मोदींना झोप येत नसल्यामुळेच ते राग-राग करतात, अरविंद केजरीवाल यांचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झोप येत नाही. झोप न येण्यामुळेच ते सतत राग-राग करतात आणि लोकांना तुरुंगात टाकतात. तसे कमी झोपणे हा एक आजार आहे, डॉक्टरांना दाखवा आणि उपचार घ्या, असा टोला लगावत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीत जंतरमंतरवरून ‘मोदी हटाओ, देश बचाओ’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत भाजपकडून सुरू असलेल्या पोस्टरच्या राजकारणावरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी इतके असुरक्षित आणि घाबरले आहेत की पोस्टर चिकटवणाऱयालाही तुरुंगात टाकत आहेत. भगत सिंग यांनी विचारदेखील केला नसेल की, 100 वर्षांनी देशाला असा पंतप्रधान मिळेल जो पोस्टर लावण्याप्रकरणी कलम 138 अंतर्गत गुन्हा नोंदवेल, असे केजरीवाल म्हणाले.

मला एक भाजपवाला भेटला आणि म्हणाला, सर मोदीजी 18 तास काम करतात. ते फक्त तीन तास झोपतात. मी म्हटलं अरे फक्त तीन तास झोपून काम होणार नाही. तर तो म्हणाला की, मोदींना ही दैवी शक्ती मिळाली आहे. मी त्याला म्हटलं अरे ही दैवी शक्ती नाही, हा एक आजार आहे. त्यांना व्यवस्थित पुरेशी झोप घ्यायला सांगा. झोप येत नसेल म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याची त्यांना गरज आहे. मी देवाकडे प्रार्थना करेन की त्यांचं आरोग्य उत्तम राहावे, असे केजरीवाल म्हणाले.

अदानींकडे ईडी-सीबीआयला पाठवले नाही

मनीष सिसोदिया, सत्येंद्र यांच्या घरावरील धाडीत एक पैसाही सापडला नाही, मात्र ते अजूनही तुरुंगात आहेत. अदानींवर अनेक आरोप झाले. पण सरकारने चौकशीही केली नाही. सुप्रीम कोर्टाने स्वतŠ याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली. पण पंतप्रधानांनी त्यांच्याकडे ईडी आणि सीबीआय पाठवले नाही. जर मोदी सुशिक्षित असते तर त्यांनी सिसोदियांना अटक केली नसती, असा टोला केजरीवाल यांनी लगावला.