दक्षिण मुंबईत महायुतीच्या विजयात मलबार हिल ‘लीड’र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात अरविंद सावंत यांची वर्णी लागणार

सामना ऑनलाईन । मुंबई

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीच्या विजयात मलबार हिल मतदारसंघाचा मोलाचा वाटा राहिला. महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत हे 1 लाख 67 मताधिक्याने विजयी झाले. त्यांना दक्षिण मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मलबार हिल मतदारसंघातून सर्वाधिक 58 हजार 567 मतांची लीड मिळाली.

मलबार हिलमधून काँग्रेस आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा यांना चांगली मते मिळतील असा दावा केला जात होता. मागील निवडणुका पाहता तिथे देवरा कुटुंबाला चांगला जनाधार होता, पण तो सावंत यांच्या बाजूने वळला. यात भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या मतदारसंघात मोठय़ा संख्येने असलेली गुजराती, मारवाडी मते लोढा यांच्या अथक प्रयत्नांमुळेच सावंत यांच्याकडे वळली. या मतदारसंघात सावंत यांना एकूण मतांपैकी 56 टक्के म्हणजेच 99,269 मते मिळाली. ही मते सावंत यांच्या विजसाठी महत्त्वपूर्ण ठरली.