वेब न्यूज – चांद्रयान 3

>> स्पायडरमॅन

अंतराळावर वर्चस्व मिळवण्यासाठी जगभरातील महत्त्वाचे देश सध्या जोरदार प्रयत्न करत आहेत. अनेक वेगवेगळ्या अंतराळ मोहिमा हे देश स्वतःच्या ताकदीवर अथवा इतर देशांशी सहकार्य करून राबवत आहेत. गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानने आपल्या अंतराळ मोहिमांमधील देदीप्यमान कामगिरीने संपूर्ण जगाला थक्क केले आहे. मंगळयान ते चांद्रयान मोहीम असो किंवा इतर देशांची रॉकेट्स अंतराळात प्रक्षेपित करणे असो, हिंदुस्थानने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच चकित केले आहे हे नक्की. सध्या हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो ‘चांद्रयान 3’ या मोहिमेची जोरदार तयारी करत आहे.

‘चांद्रयान 3’ मोहिमेची सध्या बंगळुरूमध्ये वेगाने तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यानाचे पेलोड असेम्बल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारावर जुलै महिन्यात ‘चांद्रयान 3’ लाँच केले जाईल असा निष्कर्ष काढला जात आहे. मात्र या प्रक्षेपणासाठी हवामान स्वच्छ असणे फार महत्त्वाचे आहे. जर हवामान चांगले नसेल तर आणखी विलंब होऊ शकतो. त्यातच नेमका मान्सूनदेखील जुलैमध्ये ऐन भरात असण्याची शक्यता आहे. यापूर्वी कोरोनाच्या साथीमुळेदेखील या मोहिमेला विलंब सहन करावा लागलेला आहे.

या नव्या मोहिमेमध्ये ‘चांद्रयान 2’ मोहिमेच्या दरम्यान झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी इस्रो विशेष काळजी घेत आहे. इस्रोच्या सांगण्यानुसार ‘चांद्रयान 3’मध्ये फक्त लँडर आणि रोव्हर पाठवले जाणार आहेत. ऑर्बिटर पाठवले जाणार नाही. कारण ‘चांद्रयान 3’ हे ‘चांद्रयान 2’च्या ऑर्बिटरच्या संपर्कात आणण्यात येईल. यावेळी इस्रोने ‘चांद्रयान3’चे लँडिंग तंत्रही अशाच प्रकारे विकसित केले आहे. याचबरोबर चंद्रावर असतात तसे बनावट खड्डे बनवण्यात आले होते. या खड्डय़ांमध्ये लँडर आणि रोव्हरची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली. यावेळी लँडर आणि रोव्हरचे सेन्सरही तपासले गेले आहेत, जेणेकरून कनेक्टिव्हिटीबाबत कोणतीही अडचण येऊ नये.