
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लावलेल्या 50 टक्के टॅरिफमुळे हिंदुस्थानला जोरधार झटका बसला आहे. टॅरिफमुळे हिंदुस्थानला तब्बल 55 ते 60 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 52 लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेच्या 50 टक्के टॅरिफमुळे सर्वात मोठा फटका हा छोटय़ा उद्योगांना बसणार आहे. परंतु ट्रम्प यांच्या या टॅरिफवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप मौन पाळले आहे. त्यावरून आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फटकारत त्यांना एक आव्हान केले आहे.
”आमची मागणी आहे की पंतप्रधानांनी हिंमत दाखवावी. अमेरिका आपल्यावर जर 50 टक्के टॅरिफ लादत असेल तर आपण त्यांच्यावर 75 टक्के टॅरिफ लावायला हवा. संपूर्ण देश तुमच्या मागे ठाम पणे उभा राहिल. मग बघा ट्रम्प कसा झुकतो की नाही ते”, असे आव्हान केजरीवाल यांनी मोदींना केले आहे.
केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी मोदी सरकारच्या अमेरिकेच्या कापासावरील 11 टक्के इम्पोर्ट ड्युटी हटवल्याच्या निर्णयावर देखील टीका केली. ”जर अमेरिकेतून हिंदुस्थानात कापूस आला. तर इथल्या कापूस शेतकऱ्यांना बाजारात 900 रुपयांहून कमी दर मिळेल. हेच आपल्या शेतकऱ्यांसोबत होत आले आहे. अमेरिकेचे शेतकरी श्रीमंत होत आहेत. पण गुजरातचे शेतकरी गरिब होत चालले आहेत’,अशी टीका केजरीवाल यांनी केली.