Hillang Yajik – शरीरसौष्ठवाच्या सौंदर्यानं जिंकलं सोनं, अरुणाचलच्या हिलांग याजिकनं रचला इतिहास

अरुणाचल प्रदेशची महिला बॉडीबिल्डर हिलांग याजिक हिने इतिहास रचला आहे. भूतानच्या थिंपू येथे झालेल्या 15व्या आशियाई शरीरसौष्ठव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धेत हिलांग याजिक हिने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला बॉडीबिल्डर आहे.

भूतानममधील थिंपू येथे 11 ते 15 जून दरम्यान 15 वी आशियाई शरीरसौष्ठव आणि शारीरिक क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत अरुणाचलची महिला बॉडीबिल्डर हिलांग याजिक हिने एक सुवर्ण आणि एक रौप्य अशी दोन पदके जिंकत हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या कामगिरीबद्दल अरुणाचल बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष नबाम टुना यांनी तिचे कौतुक केले. हिलांगच्या यशामुळे जागतिक व्यासपीठावर हिंदुस्थानची मान अभिमानाने उंचावली आहे, असे ते म्हणाले.

भूतान बॉडीबिल्डिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अनेक दक्षिण आशियाई देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला जागतिक बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस फेडरेशन आणि आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस फेडरेशनने मान्यता दिली होती. याच स्पर्धेत हिलांगने तिरंगा फडकावल्याने आगामी काळात शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात आणखी महिला उतरण्याची शक्यता आहे.