नवलच! – आरसा सरोवर!

>> अरूण

खरं तर ही सगळी प्रतिबिंब सरोवरे म्हणायला हवीत. निसर्ग वेळोवेळी जे काही ‘चमत्कार’ घडवतो, त्यातला इंद्रधनुष्याचा अल्पकालीन रंगीत कमानीचा अस्मानी खेळ आपल्याला पावसाळय़ात दिसतो. आपल्या देशात सलग चार महिने ‘धो-धो’ पावसाचे असल्याने प्रत्येकाने कधी ना कधी इंद्रधनुष्य पाहिलेलेच असते. याशिवाय धुक्याच्या पडद्याआड दडलेली वनश्रीही हिवाळय़ात एखाद्या पारदर्शक दुधी काचेआड गेल्यासारखी वाटते.

याशिवाय सूर्याच्या भारित कणांच्या माऱयाने उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्रदेशात दिसणारे ‘अरोरा’ किंवा रंगप्रकाशाचा खेळ फारच मनोहारी असतो. डोळे उघडून निसर्गाचा ‘आस्वाद’ घेण्याची सवड काढली तर त्यातल्या सौंदर्य स्थळांची निवड करायला भरपूर वाव असतो, परंतु भर दिवसाही एसीमध्ये कृत्रिम दिवे लावून साधा सूर्यप्रकाश नाकारणाऱया शहरी ‘संस्कृती’त निसर्गायन कुठलं?

ते जाऊ द्या, यावेळी मिरर सरोवर किंवा प्रतिबिंब जलाशयांची थोडक्यात माहिती घेऊ. एखाद्या मोठय़ा दरीत नदीचे पाणी साकळून अतिशय स्थिर झालेले असेल आणि ते स्वच्छही असेल तर अशा तरंग न उमटणाऱया शांत जलपृष्ठाला आरशाचं रूप येतं. या नितळ, स्तब्ध जलाशयात आसपासच्या डोंगररांगांचं आणि वनश्रीचे अप्रतिम प्रतिबिंब उमटते.

अशी आरशात रूपांतर होणारी सरोवरे जगात मोजकीच आहेत. अमेरिका खंडात ती जास्त आहेत. न्यूयार्क राज्यातील आाडिराण्डक पर्वतराजीमध्ये असे 124 एकर विस्ताराचे सुंदर ‘मिरर लेक’ आहे. दुसऱया प्रकारची प्रतिबिंब तळी अचानक ज्वालामुखीतून उसळलेल्या लाव्हारसाने एखादी नदीच अडवूनही तयार झाली आहेत. लाव्हाचा दगड झाला आणि नदी थबकून ‘गप्प’ झाली. त्या पाण्याला कालांतराने सरोवराचे रूप आले. न्यूझीलंडमध्ये तर एलिन्ग्टन नदीने पात्र अचानक बदलल्याने नदीची दुफळी झाली. त्यातला एक प्रवाह डोंगराने रोखला आणि तिथे प्रतिबिंब तलाव तयार झाला. चीनमध्येही लाव्हारसाने मुडान्जिआन नदी अडवली आणि रोखलेल्या पाण्याचे प्रतिबिंब सरोवर बनले. बोलिबियामध्ये येथे असलेला सालार डी युनी परिसर म्हणजे जगातला सर्वात मोठा नैसर्गिक घट्ट मिठाचा खारा विस्तार असून पावसाचे थोडेसे पाणी त्यावर पडले की, त्याचा एक ‘महाआरसा’ तयार होतो. आसपासच्या पर्वत, टेकडय़ांचे सुंदर प्रतिबिंब त्यात दिसू लागते आणि शेकडो फोटोग्राफर ते दृश्य टिपतात. बेडाघाटचे संगमरवरी पत्थर असेच नर्मदेच्या पात्रात दोन्ही बाजूंनी दिसतात. प्रतिबिंबाची किमया बालकवींच्या ‘औदुंबर’ कवितेत ‘झाकळुनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर’ अशी येतेच.