वितळती हिमशिखरे शुभ्र पर्वताची…!

673

>> रविराज गंधे

’मत्स्यगंधा’ नाटकातील रामदास कामत यांनी गायलेलं ‘साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची!’ हे गाजलेलं नाटय़गीत आजही रसिकांना भुरळ घालीत आहे. हिमशिखरे अन् बर्फाच्छादित डोंगर-दऱया पर्यटकांना अन् साधकांना कायम आकर्षित करीत राहिले. आत्मिक सुखाचा आणि शांती-समाधानाचा अलौकिक अद्भुत अनुभव -आनंद देणारी पृथ्वीच्या पाठीवरील बर्फाच्छादित भूमी आता झपाटय़ाने वितळायला लागली आहे आणि म्हणूनच ‘’वितळती हिमशिखरे शुभ्र पर्वताची’ असं म्हणण्याचे दुर्दैव मानवजातीवर ओढवले आहे.

गेल्या महिन्यात पर्यावरणाच्या जगतातील मानवजातीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करणारी एक महत्त्वपूर्ण दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे अलास्कामधील आइसलॅन्ड प्रदेशातील 700 वर्षे पुरातन असलेला व पर्यटकांचा आकर्षणबिंदू ठरलेला ओकजोकुल okjokull हा ग्लेशिअर (हिमनग) पूर्णपणे वितळून मृत झाल्याचे हवामान शास्त्र्ाज्ञांनी 18 ऑगस्ट रोजी जाहीर केले. यानिमित्ताने तिथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात आईसलॅन्डचे प्रधानमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एका फलकाचे अनावरण करण्यात आले. त्या फलकावर ‘ओकजोकुल हा आद्य पहिला ग्लेशिअर तापमान वाढीचा बळी ठरून मृत झाला आहे. येणाऱया 200 वर्षांत सर्व हिमनग याच गतीने नष्ट होतील,’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. या घटनेमुळे जगातल्या हवामान अभ्यासकांनी व पर्यावरण शास्त्र्ाज्ञांनी मोठय़ा प्रमाणावर शोक आणि चिंता व्यक्त केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या ठिकाणी असलेल्या कार्बन उत्सर्जनाची 415 पीपीएम या पातळीची नोंदही आवर्जून करण्यात आली आहे. प्रदूषित हवेचे मोजमाप करताना 150पीपीएम उत्तम हवा, 200 पीपीएम सर्वसाधारण आणि 250 ते 300 पीपीएम प्रदूषित हवा अशी प्रतवारी केली जाते. खरंतर आईसलॅन्डमधील बर्फ वितळण्यास 1914 पासूनच सुरुवात झाली होती. त्याची तीक्रता आता  झपाटय़ाने वाढली आहे. दोन दशकांपूर्वी आईसलॅन्ड, ग्रीनलॅन्ड येथे फारसे प्रदूषण व तापमानात वाढ नव्हती. परंतु गेल्या अडीच दशकांत तेथील सरकारांनी आणि स्थानिक लोकांनी, व्यावसायिकांनी पर्यटनाला मोठी चालना व प्रोत्साहन दिले. तेच तेथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. दुसरे कुठले उद्योग  व्यवसाय त्या ठिकाणी फारसे नाहीत. त्यामुळे लाखो पर्यटक या ठिकाणांना भेटी देऊन प्रदूषणाला हातभार लावीत आहेत. हे हिमनग आता लवकरच वितळणार म्हणून ते पाहण्यासाठी युरोपीय प्रवासी कंपन्यांकडे मोठय़ा प्रमाणावर पर्यटक सहलींची नोंदणी करीत आहेत.

नॅशनल वेदर सर्व्हिसेस National Weather Service या संस्थेच्या पाहणीनुसार 1980 सालापासून हवामानातील तापमान हे उच्चांकी राहिले आहे. शिवाय जुलै महिन्यात सर्वाधिक उष्ण तापमान असते असे आढळले आहे. आईसलॅन्डमध्ये जवळपास 150 स्वेअर किलोमीटर्स परीघात पसरलेले बर्फ प्रतिवर्षी 1100 कोटी टन या वेगाने वितळते आहे. या प्रक्रियेत छोटी-मोठी हिमनगे व बर्फाच्छादित आवरणे Ice-sheets वितळत प्रचंड मोठय़ा प्रमाणात पाणी समुद्रात मिसळून समुद्राची पातळी जवळपास 20 फुटांनी वाढण्याची भीती शास्त्र्ाज्ञांनी व्यक्त केली आहे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याची प्रक्रिया ही कमी अधिक प्रमाणात सारखीच आहे. पेरू देशातील सुप्रसिद्ध pastorumi glacier ला दरवर्षी जवळपास एक लाख पर्यटक भेट देतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. या ठिकाणी वितळणाऱया बर्फामुळे जवळपास 7 ते 8 इंचांनी समुद्राची पातळी वाढल्याचे पाहणीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण जगभरात होणाऱया तापमान वाढीच्या प्रकोपामुळे जीवसृष्टी, शेती, प्राणीजीवन हे धोक्यात आले आहे.

जगातील 40 टक्के लोकवस्ती ही समुद्रकिनारी वसलेली आहे. या भागातील किमान 100 कि.मी. अंतरापर्यंत राहणारे जनजीवन आणि उद्योग व्यवसाय हे समुद्राच्या वाढणाऱया पातळीमुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबईसह जगातील आठ मोठय़ा शहरांचा समावेश आहे. मालदीव, मियामी बेटे  तर अगदी नजीकच्या काळात पाण्याखाली जाणार असल्याने तेथील सरकारांनी स्थलांतराची व पुनर्वसनाची योजना तयार केली आहे.

अलास्का येथील बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेमुळे सर्वांत मोठा धोका हा तेथील जीवसृष्टीला झाला आहे. या भागातील पशु-पक्षी-मासे यांना पाण्याच्या बदललेल्या तापमानाशी जुळवून घेणे कठीण जाऊ लागल्याने त्यांच्या वीणीचा आणि अंडी घालण्याचा हंगाम अनियमित झाला आहे. गेल्या वीस वर्षांत येथील व्हेल माशांची पैदास कमी झाल्याचे आढळले आहे. पशु-पक्षी-प्राणी हे बदलत्या हवामान व परिस्थितीनुसार नैसर्गिक निवडीच्या तत्त्वानुसार स्वतःमध्ये परिस्थितीजन्य बदल घडवून आणतात हे जरी खरे असले तरी या प्रक्रियेस हजारो वर्षांचा कालावधी लागतो. 2-3 दशकांत झपाटय़ाने होणाऱया बदलात हे संभवत नाही. जगातील मोठी लोकसंख्या ही मासे खाते. किंबहुना प्रथिनांसाठी तोच त्यांचा आहार असतो. अशा जवळपास 200 कोटी लोकांची अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते असा अहवाल युनायटेड नेशन्सनी आपल्या पाहणीत दिला आहे.

ध्रुवीय प्रदेशात ज्या प्रमाणात तापमान वाढ होऊन बर्फ वितळत आहे ते पाहता भूतलावर लवकरच बर्फाचा दुष्काळ पडणार आहे. पाण्याच्या दुष्काळापेक्षा भीषण आणि दूरगामी परिणाम पृथ्वीवरील जनजीवनावर होणार आहे. सागरी वादळे, नद्यांना येणारे महापूर, अतिवृष्टी किंवा अनावृष्टी तसेच टोकाचा तीक्र उन्हाळा वा हिवाळा असे अनेक हवामानातील बदलाला हिंदुस्थानसह सर्व देश सामोरे जात आहेत. हिंदुस्थानच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक म्हणजे आपला मोसमी पाऊस. त्याचं तापमान हे दक्षिण ध्रुवावरील हिमनगांवर अवलंबून असते. हे हिमनग हिंदी आणि पॅसिफिक महासागरात येऊन समुद्राच्या पाण्यातील तापमानात बदल होऊन हिंदी महासागर तापतो. नंतर त्याची वाफ तयार होऊन ढगांच्या रूपाने हिंदुस्थानात ते येऊन बरसतात. त्यात अनियमितता निर्माण झाली तर अतिवृष्टी वा अनावृष्टीचे परिणाम भोगावे लागतील. या वर्षीच्या मोसमी पावसाच्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातल्या अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन असंख्य लोक मृत्युमुखी पडले. शेती-व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. आता पाणी हेच जीवन असं म्हणण्याऐवजी पाणी हेच मरण असं दुःखाने म्हणण्याची वेळ आली.

अलास्का आईसलॅन्ड, ग्रीनलॅन्ड, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील देशांना उत्तर धुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचा मोठा धोका यानिमित्ताने समोर आला आहे. गल्फ स्ट्रीम हा उष्ण सागरी प्रवाह कॅनडा, युरोप, अमेरिकेला पोषक ठरतो. त्यामुळे इंग्लंड, आर्यलॅन्ड तसेच युरोपचा समुद्र या पाण्याच्या उष्ण प्रवाहाने गोठत नाही. हा उष्ण सागरी प्रवाह विषववृत्तावरील प्रदेशात पाणी तापून तयार होतो. या प्रवाहात उत्तर धुवीय प्रदेशातील बर्फ वितळून गार पाणी मिसळले तर समुद्रकिनारे गोठण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही ध्रुवावरील बर्फाछादित प्रदेश अबाधित राहणे नितांत गरजेचे आहे. अंटार्टीका आणि आर्टिक प्रदेशांच्या खालोखाल बर्फाचा मोठा साठा हिंदुस्थानातील हिमालयात आहे. 1500 कि.मी. लांबीपर्यंत पसरलेल्या भव्य हिमालयामध्ये असंख्य हिमशिखरे आणि हिमनग आहेत. गंगोत्री, सियाचीन, पिंडारी आदी अनेक हिमनाग तापमानवाढीमुळे प्रभावीत होत आहेत. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासानुसार हिमालयाच्या शिखरांची एकूण उंची ही सरासरी दरवर्षी अर्धा मीटरने कमी होत असल्याचे सांगण्यात आले. कोटय़वधी टन बर्फाचा ऱहास होत आहे. येथील हिमशिखरांमुळे गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, या अनेक नद्यांना बारमाही मोठय़ा प्रमाणावर पाणी असते. बर्फातील हे पाण्याचे प्रचंड साठे जर तापमानवाढीचे बळी ठरले तर हिंदुस्थानातील या नद्यांच्या तीरावरील शेती व जनजीवनाचे तसेच जीवसृष्टीचे मोठे नुकसान होऊ शकते.

आपल्यापासून हजारो किमी दूर असलेल्या दोन्हीकडील ध्रुवीय प्रदेशांमधील पर्यावरणीय घडामोडींची सर्वसामान्यांना फारशी कल्पना नसते. त्यामुळे या अनुषंगाने मोठय़ा प्रमाणावर जनजागरण होणे गरजेचे आहे. तसेच प्रचंड वेगाने वाढणाऱया नागरीकरणाला, वाहन आणि उद्योगांमधील प्रदूषणाला लगाम घालून ग्रीन हाऊस गॅसेसचे प्रमाण कमी करणे ही आजची प्राथमिकता आहे. यासाठी सर्वसामान्य लोकांची आणि राजकीय मंडळींची इच्छाशक्ती गरजेची आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आपण सर्वांनी अवलंब करणे हे आपले कर्तव्य आहे.

पाणीपुरवठय़ावर गंभीर परिणाम

जागतिक तापमानवाढीमुळे आणि कार्बन उत्सर्जनामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याचा मोठा परिणामही पाण्यावर होणार आहे. पृथ्वीवरील 70 टक्के भूभाग हा समुद्राच्या खारट पाण्याने व्यापला आहे. त्यातील फक्त 3 टक्के पाणी हे पेयजल म्हणजे पिण्यायोग्य आहे. जे नद्या-तलाव व तळय़ांमध्ये तसेच अन्य जलस्रोतांमध्ये साठवलेले आहे. भविष्यकाळात समुद्राची पातळी एक ते दीड मीटरने वाढण्याची शक्यता अभ्यासक वर्तवितात. बर्फातील पाण्याच्या साठय़ातून नद्यांचे पाणी टिकून असते. बर्फ संपत चालले तर पाणीपुरवठय़ावर गंभीर परिणाम होणार आहे. आज आफ्रिका, कतार, इस्राएल, लेबनॉन आदि अनेक देशांत ‘भीषण’ पाणीटंचाई आहे. भविष्यकाळात पाण्यावरून देशांदेशांमध्ये युद्धं होतील असं भाकीत अभ्यासकांनी केलं आहे. हा अनर्थ टाळायचा असेल तर सर्वांनी याचा गांभीर्याने विचार करणे अगत्याचे आहे. अन्यथा पृथ्वीवरील उर्वरित 30 टक्के भूभाग हा भविष्यकाळात ग्लासातील पाण्यात टाकलेल्या बर्फाच्या खडय़ासारखा पाण्यात अलगद विरघळत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराणात सांगितला जाणारा प्रलय तो हाच असेल का?

(लेखक ः माध्यमतज्ञ – पर्यावरण अभ्यासक आहेत.)

आपली प्रतिक्रिया द्या