हास्यस्फोट, टाळय़ा आणि वन्स मोअर! अशोक मुळ्ये यांनी रंगवला ‘एका लग्नाचा’ तिसरा अंक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या भन्नाट अभिनयाने नटलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या विनोदी नाटकाचे नुकतेच 400 प्रयोग पूर्ण झाले. यानिमित्त रविवारी मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात त्याचा स्वागत सोहळा पार पडला. हास्यस्फोट, वन्स मोअर आणि टाळ्यांच्या गजरात पार पडलेला हा स्वागत सोहळा म्हणजे नाटकाचा असा तिसरा अंकच जणू. नाटक संपल्यानंतरही तासभर प्रेक्षक या सोहळ्याच्या निमित्ताने खिळून राहिले. ज्येष्ठ नाटय़कर्मी अशोक मुळ्ये यांची तुफान फटकेबाजी आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद असा तिसरा अंक उत्तरोत्तर रंगत गेला.

‘हिंदी चित्रपटसृष्टीत अजूनही राज कपूर-नर्गिस या जोडीचा उल्लेख केला जातो. मराठी रंगभूमीवर तशीच एकमेव जोडी आहे ती प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांची. मराठी नाटय़सृष्टीतील ते राज कपूर-नर्गिस आहेत, अशी खणखणीत टिप्पणी करत अशोक मुळ्ये यांनी केली आणि मुलुंडचे कालिदास नाटय़गृह प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.

स्वागत सोहळ्यात यावेळी 12 मार्च 1993 ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेच्या वेळी प्राणांची बाजी लावत बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख म्हणून धडाडीचे कार्य करणाऱया मेजर वसंत जाधव (निवृत्त) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक, ‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना काळात नाटकांनी हास्य फुलवले

– कोरोनाच्या या संकटकाळात डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यांना आपण कोरोना योद्धय़ांचा मान दिला आहे. विनोदी अभिनेते हेदेखील आघाडीवरील कोरोना योद्धेच आहेत. त्यांनी या कठीण काळात लोकांच्या चेहऱयावर हास्य फुलविण्याचे कार्य केले. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकालाही हे श्रेय जाते, असे अशोक मुळ्ये यावेळी म्हणाले.

हास्याचा हा बॉम्ब निकामी करणं अशक्य

– यावेळी बोलताना मुळ्ये म्हणाले की, मेजर जाधव यांनी बॉम्बशोधक पथकाचे प्रमुख म्हणून अनेक बॉम्ब निकामी केले असतील. यापुढेही करतील, पण हास्यस्फोट घडविणारा प्रशांत दामलेरूपी जिवंत बॉम्ब कुणालाही निकामी करता येणार नाही. त्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजरात उत्स्फूर्त दाद दिली.