काँग्रेसमध्ये अशोक चव्हाणांना नगण्य स्थान, मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सुरुवातीचा कार्यक्रम सुरु असतानाच वृत्तवाहिन्यांनी त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वीकारुन त्यांच्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक केल्याच्या बातम्या प्रसारीत केल्या. अशोक चव्हाणांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार हे सगळ्यांनाच माहीत होते. परंतु त्यांच्या जागी दुसरा प्रदेशाध्यक्ष निवडण्याची घोषणा डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या सुरुवातीलाच केली जाईल, याची कल्पना नसल्यामुळे या घोषणेने मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य आणि संताप या दोन्ही भावनांचा उद्रेक झाला. येत्या तीन महिन्यानंतर घेण्यात येत असलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणूका लक्षात घेवून पक्षश्रेष्ठींने प्रदेशाध्यक्ष पदात हा बदल केला असल्याचे सांगितले जाते.

विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर करण्यात आलेला हा बदल मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना दुखावणारा आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्षांना मदत करण्यासाठी ज्या दहा समित्या स्थापन करण्यात आल्या. त्या दहा समित्यांमध्ये बस्वराज पाटील आणि राजेंद्र दर्डा वगळता कोणत्याही नेत्यांचे नाव नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच अशोक चव्हाणांच्या राजकीय घसरणीला सुरुवात झाली. काँग्रेसच्या पराभवास वंचित आघाडी कारणीभूत असल्याचे अशोकराव सांगत असले तरी त्यांना पक्षातून होणारा विरोध हेही त्यांच्या आजच्या स्थितीस प्रमुख कारण आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसचा त्याग करुन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाणांचे काँग्रेसमधील अच्छे दिन संपले. बाळासाहेब विखे हे चव्हाण कुटुंबियांचे निकटवर्ती होते. अशा स्थितीत विखे यांच्या पक्षांतरामुळे पक्षश्रेष्ठींचा अशोक चव्हाण यांच्याविषयीचा संशय दुणावला असल्यास त्यात गैर नाही, असे काही विश्लेषकांचे मत आहे.