
जीवाची बाजी लावून हिंदुस्थानींचा स्वातंत्र्यासाठी लढा सुरू असताना भाजपची विधारधारा सांगणारे लोक मात्र ब्रिटिशांचे खबरी बनून देशद्रोही कारवाया करत होते. आता त्याच विचारधारेचे लोक काँग्रेसच्या वारशाबद्दल प्रश्न विचारत आहेत अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर केली. पक्षाच्या 135 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते.
काँग्रेसच्या वारशाबद्दल भाजपने काँग्रेसवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी भाजपला खडे बोल सुनावले. भाजपमुळे राज्यघटनेला धोका निर्माण झाला असून लोकशाहीचा आवाज दडपला जात आहे असा आरोप गेहलोत यांनी केला. ‘देशातील सर्व लोकशाही प्रणालीतील संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागावर दबाव आहे. पंतप्रधान कार्यालयाला विचारल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलले जात नाही. सर्व निर्णय हे पंतप्रधान कार्यालयातून घेतले जातात’ असा आरोपही त्यांनी केला.





















































