ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन दिवस-रात्र कसोटीचा ‘किंग’, सहाव्या कसोटी शतकासह सामील झाला ब्रॅडमन्स क्लबमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऍशेस मालिकेतील दुसऱया दिवसरात्र कसोटी लढतीच्या  दुसऱया दिवशी लाबुशेनने इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकीर्दीतील सहावे कसोटी शतक झळकावले. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केले. दिवस-रात्र कसोटीतील लाबुशेनचे हे तिसरे शतक आहे. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन जगातला पहिला फलंदाज ठरला आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात दोन शतके झळकावणारा पाकिस्तानचा फलंदाज असद शफीकला लाबुशेनने मागे टाकले.

शिवाय 34 डावांत 2000 कसोटी धावा पूर्ण करीत लाबुशेन याने सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. डॉन ब्रॅडमन (22), जॉर्ज हेडली (32), हर्बर्ट सटक्लिफ (33) आणि माईक हसी (33) यांनी त्याच्यापेक्षा कमी डावांमध्ये ही विक्रमी कामगिरी केली आहे. लाबुशेनच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 9 बाद 473 या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. दुसऱया दिवसअखेर इंग्लंड पहिल्या डावात 2 बाद 17 अशा चिंताजनक स्थितीत होता.

दुसऱया ऍशेस कसोटीच्या दुसऱया  दिवसाच्या सुरुवातीची पहिली 40 मिनिटे खूपच नाटय़मय ठरली. लाबुशेनने वेगवान गोलंदाज जेम्स ऍण्डरसनने टाकलेला एक चेंडू थर्ड मॅनला सीमापार पाठवून आपल्या कसोटी कारकीर्दीतील सहावे आणि ऍशेसमधील पहिले शतक पूर्ण केले.

मात्र 103 धावांची शतकी खेळी करून बाद होण्यापूर्वी लाबुशेन याने कसोटीतील अनेक विक्रमांना गवसणी घातली. गुलाबी चेंडूच्या दिवस-रात्र कसोटीतील हे त्याचे तिसरे विक्रमी शतक आहे. ऍडलेड ओव्हलवर लागोपाठ तीन दिवसरात्र कसोटी सामन्यांमध्ये लाबुशेनने शतके ठोकली आहेत.

इंग्लंड संघ संकटात

ऍडलेड ओव्हलवरील दुसऱया दिवस-रात्र ऍशेस कसोटीच्या दुसऱया दिवसअखेर  इंग्लंड संघाचा पहिला डाव 2 बाद 17 अशा संकटाच्या स्थितीत आहे. अजून त्यांना कांगारूंची 456 धावांची आघाडी मोडून काढायची आहे. त्याआधी यजमान ऑस्ट्रेलियाने 9 बाद 473 या विशाल धावसंख्येवर आपला पाहिला डाव घोषित केला. त्यानंतर पाहुण्या इंग्लंडला दुसऱया दिवसअखेर पहिल्या डावात 2 बाद 17 अशा चिंताजनक स्थितीत नेऊन ठेवले.