आनंद, दु:ख, राग, भीती म्हणजे काय? लहानग्यांना कळेना भावनांचे विश्व

481

चार ते आठ वयोगटांतील राज्यातील बालके अद्याप भावनांच्या विश्वापासून दूर असल्याचे असरने मंगळवारी जारी केलेल्या शैक्षणिक अहवालातून समोर आले आहे. आनंद, दुःख, राग, भीती म्हणजे काय, हे या बालकांना ओळखताच येत नाही. वय वर्षे आठमधील 40 टक्के बालकांना या चारही भावना ओळखणे जड जात आहे. तर चार वर्षांतील 26 टक्के बालकेच या भावना ओळखत आहेत. याशिवाय क्रमवारी, पझल, मोजणी, नमुना ओळख, ऐकण्याची या बाबतीतही निम्म्याहून अधिक बालके मागे आहेत.
शिक्षण क्षेत्रातील प्रथम या संस्थेने ‘असर 2019’ हा देशपातळीवरील अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. देशातील 24 राज्यांतील 26 जिह्यांमधील 4 ते 8 वयोगटांतील 36 हजार 930 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार देशातील 4 ते 8 वयोगटांतील 100 टक्के बालके अद्याप शाळेत जात नाहीत. हे प्रमाण 90 टक्क्यांवर आहे. तसेच सरकारी अंगणवाडय़ा आणि प्राथमिक शाळेतील मुलींच्या संख्या मुलांपेक्षा जास्त आहे. याउलट खासगी प्री-प्रायमरी आणि प्रायमरी शाळेत शिकणाऱया मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

शैक्षणिक पाया भक्कम करण्यात अंगणवाडय़ा मागे

खासगी प्री-स्कूलमध्ये मिळणाऱया शिक्षणाच्या तुलनेत अंगणवाडय़ातील शिक्षण मागे आहे. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यात अंगणवाडय़ा अपयशी ठरत आहेत. चार वर्षांतील 44.2 टक्के तर पाच वर्षांतील 26.3 टक्के बालके अंगणवाडय़ांमध्ये शिकतात, पण खासगी प्री-स्कूलमध्ये शिकणाऱया मुलांच्या तुलनेत या विद्यार्थ्यांचे प्राथमिक ज्ञान आणि शैक्षणिक पाया कमकुवतच आहे.

देशातील विद्यार्थ्यांना अंकांची ओळख नाही

असरच्या अहवालात देशातील विद्यार्थ्यांना अंकांची ओळख नसल्याचे म्हटले आहे. पहिलीतील 26.9 टक्के विद्यार्थ्यांना एक ते नऊपर्यंतचे अंक ओळखता येत नाही. 32 टक्के विद्यार्थ्यांना एक ते 9 पर्यंतचे अंक ओळखता येतात, पण त्यांना 99 पर्यंतच्या अंकांची ओळख नाही. केवळ 41.1 टक्के विद्यार्थ्यांनाच 99 पर्यंतच्या अंकांची ओळख आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 5.6 टक्के, 22.2 टक्के, 72.2 टक्के असे आहे.

  • महाराष्ट्रातील नागपूर जिह्यातील पहिली ते तिसरीत शिकणाऱया विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण असरच्या अहवालात करण्यात आले आहे.
  • नागपुरातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱया पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खासगी शाळांपेक्षा जास्त आहे.
  • नागपुरातील विद्यार्थी पझलमध्ये ओळखण्यात मागे असून त्या तुलनेत नमुना ओळख, क्रमवारी, वाचनक्षमतेत या विद्यार्थ्यांची कामगिरी उजवी आहे.
  • येथील 21.1 टक्के विद्यार्थ्यांना अक्षरांची ओळख नाही, 14 टक्क्यांना शब्द समजत नाहीत. तर दुसरी आणि तिसरीच्या अनुक्रमे 73.6 आणि 84.2 टक्के विद्यार्थ्यांना पहिलीच्या पुस्तकांतील अक्षरे वाचता येतात.
आपली प्रतिक्रिया द्या