
सामना प्रतिनिधी । राहाता
स्वच्छ चारित्र्याचे गुन्हे नसलेले 17 विश्वस्त सरकारला मिळू नये हे दुर्दैव आहे . मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी साई समाधी शताब्दी सोहळ्यासाठी अनेक आश्वासने दिली. मात्र शताब्दी वर्ष संपत आले तरी ते विकास कामांसाठी छदामही देऊ शकले नाही. साई संस्थांनला निधी देणे दूरच, उलट दानाचे कोट्यवधी रूपये खिरापतीपती प्रमाणे स्वतःच्या संस्थांना वाटण्यात त्यांनी धन्यता मानली, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच फडनवीस हे खोटारडे मुख्यमंत्री आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
अशोक चव्हाण यांनी बुधवारी सकाळी साईसमाधीचे दर्शन घेतले. माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी चव्हाण यांचे स्वागत केले. यावेळी अखिल भारतीय कॉग्रेस कमेटीचे सचीव बी. एम प्रदिप , नांदेडचे आमदार हनुमंत बेट मोगरेकर, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव गोंदकर आदी उपस्थित होते. आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असुन खऱ्या अर्थाने देशात नव्या परिवर्ताची सुरूवात होणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. या महिन्यांत मोठा चमत्कार पहावयास मिळणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले अनेक खासदार , आमदार , पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारिप आणि इतर समविचारी पक्षांसोबतही चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. भारिप तसेच एमआयएमसोबत चर्चा करून मार्ग निघेल असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी आणि कॉग्रेसची आघाडी होणार असून जागावाटपासंदर्भात चर्चा सुरू आहे. नगर दक्षिणेच्या लोकसभेच्या जागेविषयी राष्ट्रवादीशी चर्चा करून ती जागा कॉग्रेसला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. निवडून येण्याचे निकष समोर ठेवून जागावाटप व्हावे असा कॉग्रेसचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी बोलताना चव्हाण यांनी राज्य सरकारवर टिका केली. सरकारला स्वच्छ चारित्र्याचे , गुन्हे नसलेले 17 विश्वस्त मिळू नयेत हे दुर्देव आहे. संस्थान विश्वस्त मंडळात निस्सीम साईभक्त असावेत. संस्थानचा निधी भाविकांच्या सोयी सुविधेसाठी तसेच गाव आणि पंचक्रोशीतील विकासासाठी खर्च व्हावा मात्र हे विश्वस्त मंडळ राजकीय स्वार्थासाठी निधी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना नांदेड येथील गुरूता गद्दी सोहळ्यासाठी तिन हजार कोटींचा निधी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक आश्वासने शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त दिली.मात्र, कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही असे ते म्हणाले.




























































