
‘कष्ट, जिद्द आणि निष्ठा या जोरावर शिवसेनाप्रमुखांचे विचार जोपासत ज्या शिवसेनेची उभारणी झाली, त्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून गेलेल्या गद्दारांना आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये स्वाभिमानी जनता धडा शिकवेल. सच्चे शिवसैनिकही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची ताकद दाखवून देतील,’ असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आज शिवसेना तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, गटप्रमुख व शाखाप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना अरुण दुधवडकर बोलत होते. यावेळी ‘आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांत कोल्हापूर जिल्ह्यातील जागा शिवसेना ताकदीने लढवून जिंकून दाखवेल,’ असा निर्धारही करण्यात आला.
अरुण दुधवडकर म्हणाले, गद्दारांना धडा शिकविण्यासाठी आगामी निवडणुका शिवसैनिक एकजुटीने अथक परिश्रम करून जिंकून दाखवतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनाप्रमुखांचा भगवा फडकवतील. यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी घरोघरी जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार, तसेच शिवसेनेच्या ध्येय-धोरणांची माहिती द्यावी. शाखाप्रमुख, गटप्रमुखांची नोंदणी करून आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाचे शिल्पकार बनूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, सांगलीचे जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, महिला आघाडी संघटक शुभांगी पवार यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.




























































