ठसा – प्राचार्य प्रतापराव बोराडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय भ. कुलकर्णी

छत्रपती  संभाजीनगर येथे कमलकिशोर कदम अध्यक्ष असलेल्या महात्मा गांधी मिशनच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना झालेली होती. सेलूजवळील पाटोदा येथील शेतकरी कुटुंबातून आलेले, पुण्याच्या ‘सीओईपी’मध्ये अभियांत्रिकी पदवी घेतलेले तसेच आयआयटी पवई येथून पदव्युत्तर पदविका प्राप्त झालेले प्रताप बोराडे सर त्यावेळेस संभाजीनगर येथे स्वतःच्या स्पॅडमा प्लॅस्टिक या उद्योगाची मुहूर्तमेढ रोवत स्थिरावत होते. नातेसंबंधाचा थोडा फायदा घेत जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्यपद स्वीकारण्याची त्यांना गळ घातली गेली. त्यांनीही तात्पुरती सोय म्हणून ते कबूल केले. येथून या विभागातील व्यावसायिक शिक्षणाच्या इतिहासपर्वाची सुरुवात झाली. एसेम जोशी, बापूसाहेब काळदातेसारख्यांचा परीसस्पर्शाने अनुभवसंपन्न झालेला हा प्राचार्य आपण तात्पुरते आलो होतो, हे विसरूनच गेला.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानत मातृहृदय आणि प्रयोगशीलता अशा जगावेगळय़ा भूमिकेतून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी एक चैतन्य निर्माण केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी गणवेश आणला. हा प्रयोग नवीन होता. पुढे हळूहळू बहुतेक महाविद्यालयांनी हे स्वीकारले. 1980 च्या दशकात उद्योजकता प्रशिक्षण नावीन्यपूर्णच होते. ‘एम.टेक.’सारख्या नामांकित राष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनाला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची उपस्थिती ही बाबही नवी होती. टेक्नोफेअर हे मुलांनी केलेल्या प्रोजेक्टस्चे प्रदर्शन गॅदरिंगचा अविभाज्य भाग होता. राझमताज हे गॅदरिंग केवळ महाविद्यालयापुरते मर्यादित न राहता ते सांस्कृतिक आकर्षण झाले. सुरुवातीला रिझल्ट कितीही कमी लागला तरी चालेल, पण शून्य कॉपी धोरण त्यांनी राबवले. जे पाहून परिसर अचंबित झाला. सगळे लेक्चर नियमित होतात आणि सगळा अभ्यासक्रम पूर्ण होतो असे महाविद्यालयीन जीवनात यापूर्वी अभावानेच घडे ते प्रत्यक्षात उतरले. लायब्ररी 24 तास चालू व तेथे रात्रभर अभ्यास करणारे विद्यार्थी तितक्याच सहजतेने आणि सुरक्षित भावनेने लायब्ररीत रात्रभर बसणाऱ्या विद्यार्थिनी हे चित्र अद्भुत होते. ‘जेएनईसी कल्चर’ असा नवीन शब्दप्रयोग रूढ झाला. विद्यार्थ्यांना 24 तास उपलब्ध असलेला प्राचार्य मिळाला, कुणाला तो मित्र, कुणाला मार्गदर्शक आणि चूक केली तर हिटलरही वाटू लागला. पाहता पाहता महाराष्ट्रात या प्राचार्यांच्या कार्यशैलीच्या पाऊलखुणा उमटत गेल्या.

विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेत अक्वल येऊ लागले. टेक्निकल इव्हेंट्स, खेळ, क्विझ, नाटक, कविता, वक्तृत्व, गीत, संगीत अशा सर्वच क्षेत्रांत जेएनईसी हे नाव आदराने घेतले जाऊ लागले. या सर्वात एक समान धागा होता, तो होता शिस्तीचा. खरं म्हणजे बीड, धाराशिव जिह्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि दिल्ली, शिमला, मुंबई येथून आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित घडविणे हे सोपे नव्हते. काहींना शिस्तीचा बडगा, काहींना आईची माया, काहींना मित्रत्वाची वागणूक असे करत त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी एक वैयक्तिक रेशीम बंध ते जोडत गेले. आपण या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहोत, आपण सरांचे विद्यार्थी आहोत याची विद्यार्थ्यांना प्रतिष्ठा वाटू लागली. कोणावरही येथे अन्याय होणार नाही, कुठलाही दुजाभाव होणार नाही याची खात्री वाटू लागली. होमी सेठना, दिलीप चित्रे, गोविंदभाई श्रॉफ, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, मधुर बजाज, सी. पी. त्रिपाठी अशा तंत्रज्ञान, उद्योग आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या अनुभवाने विद्यार्थ्यांचे आकाश उंचावू लागले.

अर्थात या सर्व बाबतीत कल्पकता, प्रयोगशिलता याचा मिलाफ होता. एमजीएम व्यवस्थापनाने याला पाठबळ दिले आणि यादरम्यान सहकाऱ्यांचे आत्मभान जागृत करत एक नवे पर्व सुरू झाले. आजही महाविद्यालयात याच त्यांच्या पावलांचे ठसे मार्गदर्शक असून त्यामुळेच कदाचित मागच्या वर्षी एमजीएम व्यवस्थापन, माजी विद्यार्थी, हितचिंतकांनी त्यांच्या याच पावलांचे ठसे कायमस्वरूपी प्रवेशद्वारापाशी जतन करून ठेवले आहेत आणि हो त्यांचे हजारो विद्यार्थी देश-विदेशांत कर्तृत्वाचे दाखले देत आहेत, हेच या ठशांचे फलित! सरांचा इतका धाक, सरांसाठी इतके प्रेम अजूनही आणि दोन्ही एकदम कसे वाटू शकते, हेच कळत नाही. ‘झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परंतु यासम हाच!’ असा हा जाणता शिक्षक, त्यांच्या आपल्यातून जाण्याने एक विलक्षण असे बोराडेपर्व संपले हेच खरे.

 (लेखक एमजीएम विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत.)