
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि शिरोमणी अकाली दलावर कडाडून हल्ला चढवला आहे. “पंजाबमध्ये अमली पदार्थांचे जाळे पसरवण्यास भाजप आणि अकाली दलाचे सरकारच जबाबदार असून, त्यांच्या काळातच पंजाबच्या घराघरांत नशा पोहोचवला गेला,” असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये आयोजित एका जाहीर सभेत ते बोलत होते.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, मागील अनेक दशकांपासून पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या पक्षांनी तरुणांच्या भविष्याशी खेळ केला आहे. अमली पदार्थांच्या तस्करीला राजकीय संरक्षण देऊन या नेत्यांनी स्वतःची घरे भरली आणि पंजाबच्या तरुण पिढीला उद्ध्वस्त केले. ज्या हातांमध्ये पुस्तके आणि रोजगार असायला हवा होता, त्या हातांमध्ये या पक्षांनी नशा दिला,” अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
आपल्या भाषणात केजरीवाल यांनी पंजाबमधील विद्यमान भगवंत मान सरकारचे कौतुक केले. ते म्हणाले की, “आमचे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही अमली पदार्थ माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. अनेक बड्या तस्करांना तुरुंगात धाडले असून नशामुक्तीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.”






























































