
>> सुधीर कनगुटकर
देहू रोड परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शाळकरी मुलाच्या दप्तरामध्ये कोयता आढळल्याचे वृत्त शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत चिंताजनक बाब आहे. आपल्या शेजारील बाकावर बसलेला वर्गमित्र दप्तरात वह्या-पुस्तकांऐवजी कोयता घेऊन येतो या विचारानेच शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असेल. बालमनावरील परिणाम अभ्यासावरील चित्त विचलित करतात. अशा घटना ज्यावेळी घडतात त्यावेळी सर्वच नाही, परंतु काही पालकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत असते. शाळेच्या मधल्या सुट्टीत व शाळा सुटल्यावर शाळेतील परिसरात विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवणे शिक्षकांचे कर्तव्य ठरते. आजकालच्या मुलांवर संस्कृतीबाह्य परिणाम होत आहेत ते काही बॉलीवूड चित्रपटातील दृश्यांचे. चित्रपटगृहाच्या बाहेर झळकत असलेले हिंदी भाषिक चित्रपटांचे पोस्टर्स मुलांच्या बालमनावर दुष्परिणाम करतात. काही अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये ‘भाई’ बनण्याची घाई झाल्याचे दिसून येत आहे हा त्यामधील एक महत्त्वाचा दुष्परिणाम. शालेय जीवनातील मुलांचा स्वभाव व मनाचा कल ओल्या सिमेंटसारखा असतो. जडणघडणीचा जसा आकार पालक व गुरुजनांकडून दिला जाईल, तसा ठसा त्यांच्या वागणुकीत उमटतो. घरातील पालकवर्ग दूरदर्शनवरील बीभत्स व कुसंस्कारांनी युक्त मालिका पाहण्यात व्यर्थ वेळ वाया घालवत असतील तर त्या मालिकांतील निरर्थक व वादग्रस्त संवाद नकळत घरातील मुलांच्या कानावर पडत असतात. त्यातून निर्माण होणारे मानसिक कुसंस्कार कृतीत उतरतात. अशा मुलांची वागणूक शाळेतील इतर हुशार विद्यार्थ्यांच्या प्रगतीला मारक ठरते. इंग्रजीत एक सुविचार आहे, It’s easy to be wise after the event. अशा घटनांमधून जाणत्यांनीदेखील धडा घेणे आवश्यक आहे. शालेय जीवनातील विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होण्यासाठी शालेय पाठांबरोबरच संत विचारांची तसेच व्यावहारिक बोधकथांची शिकवण देणे आवश्यक आहे. तशी काळाची गरजच झाली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे उत्तम भवितव्य घडण्यास मदत होईल.






























































