
धार्मिक अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि अश्लील व्हिडीओच्या माध्यमातून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता संपूर्ण हिंदुस्तान हादरले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढती व्याप्ती लक्षात घेऊन राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या हायप्रोफाईल प्रकरणाच्या तपासाची संपूर्ण धुरा आता महिला आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात कार्यालय थाटून स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातने दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांना जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. पोलिसांना तपासादरम्यान खरातच्या कार्यालयातून एक पेनड्राइव्ह हस्तगत करण्यात यश आले असून, त्यामध्ये तब्बल ५८ अश्लील व्हिडीओ सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रकरण केवळ अत्याचारापुरते मर्यादित नसून, या व्हिडीओंच्या माध्यमातून पीडितांना ब्लॅकमेल करून ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक आरोपही त्याच्यावर आहे.
सध्या या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा, नाशिक ग्रामीणमधील वावी आणि अहिल्यानगरमधील शिर्डी अशा तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यांची ही व्याप्ती एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसल्याने आणि यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने हा तपास SIT कडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधित पोलीस ठाण्यांना प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे आणि कागदपत्रे तातडीने SIT कडे हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


























































