ठसा – सुब्रता दत्ता

1474

>> नवनाथ दांडेकर

जमशेदपूरचा ‘स्ट्राँग मॅन’ ते ‘पॉवरलिफ्टिंगचे पितामह’ हा त्यांचा प्रवास आजच्या युवा पिढीसाठी खरोखरच प्रेरणीयच ठरणार आहे. देशात पॉवरलिफ्टिंग या खेळाची पाळेमुळे घट्ट रुजवून जगात हिंदुस्थानचा तिरंगा अभिमानाने फडकावणारे सुब्रता दत्ता यांचे नुकतेच वयाच्या 73व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बिस्तुपूर या त्यांच्या गावी देहावसान झाले. सारे आयुष्यच खेळ आणि खेळाच्या विकासासाठी वाहणारे दत्ता यांनी आपल्या क्रीडा कारकीर्दीत अनेक मानाचे ‘किताब पटकावले आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग जेतेपद पटकावणारे हजारो क्रीडापटू घडवले. पोलादी देहयष्टीचे दत्ता मनाने अतिशय हळवे होते, आपल्या शिष्यांना त्यांनी मुलांसारखे जपले. म्हणूनच ते देशभरात ‘गोरादा’ म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

हिंदुस्थानात पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग आणि शरीरसौ…व या तिन्ही क्रीडा प्रकारांत राष्ट्रीय विजेतेपद पटकावण्याचा भीमपराक्रम दत्ता यांनी केला होता. हिंदुस्थानला क्रीडा जगतात मानाचे स्थान मिळवून द्यायचे हा ध्यास कायम मनात ठेवणारे दत्ता हे खऱया अर्थाने पॉवरलिफ्टिंगचे पितामह ठरले. कारण देशात या खेळाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. देशात अनेक हरहुन्नरी पॉवरलिफ्टर आणि वेटलिफ्टर घडवताना या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघटनांवर त्यांनी आपली हिंदुस्थानी छाप सोडलीं. महाराष्ट्राचे ‘व्यायाममहर्षी’ मधुकर दरेकर आणि सुब्रता दत्ता यांच्यात जिगरी मैत्री होती. पॉवरलिफ्टिंग खेळाच्या विकासासाठी स्वत:ला आयुष्यभर वाहून घेण्याची शपथच या दोन जे… क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षकांनी घेतली होती. दत्ता हे पॉवरलिफ्टिंग खेळात पहिलाच अर्जुन पुरस्कार मिळवणारे क्रीडापटू म्हणून सर्वांनाच आदरणीय होते. तीन खेळांत आपली चमक दाखवणारे दत्ता यांना ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग क्षेत्रात सन्मानाचे स्थान असणारे सुब्रता दत्ता हे आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत आशियाई पॉवरलिफ्टिंग महासंघाचे महासचिव म्हणून कार्यरत होते. आपल्या 44 वर्षांच्या क्रीडा कारकिर्दीत दत्ता यांनी देशात 26 आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते. हिंदुस्थानी पॉवरलिफ्टिंग महासंघाचे महासचिवपद 29 वर्षे सांभाळणारे सुब्रता दत्ता हे पॉवरलिफ्टिंगचे चालतेबोलते आणि फिरते कार्यालयच होते. त्यांनी देशात अनेक गुणवंत पॉवरलिफ्टर्स आणि वेटलिफ्टर्स घडवले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच अनेक होतकरू क्रीडापटूंना बँका, सरकारी खाती आणि खासगी उद्योगात नोकऱया मिळाल्या. देशात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके मिळवणाऱया क्रीडापटूंसाठी ‘गोरादा’ हे मोठे मदतकेंद्रच होते. पॉवरलिफ्टिंग क्षेत्राला सुगीचे दिवस आणून देणारा क्रीडा संघटक म्हणून दत्ता यांचे नाव खेळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल इतके त्यांचे प्रचंड योगदान आहे.

क्रीडा क्षेत्रातील या बाहुबलीने आपल्या पिळदार शरीरयष्टीने सर्वानाच मोठी भुरळ घातली होती. अतिशय सामान्य स्थितीतून असामान्य पराक्रम साकारणारे दत्ता हे केवळ झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील युवा पॉवरलिफ्टर आणि शरीरसौ…वपटूंसाठी ‘आयकॉन’ ठरले आहेत. बंगाली सिनेनिर्माते संदीप बॅनर्जी यांनी बनवलेला ‘पॉवर आयकॉन ‘ हा लघुपट देशभरात भरपूर गाजला होता. देशाच्या या ‘आयर्न मॅन’ने क्रीडा क्षेत्रात अनेक मानाचे पुरस्कार पटकावले, पण त्याचा अहंकार मात्र कधी बाळगला नाही. आपल्या खेळासाठी अगदी तळागाळापर्यंत जाऊन त्यांनी गोरगरीब क्रीडापटूंना मोलाचे सहकार्य केले. म्हणूनच ‘गोरादा’ त्यांच्या शिष्यांचे लाडके पितामह म्हणून ओळखले जातात. शक्ती, विनम्रता आणि जिगर या गुणांचा त्रिवेणी संगम असलेल्या या महान क्रीडा प्रशिक्षकास देश मुकल्याची भावना त्यांच्या निधनानंतर शिष्यगण आणि क्रीडा जगतातून व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या