
>> अशोक डुंबरे
ओतूर हे पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर वसलेलं गाव. इतर गावांसारखं साधं वाटणारं, पण तरी थोडं वेगळं. याचं कारण आहे या गावाला लाभलेला आध्यात्मिक आणि धार्मिक इतिहास. मांडवी नदीच्या काठावर वसलेल्या या माझ्या गावाचं मुख्य वैशिष्टय़ म्हणजे श्री कपर्दिकेश्वराचे स्वयंभू पुरातन मंदिर आणि इथली श्रावणी यात्रा. श्रावणातील प्रत्येक सोमवारी इथल्या मुख्य शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी केल्या जातात. ही कलाकुसर बघण्यासारखी असते. दूरदर्शनसाठी या श्रावणयात्रेचं शूटिंग मला करता आलं आणि ओतूरच्या या श्रावणयात्रेचा सोहळा दूरवर पोहोचला.
मागच्या आठवडय़ात आषाढ मास संपून श्रावण महिना सुरू झाला. महाराष्ट्रामध्ये आणि हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात गावागावांमध्ये अनेक सणवार आणि व्रतवैकल्ये केली जातात. माझं गाव ओतूर. पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे. इतर गावांसारखं साधं वाटणारं, पण तरी इतर गावांपेक्षा थोडं वेगळं. याचं कारण म्हणजे त्या गावाला लाभलेला आध्यात्मिक इतिहास. मांडवी नदीच्या काठावर वसलेलं आणि अनेक सिद्धपुरुषांच्या तपश्चर्येचं स्थान असलेलं हे ठिकाण. श्री कपर्दिकेश्वराचे स्वयंभू पुरातन मंदिर हे या गावचं वैशिष्टय़. तसंच संत तुकाराम महाराज यांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य यांची संजीवन समाधीही इथे आहे. तुकाराम गाथेत याबाबतचा संदर्भ आढळतो.
तुकाराम महाराजांच्या स्वप्नात विठ्ठल आले आणि त्यांना दृष्टांत दिला. त्यामुळे तुकोबारायांना गुरूकृपा झाली अशी आख्यायिका आहे. बाबाजी चैतन्य यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर एक शिष्य राहात होता. त्याच्या उदरनिर्वाहासाठी चैतन्य महाराजांच्या समाधीत कधीतरी त्याला सोन्याच्या मोहरा प्राप्त झाल्या होत्या. ही हकीगत जुन्नर प्रांती असलेल्या मुसलमान सरदाराच्या कानी गेली. त्याने आपले काही शिपाई हे गुप्तधन शोधण्यासाठी पाठवले आणि समाधीस्थळी खोदकाम करायला सुरुवात केली, परंतु त्यातून मोठमोठे भुंगे निघाले आणि ते शिपायांच्या मागे लागले. त्यात एका शिपायाचा भुंगा चावल्यामुळे तिथेच मृत्यू झाला. ओतूरच्या वरल्या आळीला जुन्या घरातून बऱ्याच ठिकाणी पीराची स्थाने आढळतात. हे पीर म्हणजे मेलेले शिपाई. त्यांचा लालखान सरदार हिवरे गावापर्यंत पोहोचत असताना मरण पावला. या लालखानचा दर्गा अजूनही हिवरे गावात आहे, म्हणून त्या गावाला लालखान हिवरे म्हणतात अशी आख्यायिका आहे. तुकाराम महाराजांची दोन मंदिरं आहेत. एक ओतूरमध्ये आणि दुसरे देहू येथे. देहू ही तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. ओतूरच्या तुकाराम महाराजांच्या मंदिरात भक्तिभावाने भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्पाम होतात. माझे वडील कै. तुकाराम पांडुरंग डुंबरे हे वारकरी होते. तुकाराम महाराजांच्या मंदिरातील शहाबादी फरशीचं काम माझ्या वडिलांनी केलं. तुकाराम महाराजांच्या भक्तीत ते पूर्णत समर्पित होते. तसंच ते ओतूर येथील चैतन्य विद्यालयातील एका हुशार आणि सालस विद्यार्थ्याला दरवर्षी स्वखर्चाने ज्ञानेश्वरी भेट देत असत.
श्री कपर्दिकेश्वराचं मंदिर पुरातन आणि स्वयंभू आहे. अनेक वर्षांपासून येथे श्रावणयात्रा भरते. ती खूप प्रेक्षणीय आणि पाहण्यासारखी असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी मुख्य शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी केल्या जातात. सोमवारच्या आदल्या दिवशी गावकरी किंवा भाविक महादेवाच्या पिंडीसाठी तांदूळ अर्पण करतात. त्या तांदळाची मिरवणूक कपर्दिकेश्वराच्या मंदिरात येते आणि ते तांदूळ शंभू महादेवाला अर्पण केले जातात. या मंदिरात शंभू महादेवाचे गुरव उपासक आहेत. या गुरवांना शिवलिंगावर तांदळाच्या पिंडी करण्याची कला अवगत आहे. पहिल्या सोमवारी एक, दुसऱ्या सोमवारी दोन, तिसऱ्या सोमवारी तीन अशा तांदळाच्या पिंडी तयार केल्या जातात. याचं वैशिष्टय़ म्हणजे त्या गोल आकाराच्या असतात आणि बाजूने त्याला रंगीत कागद लावलेला असतो. इतरत्र अशा तांदळाच्या पिंडी पाहायला मिळत नाहीत म्हणून ओतूरची श्रावणयात्रा प्रसिद्ध आहे. 1958 मध्ये गावकऱयांनी वर्गणी काढून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, परंतु मागील दोन वर्षांपूर्वी ओतूरचे दानशूर सुपुत्र श्रीयुत रमेश शिवाजीराव यांनी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून त्या देवळाचा जीर्णोद्धार केला आहे. विशेष म्हणजे कुठेही नावाची पाटी किंवा प्रसिद्धी होऊ दिली नाही. ते खरे शिवभक्त असून त्यांनी मागील आठवडय़ात मंदिराभोवती 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करून या मंदिराचं माहात्म्य वाढवलं आहे.
मी दूरदर्शन केंद्रात निर्माता म्हणून 1972 पासून काम सुरू केले. बरेच दिवस माझ्या मनात होतं की, ओतूरच्या श्रावणी यात्रेचं चित्रीकरण करावं. तो योग 80 च्या दरम्यान जुळून आला. माझ्याबरोबर कॅमेरामन बी.पी. सिंग, साऊंड रेकॉर्डिंगसाठी प्रभाकरन, लाइटिंग असिस्टंट शशिकांत सांगवेकर आणि माझा सहकारी शशिकांत भोसले होता. ओतूरला आम्ही दोन-तीन दिवस मुक्काम केला. पाहुण्यांची सोय तुकोबारायाच्या मंदिराशेजारी गाडगे मिशनच्या शाळेतील खोल्यांमध्ये केली होती. बी. पी. सिंग हा देहराडूनचा, त्याला इथलं वातावरण खूपच आवडलं होतं. बीपीने नंतरच्या काळात निर्माता म्हणून ‘एक शून्य शून्य’ ही मालिका केली होती. एकदा त्याने एका एपिसोडचे कॅमेरा न थांबवता वन टू लास्ट शॉट विदाऊट कटिंग 29 मिनिटांत चित्रीकरण पूर्ण केलं होतं. इतका जबरदस्त हुशार कॅमेरामन मला लाभला होता. दोन-तीन दिवस त्याने चित्रीकरण केलं. शेती, गावाचा विकास, रंगतदार लेझीम खेळ, श्रावणयात्रेचं संपूर्ण शूटिंग केलं. ओतूरच्या श्रावणयात्रेला कुस्तीच्या स्पर्धेची जोड असते. नगर, नाशिक, पुणे येथून नामांकित पैलवान येतात. ओतूर येथील धर्मादाय संस्था वर्गणी काढून पैलवान लोकांना योग्य तो मोबदला देत असत.
यात्रेच्या दिवशी दुपारी एक वाजता चावडीपासून वाजवत, ज्याला ‘हगामा’ असं म्हणत, मानकरी मिरवणूक काढून मंदिराकडे येत असतात. इथल्या हगाम्याचे वैशिष्टय़ म्हणजे प्रेक्षकांना बसण्यासाठी अतिशय सुंदर असे छोटंसं स्टेडियम आहे. रस्ता सोडून तिन्ही बाजूंना उंचवटा असल्यामुळे चाललेल्या कुस्त्या प्रेक्षकांच्या नजरेत सहजपणे येतात. गावातील तरुण मंडळी, बबन सर, गोपाळ सर माइकवरून अनाऊन्समेंट करत पैलवानाचे नाव व त्याच्या वर किती रुपयांचं इनाम लावलं हेही सांगत. डफडेवाले कुस्ती सुरू झाली की, जोरात डफली वाजवत. त्यामुळे पैलवानालासुद्धा जोर येत असे. प्रेक्षकांनासुद्धा मजा येत असे. माझ्या डोळय़ांसमोर अजूनही ते दृश्य उभं राहतं. या वेळी आमच्या दूरदर्शनच्या टीमचाही नावानिशी सत्कार केला जात असे.
यात्रा म्हटलं की, खेळण्यांची दुकानं, पाळणे आले. लहान मुलांच्या पिपाण्या, खाऊची दुकानं हे सगळं श्रावणयात्रेत अनुभवायला मिळायचं. काही स्त्रिया हातांवर गोंदून घेत असतात. काही बांगडय़ा भरत असतात. ही यात्रा स्त्रियांना एक पर्वणी होती. सर्व धर्मांतील, सर्व जातींतील तसंच आदिवासी भागातील स्त्राr आणि पुरुष या यात्रेचा आनंद घेत होते. खूप आनंदी वातावरण असतं. निसर्गही या वेळेला भरपूर साथ देत होता. सगळीकडे शेतामध्ये पिकं, हिरवेगार रान म्हणून शेतकरीसुद्धा आनंदाने यात्रेत सामील होत असत. परगावचे व्यापारी आपली दुकानं मंदिराच्या परिसरात दुकान लावून बसत आणि त्यांची कमाईसुद्धा चांगल्यापैकी होत असे.
संध्याकाळी आखाडा संपल्यावर जो तो आपापल्या घरी परतत असे. तसंच गावावरून आलेले काही पाहुणे मुक्कामाला राहत. त्यांच्यासाठी घरोघरी सोमवारचा उपवास सोडायला भोजन व्यवस्था होत असे. वरणभात, भाजी, कधी शिरा, कुवतीप्रमाणे जो तो आपल्या पाहुण्याला खूश ठेवत असे.
आमच्या टीमने दोन-तीन दिवस मुक्काम करून ओतूरचा सर्वांगीण विकास कसा झाला याचा लघुपट आणि श्रावणयात्रा असा कार्पाम केला. तो मुंबई दूरदर्शन केंद्रावरून 28 मिनिटांचा प्रोग्रॅम म्हणून दाखवला आणि महाराष्ट्रभर आमच्या ओतूरच्या कपर्दिकेश्वराची यात्रा पोहोचली. त्यामुळे पुढील काळात शिवलिंगावरील तांदळाच्या पिंडी पाहून त्याच्या दर्शनासाठी अनेक लोक लांबून लांबून येऊ लागले. मी केलेल्या कार्पामाला प्रसिद्धी मिळाली, गावाचं नाव झालं याचा मला सार्थ अभिमान वाटतो. दर श्रावणयात्रेला मला ओतूरच्या यात्रेची आठवण येते. यात्रेत हमखास मित्रमंडळी भेटतात ही एक मोठी पर्वणीच असते.
(लेखक माजी दूरदर्शन निर्माते आहेत)




























































