
यंदा देहू, आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा लवकर असल्याने प्रशासनाने ऊन आणि उष्माघात यांचे टेन्शन घेतले आहे. पालखीमार्गावर ठिकठिकाणी तंबू, मंडप उभारून सावलीची सोय करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या. रस्तारुंदीकरणात पालखीमार्गावरील झाडे नष्ट झाल्याने मार्गावर झाडे लावण्यासाठी विशेष नियोजन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
पालखी सोहळा तयारीसाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्थानिक आमदार आणि प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर यंदा पंढरीची वारी लवकर असल्याने, तसेच ‘अल निनो’ वादळाचा परिणाम म्हणून पावसाळादेखील लांब पडण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. त्यामुळे पालखी सोहळ्यादरम्यान कडक ऊन असण्याची शक्यता लक्षात घेता, पालखीमार्गावर ठिकठिकाणी सावलीची सोय करण्याचा निर्णय झाला. पालखी सोहळ्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यांतील एक समिती पालखी सोहळा पूर्ण होईपर्यंत दरआठवडय़ाला नियोजन करेल. तसेच पुढील वर्षभरात करण्यात येणाऱया उपाययोजनांसंदर्भात दुसरी समिती नियोजन करणार आहे.
बैठकीत संस्थानांनी पालखी सोहळ्यादरम्यान येत असलेल्या समस्यांचा पाढाच वाचून दाखविला. त्यात प्रामुख्याने पालखीतळाच्या जागेबाबत सर्वच संस्थानांच्या प्रमुखांनी तक्रारी केल्या. त्यावर पाटील यांनी यासंदर्भात दरआठवडय़ाला विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संस्थांचे प्रमुख, तसेच प्रशासकीय अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली.
देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले, ‘देहूमध्ये सोहळा सुरू असताना वारकऱयांना थांबण्याची सोय नाही. या ठिकाणी एक गायरान आहे. ही जागा 35 एकरांवर पसरलेली आहे. हे गायरान पूर्ण वेळ संस्थानच्या वारकऱयांसाठी आरक्षित करावे,’ अशी मागणी त्यांनी केली.
जूनमध्ये पंढरपूरजवळ टोल नको
पंढरपूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर टोल सुरू करण्याचे नियोजन पुढील महिन्यात अर्थात जूनमध्ये होणार आहे. याबाबत सर्व संस्थानप्रमुखांनी हा टोल जूनऐवजी जुलैमध्ये सुरू करावा, अशी आग्रही मागणी केली. त्यावर ‘एनएचएआय’ प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले, यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केल्यास हा टोल जुलैमध्ये सुरू करता येईल. मात्र, पाटील यांनी तातडीने यावर हस्तक्षेप करीत हा टोल जूनमध्ये सुरू झाला तरी वारकऱयांच्या सर्व वाहनांना मोफत पास देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश प्रकल्प संचालकांना दिले.