
सोलापुर येथे एक आशा वर्कर तिच्या कुटुंबासहित क्वारंटाईन असताना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचं वृत्त आहे. या आशा वर्कर सोलापूर महानगर पालिका, बाळे येथे आरोग्य विभागात कार्यरत आहेत.
या आशा वर्कर सध्या शिवाजी नगर, बाळे या परिसरात कोरोना काळामध्ये गेल्या तीन महिन्यामपासुन नागरिकांची आरोग्य तपासणीचे काम करत होत्या. त्यांना 23 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सिंहगड कॉलेज येथे ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचे पती, मुलगा व सून यांना संपर्कात असल्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या घरी कोणीच नसल्याचे पाहुन 27 जूनच्या पहाटे अज्ञात व्यक्तींनी घराचा कडी कोंयडा उचकटून कपाटातील मौल्यवान ऐवज चोरला.
यात 11 तोळे सोने, चांदीचे दागिने, भांडी तसेच धान्य तेल डबा व इतर किराणा माल चोरीस गेला आहे. या प्रकरणी आशा वर्कर महिलेचे पती सुनील सुरवसे यांनी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ देशमाने करीत आहेत.
























































