
आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तंत्रज्ञानात इतकी प्रगती केली आहे की, आता घरापासून न्यायालयापर्यंत या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. धकाधकीच्या जीवनात अनेक समस्यांसाठी ते वरदान ठरलं आहे. पण, जसे तंत्रज्ञानाचे फायदे असतात, तसे तोटेही असतात. असाच एक गंभीर प्रकार एका महिलेसोबत घडला आहे.
घराच्या साफसफाईसाठी ठेवलेल्या रोबोने या महिलेचे काही फोटो काढून लीक केले. त्यावेळी ती तिच्या घरातल्या टॉयलेट सीटवर बसली होती. हा रोबो आयरोबो नावाच्या एका कंपनीचा होता. ही महिला त्याच कंपनीची एक कर्मचारी आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना हे रोबो वापरून त्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवण्याचं काम दिलं होतं.
त्यामुळे ती या रोबोला घरी घेऊन आली होती. या रोबोच्या मॉडेलमध्ये जे फोटो घेण्यात येतात, ते नीट येतात का, हा रोबो त्याच्या आसपासच्या वस्तूंना नीट ओळखतो का? हे पाहण्यासाठी त्यात फोटो सिस्टिम देण्यात आली होती. मात्र, या रोबोने भलताच फोटो काढला.
या रोबोत साठणाऱ्या डेटाची तपासणी करणाऱ्या पथकाला हे फोटो मिळाले. त्यामुळे स्केल एआय या तंत्रज्ञान विक्री करणाऱ्या कंपनीने आयरोबोसोबतचं आपलं कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.