिकांत त्याने उत्तम भूमिका केल्या. ‘ब्रदर्स’ या हिंदी चित्रपटात त्याने अक्षय कुमारच्या टीनएजमधील भूमिका केली, तर ‘चाहतो मी तुला’ या मराठी चित्रपटातून त्याने प्रमुख भूमिकेत पदार्पण केले. ‘सूर्यपुत्र कर्ण’मध्ये तो ‘अभिमन्यू’ होता. ‘राधाकृष्ण’, ‘तेनाली राम’, ‘विघ्नहर्ता गणेशा’, ‘थोडासा बादल थोडासा पानी’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्येसुद्धा त्याच्या भूमिका लक्षात राहणाऱ्या होत्या. मग एवढी कामे करून मराठीत उशिरा का आलास, याबद्दल मेघन म्हणतो, ‘‘मला मराठी मालिकांत काम करायचे होतेच, पण मी चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होतो. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत मी ‘आर्यन’ ही भूमिका करतोय. आर्यनच्या वेगळय़ा शेड्स तुम्हाला लवकरच दिसतील.’’



























































